जामनिसांनी आपल्या फायलीवरून पुन्हा एकदा नजर फिरविली. फाईल परिपूर्ण बनविण्यासाठी गेले कित्येक महिने त्यांची मेहनत सुरु होती. एकदा का ही फाईल जलसंपदा मंत्र्यांच्या सचिवाकडे सोपविली की त्यांचे आजचे काम पूर्ण होणार होते. त्या पुढचा फाईलचा प्रवास एका आखून दिलेल्या रेषेत होणार होता. आणि एकदा का ह्या धरणाचे काम सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले की मग जामनिसाचा पुढचा प्रवास स्वप्नमय होणार होता. पुढचा एक तास जामनिसांनी बाकीचे सोपस्कार पार पाडले आणि फाईल सचिवांकडे सोपवली. अंधेरी लोकलच्या गर्दीत शिरून जामनिस निघाले ते असंख्य मुंबईकरांसारखे गर्दीत स्वप्न बघत! पुढील काही दिवस जामनिस आणि मंडळी आपल्याला हव्या त्या बातमीची उत्कंठेने वाट पाहत होते. परंतु कोणास ठाऊक पण का ही बातमी येतच नव्हती. आणि मग बातमी आली ती मोठा धक्का देतच. धरणाचे काम सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले नव्हते. जामनिसांना मोठा धक्का बसला. पुढील सर्व स्वप्नांचा तर चक्काचूर झालाच होता पण ह्या फाईलीच्या पुढील प्रवासासाठी केलेली मोठी गुंतवणूक वाया गेली होती. असला प्रकार गेल्या तीस वर्षात जामनिसांनी पाहिला नव्हता. अवैध असले तरी काय झाले ह्या जगाचे सुद्धा असूल होते आणि ह्या अलिखित नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर ह्या जगाचे अस्तित्व टिकून होते. नियम मोडणाऱ्याला एकच शिक्षा होती. आणि ती सर्वजण जाणून होते. जामनिसांचे पुढील काही दिवस भयानक गेले. असल्या लोकांशी आपला संपर्क येईल असे त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते. ह्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले निरपराधित्व सिद्ध करणे हे! बऱ्याच बैठकीनंतर त्यात जामनिसांना यश आले. त्यानंतरचा प्रकार मात्र भयप्रद होता. गुन्हेगार कोण ह्यावर जवळजवळ सर्वांचे एकमत झाले. आणि पुढची योजना आखण्यास सुरुवात झाली, ह्यात पडण्याची जामनिसांची अजिबात इच्छा नव्हती. परंतु ह्या दुनियेचा अजून एक नियम होता, एकदा आत शिरलेला माणूस अर्ध्या रस्त्यावरून प्रवास सोडू शकत नसे. त्यामुळे अत्यंत भयभीत अवस्थेत जामनिस हा सर्व प्रकार पाहत होते. हणम्या आपल्या चाळीतील खोलीत निवांत बसला होता. निवांत बसला असला तरी त्याच्या मनात विचारांचे थैमान चालू होते. गावाकडे बहिणीचे लग्न उभे ठाकले होते. आणि म्हाताऱ्या आईबाबांकडे पैशाची चणचणच होती. इथे छोटी मोठी कामे करून पैसा काही साठविला जात नव्हता. त्यामुळे काहीतरी मोठे काम करावे अशी इच्छा त्याच्या मनात जोम धरू लागली होती. कालच रात्री आलेल्या आईच्या फोनने त्याच्या ह्या विचाराने उचल खाल्ली होती. अशा विचारातच दुपारी हणम्या टपरीवर गेला होता. बरेच दिवसांनी टपरीवर त्याला विजयप्पा भेटला. विजयप्पा त्या वस्तीतील एक लक्षणीय व्यक्तिमत्व होते. सगळ्या दोन नंबरच्या कामात त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. तुरुंगातून त्याची ये जा चालूच असायची. तो हि आज कसल्या तरी विचारात गुंग होता. हणम्याकडे बघून सुद्धा त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळाने तो तंद्रीतून बाहेर आला. हणम्याला बघून म्हणाला, 'काय रे कसल्या चिंतेत पडला आहेस एवढा?' मग थोडा वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. तिथून बाहेर पडताना हणम्याचा चेहरा अगदी विचारमग्न होता. बिल्डर परेरा आपल्या अलिशान ऑफिसमध्ये अगदी विचारग्रस्त होऊन बसला होता. एका अलिशान टॉवरमध्ये त्याची कोट्यावधीची रक्कम अडकून बसली होती. ह्या टॉवरच्या सर्व परवानग्या अडकून बसल्या होत्या आणि त्याच्या सर्व वित्तपुरवठादारांनी त्याच्या मागे पैशाचा तगडा लावला होता. आधी अधिकृत मार्गांनी चालू झालेला हा तगडा आता दुसऱ्या मार्गाने चालू झाल्याने परेरा आपली मनःशांती गमावून बसला होता. ह्या सगळ्या प्रकारातून बाहेर कसे पडावे हे कळत नसल्याने त्याची मती कुंठीत झाली होती. संशयित गुन्हेगाराच्या (नाव क्ष) सर्व दैनंदिन कारभाराचा सविस्तर अभ्यास करण्यात आला होता. जामनिस सुद्धा त्या अभ्यासात सहभागी होते. एकंदरीत योजना पूर्णत्वाला जात होती. संध्याकाळच्या वेळी परतीच्या प्रवासात क्षला गाठून हिशोब चुकता करायचा असे ठरविण्यात आले. हणम्या प्रचंड बेचैन होता. आपण होकार दिला खरा पण त्याला हे पटतच नव्हते. तरीही आई वडिलांचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर आला की मात्र पुन्हा त्याच्या मनाचा निर्धार होत होता. अशाच बेचैनीत त्याने पुढील काही दिवस काढले. मध्येच एकदा त्याला लांबूनच क्ष चा चेहरा दाखविण्यात आला होता. हणम्याला त्याच्या कामगिरीबद्दल आगावू हप्ता देण्यात आला होता. ही रक्कम गावी पोहोचताच आईवडिलांच्या स्वरातला उत्साह त्याला काहीसा सुखावून गेला होता. परेराने एकंदरीत सर्व परिस्थितीचा शांत डोक्याने विचार केला होता. त्याचा मेव्हणा त्याला गेले कित्येक वर्षे कॅनडात बोलावीत होता. परंतु इथल्या पैशाचा मोह त्याला अजिबात सोडवीत नव्हता. पण आताची परिस्थिती मात्र वेगळी होती. आता एकंदरीत प्रकरण जीवावर बेतेल असला प्रकार होता. म्हणूनच मेव्हण्याचा सल्ला गांभीर्याने घेण्याचे परेराने ठरविले होते. आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी त्याने पासपोर्ट कार्यालयात दाखल केला. आपल्या हालचालीवर इतक्या बारकाईने कोणी लक्ष देत असेल ह्याची त्याला तिळमात्र कल्पनासुद्धा नव्हती. परेरावर लक्ष ठेवणारी मंडळी त्याच्या पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीने एकदम सतर्क झाली. आपले लक्ष्य / भक्ष्य आपल्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे हे त्यांनी जाणले. त्यांनीसुद्धा आपल्या परीने हालचालीस सुरुवात केली. मग तो दिवस उजाडला. हणम्याने सकाळीच अंघोळ आटोपली. देवाच्या फोटोकडे बराच वेळ टक लावून पाहताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एक एक क्षण पुढे जाता जात नव्हता. ऑक्टोबर महिन्यातील हा दिवस दुपारचा उष्मा घेवून आलाच. हणम्याने गावाला फोन लावला आणि उद्या सकाळपर्यंत आपण गावी नक्की पोहोचतो असे आश्वासनही दिले. त्या आश्वासनाच्या पूर्ततेची खात्री फक्त भगवंतालाच होती. दुपारी चार वाजता हणम्या दादर स्थानकाच्या पूर्वेला ठरल्याप्रमाणे ठरलेल्या व्यक्तीला भेटला. इतक्या रुबाबदार कपड्यांची त्याला सवय नसल्याने त्याला काहीसे अवघडल्यासारखे होत होते. वातानुकुलीत इनोवामध्ये हणम्या बसतो तितक्यात गावाहून त्याला फोन आला. खरेतर फोन घ्यायची त्याला आता बंदी होती पण बाबांचा फोन आहे हे ऐकल्यावर त्याने बाजूच्या गंभीर चेहऱ्याच्या माणसाला फक्त एक मिनिट अशी विनंती करून फोन घेतला. फोनवर बाबांचा अतिउत्साहित स्वर त्याच्या कानी पडला. सतत प्रयत्नशील असणाऱ्या त्याच्या बाबांनी लॉटरीचे तिकीट घेतले होते आणि त्यांना एक कोटीचे बक्षीस लागले होते. हणम्याने फोन ठेवला आणि त्याच्या मनात प्रचंड खळबळ माजली, गंभीर चेहऱ्याच्या माणसाने त्याला नजरेनेच सर्व काही ठीक आहे कि नाही असे विचारले. हो म्हणण्यावाचून हणम्याकडे पर्याय होता तरी कोठे? मुंबईच्या धावत्या रहदारीकडे खिडकीतून हणम्या पाहत होता. आकाशात अचानक ढगांची गर्दी होवू लागली होती. अजून इच्छित स्थळी पोहचण्यास सुमारे वीस मिनिटांचा अवधी होता. क्ष चा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे चालला होता. आपल्या लाल होंडा सिटीगाडीतून क्ष अगदी खुशीतच निघाला होता. शेवटच्या ५ -१० मिनिटात त्याचा कार्यक्रम आपल्या हातात घेण्याची त्यांना पूर्ण परवानगी होती. परेरा आज एकदम खुशीतच होता. त्याचा पासपोर्ट नुतनीकरण करून त्याच्या हाती पडला होता. कॅनडाच्या वकिलातीच्या मुलाखतीची तारीख घेण्याचा विचार करीतच तो आपल्या ऑफिसातून लवकर बाहेर पडला. आकाशाकडे नजर टाकत आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून थेट घरी जाण्याचा त्याने मनसुबा आखला. आपली नवी कोरी लाल होंडा सिटी त्याने बाहेर काढली. क्ष अंधेरीला एस. व्ही. रोडवरून पूर्वेला जायला वळला आहे अशी खबर हणम्याच्या गाडीत पोहोचली. हणम्याची गाडी आता वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावरून अंधेरीच्या दिशेने वळली. आकाश अगदी भरून आले होते आणि अगदी कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत होती. परेराच्या अनुभवी नजरेला गाडीतील आरश्यातून सतत दिसणारी निळी गाडी खुपत होती. ऑफिसातून निघाल्यापासून त्या गाडीने त्याचा पिच्छा पुरविला होता. आपला मार्ग बदलला पाहिजे असे त्याला वाटू लागले. अचानक त्याने तेली गल्लीत वळण घेतले. त्याच वेळी मोठ्या गडगडासहित पावसाची एक मोठी सर सुरु झाली. आपल्या गाडीसमोर आपल्यासारखीच लाल होंडा सिटी पाहून मात्र परेरा पुरता हैराण झाला. त्याने मुंबईतील आपल्या ड्रायव्हिंग कौशल्याला पुरते वापरून आपल्या पुढच्या सिटी गाडीला मागे टाकले. इथे हणम्याच्या बेचैनीने अगदी कळस गाठला होता आणि त्यात पावसाने भर घातली. सिग्नलला गाडी थांबली आणि बाजुचा गंभीर फोनवर बोलण्यात गढला आहे हे पाहून त्याने पटकन दरवाजा उघडला आणि थेट धूम ठोकली. आधीच गर्दीचा अंधेरी पूर्वेचा भाग आणि त्यात ही पावसाची सर त्यामुळे हणम्या कोठे गायब झाला हे कळावयास गंभीर आणि मंडळीला वाव नव्हता. आता आयत्या वेळी प्लान वाया जाऊन द्यायचा नाही म्हणून गंभीरने आपल्या पिस्तुलाला हात घातला. निळ्या गाडीतील मंडळी हैराण झाली होती. परेरा गायब झाला कि काय अशी भीती त्यांना वाटू लागली होती, परंतु समोर लाल होंडा सिटी दिसताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. चिखलाने गाडीचा नंबर पडताळून पाहण्याची त्यांची संधी हिरावून घेतली होती. निळ्या गाडीतील व्यावसायिक लोकांनी त्यांच्या समजुतीनुसार परेराचा खातमा केला होता. आजूबाजूला माजलेल्या गदारोळाची पर्वा न करता ते सफाईने तिथून पसार झाले. गंभीर आणि मंडळी घाईघाईने पोहचली खरी परंतु क्ष चा आधीच खातमा झाल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. म्हणायला अननुभवी. परंतु हा हणम्या तर एकदम व्यावसायिक निघाला असे म्हणून त्यांनी काम फ़त्तेचे एक दोन फोन लावले आणि शांत पणे आपली गाडी परतीच्या मार्गी लावली. क्ष च्या खुनामुळे मुंबईत / राज्यात जबरदस्त हल्लकल्लोळ माजला. मंत्रालयातील इतक्या उच्चपदस्थ गृहस्थाचा दिवसाढवळ्या खून होत असेल तर सामान्य माणसाच्या सुरुक्षिततेचे काय असा प्रश्न विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला. एकंदरीत मुंबईतील वातावरण तप्त झाले होते. हणम्या जबरदस्त भयभीत झाला होता. त्याने तत्काळ गावी पळ काढला खरा पण घरी जायचे त्याने टाळले. आपला खास मित्र शैलेश ह्याच्या शेतातील घरात त्याने आश्रय घेतला. आपल्या मागावर मुंबईहून माणसे येणार ह्याची त्याला खात्री होती पण त्यात आपल्या घरच्यांना अडकविण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. शैलेशला अधूनमधून घरी पाठवून लग्नाची तयारी व्यवस्थित चालली आहे ना ह्याची खातरजमा तो करून घेत होता. अशाच एका दुपारी शैलेश आला तो घरी एक अनोळखी इसम मोठी रक्कम हणम्याच्या वडिलांना देऊन गेल्याची खबर घेऊनच. हणम्या आता प्रचंड गोंधळला. हे काय चालले आहे हे त्याला अजिबात समजेनासे झाले. शैलेश मात्र शांत डोक्याचा होता. हणम्याने त्याला विश्वासात घेऊन सर्व सांगितले होते. असाच शांतपणे विचार करताना मध्येच त्याने तालुक्यावरून आलेल्या पेपरांचा जुडगा हणम्याकडे फेकला. आठवड्यातून फक्त दोनदा हे पेपर गावी यायचे. त्यातल्या पहिल्याच पेपरचे पहिले पान उघडताच हणम्या पूर्ण हैराण झाला. क्ष च्या खुनाच्या बातमीने हे पान पूर्ण व्यापले होते. जरी हणम्याला क्ष चे नाव माहित नव्हते तरी देखील तेली गल्लीचा उल्लेख वाचून त्याला खुलासा झाला होता. आणि घरी आलेल्या रकमेचेही स्पष्टीकरण मिळाले होते. आता त्याला दुसरीच भीती वाटू लागली, एकतर खुनी म्हणून आपल्यामागे ससमिरा लागेल किंवा ही रक्कम आपणास परत करावी लागेल. जरी लॉटरी लागली तरी त्याचे पैसे मिळायला वेळ लागणार होता आणि आलेली रक्कम तर वडील खर्च करून मोकळे झाले होते. शेवटी त्याने निर्णय घेतला की बहिणीचे लग्न आनंदात घालवायचे आणि पुढचे पुढे बघून घ्यायचे. परेरा पुढील दोन तीन दिवस घराबाहेर पडलाच नाही. बाहेर पडण्याची त्याची हिम्मतच नव्हती. क्ष च्या खुनाची घटना त्याने बाजूच्या गल्लीतून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती आणि हे निळ्या गाडीतील मारेकरी आपल्यासाठी आलेले होते हे समजावयास त्याला वेळ लागला नव्हता. आता आपल्या सुरक्षिततेची त्याला अजिबात खात्री राहिली नव्हती. मग एक दोन दिवसांनी परेराच्या बिल्डिंगमधून एक बुरखाधारी स्त्री बाहेर पडली आणि तिची गाडी निघाली ती योगायोगाने हणम्याच्या गावाकडे! निळ्या गाडीतील मंडळींना बराच मार पडला होता. त्या माराने त्यांची अंगे काळी निळी पडली होती. योग्य सावज पकडण्यासाठी त्यांना एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती. हणम्याच्या घरी पैसे पाठविल्यानंतर जामनिस आणि मंडळींना क्ष चा खून निळ्या गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी केल्याचे कळून चुकले होते. पैसे गेल्याचे त्यांना दुःख नव्हते पण चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागणार नाही ह्याचा त्यांना जबरदस्त आनंद झाला होता. परंतु त्यांचा अंदाज चुकला होता. क्ष कोणकोणत्या निर्णयात सहभागी होता ह्याची खोल तपासणी चालू होती. आणि धरणाचे कंत्राट देण्याच्या निर्णयातील त्यांचा सहभाग सतत चौकशी करणाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होता. तपासणी पथकाचा तपास दोन वेगवेगळ्या मार्गांनी सुरु होता. पहिल्या मार्गात क्ष चे सर्व व्यवहार तपासून बघितले जात होते. धरणाच्या कामातील त्याचा सहभाग आणि हे कंत्राट मिळण्याची सर्वात जास्त शक्यता असलेल्या सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व लोकांची चौकशी असला हा प्रकार सुरु होता. एक दोन दिवसांपूर्वी खुशीत असलेल्या जामनिसांना ह्या तपासणीची ज्यावेळी कुणकुण लागली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तपासणीच्या दुसऱ्या मार्गात घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष घेतली जात होती. परंतु त्यातून काही ठोस निष्पन्न होत नव्हते. गाडीची नंबर प्लेट तर खोट्या क्रमांकाची होती. तीन दिवसांनी ह्या वर्णनाशी मिळती जुळती गाडी गुजरात मध्ये सापडली होती आणि ती चोरीची असल्याचे तपासात सिद्ध झाले होते. तरीही पोलिसांनी आशा सोडली नव्हती. गाडीच्या मूळ मालकाचा पत्ता त्यांनी शोधला होता आणि तिथे तपास सुरु केला होता. निळी गाडीतील क्ष चा चुकून गेम करणारी मंडळी घाबरली होती. पोलिस मूळ मालकापर्यंत पोहचले म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आता वाढीस लागली होती. त्यांनी आता क्ष चा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. ही व्यक्ती कोण आणि त्यांचे अधिक तपशील काढण्यास त्यांना फारसा वेळ लागला नव्हता. त्यांच्या खबऱ्यानी जेव्हा पोलिस तपासाची पहिली दिशा धरणाच्या कामाकडे कशी वळतेय ह्याची बातमी त्यांना दिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आणि मग थोडे अधिक तपशील मिळविताच त्यांना चित्र स्पष्ट झाले. आणि मग निळी गाडी पार्टीकडून जामनिसांना पहिला फोन आला. ह्या फोन नंतर जामनिसांची हालत खराब झाली. सर्व सोडून हिमालयात पळून जावे असे त्यांना वाटू लागले. परंतु ह्या खेळत असे अर्धवट पळून चालणार नव्हते. निळी गाडी पार्टी त्यांचा पिच्छा सोडीत नव्हती. जामनिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ह्या खेळातील आपल्या वरिष्ठ मंडळींना ह्या सर्व प्रकारची जाणीव करून दिली. त्यानंतर जामनिसांचे वरिष्ठ आणि निळी गाडी पार्टी ह्यांच्यातील संवाद जामनिसांना काही माहित पडला नाही. आपल्या बहीणीच लग्न व्यवस्थित पार पडलं म्हणून हणम्या अगदी खुशीत होता. आता तू सुद्धा दोनाचे चार हात कर म्हणून आई वडील त्याच्या मागे लागले होते. जामनिसांची बेचैनी कायमच होती. निळी गाडी पार्टीकडून आलेल्या त्या दोन फोन नंतर सर्व काही शांत शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता आहे हे जामनिस चांगलेच जाणून होते. आणि मग जामनिसांच्या वरिष्ठांकडून तो फोन आला. हणम्या त्या निळ्या गाडीत होता आणि क्ष चा खून हणम्यानेच केला हे सिद्ध करण्याची जबाबदारी जामनिसांवर सोपविण्यात आली होती. भेदी क्ष एका क्षणात सुटला आपण मात्र ह्यात कायमचे अडकून बसलो असा विचार जामनिसांच्या मनात डोकावलाच! एकंदरीत हे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले होते. मराठी वर्तमानपत्रांसोबत इंग्रजी पेपरनी सुद्धा क्ष च्या हत्येची बातमी सतत तापती ठेवली होती. मुख्यमंत्री हटाव ही महाराष्ट्रातील गेले ५० -६० वर्षे जुनी चळवळ पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर होती. चौकशी पथक एका विशिष्ट बिंदू पर्यंत पोहोचले होते परंतु त्या पुढे जायचे आदेश मात्र त्यांना मिळत नव्हते. चौकशी पथकातील सदस्यांना हा नेहमीचाच अनुभव असल्याने त्यांनीही हा निवांतपणा शांतपणे अनुभवायचे ठरविले होते. नेहमीप्रमाणे सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्या गदारोळात अंतर्गत विरोधक आहेत कि खरे विरोधक आहेत ह्याचा छडा लावण्यात गुंतला होता. जामनिस त्यांना मिळालेल्या आदेशानुसार महाबळेश्वरची थंड हवा अनुभवत बसले होते. मुखवटाधारी वाटाघाटीकर्त्यांच्या गुंतागुंतीच्या चर्चा आटोपल्या. समेटबिंदू ठरविण्यात आला. ह्या सर्व वाटाघाटीत सत्ताधारी गटाला मोक्याच्या काही विधानसभेच्या जागांची तिलांजली द्यावी लागली. परंतु मुख्यमंत्र्यांची खुर्ची शाबूत राहिल्याने ही किंमत तशी कमीच होती. पुढचा मार्ग ठरला होता. चौकशी पथक आपली कामगिरी पूर्ण करणार होते. क्ष च्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारामुळे ही हत्या झाली असा जनतेपुढे मांडण्याचा सर्वमान्य निष्कर्ष ठरला. हणम्याला पुराव्यानिशी पकडण्यात सहकार्य देण्याचे निळी गाडी पार्टीने कबूल केले होते. आता एकंदरीत प्लान परिपूर्ण बनला म्हणून मंडळी आनंदात होती. परंतु ह्या क्लिष्ट समीकरणात असंतुष्ट राहिलेल्या एका गटाची ('य') नोंद कोणी घेतलीच नाही. हणम्याचा गेमच करून मग त्यात आपल्याला हवे त्याला गुंतवायचे अशी योजना ह्या 'य' गटाने आखली. अजून एक भेदी निघाला होता तर! परेरा हणम्याच्या गावाशेजारी असलेल्या थंड ठिकाणी येवून पडला होता. कॅनडाचा व्हिसा दिल्लीच्या वकिलातीतून घ्यायचा त्याचा बेत होता. भ्रमणध्वनी क्रमांक बदलल्याने आपण सुरक्षित आहोत अशी त्याची भावना होती. त्याचे बिल्डिंगचे व्यवहार त्याचा विश्वासू सहकारी पाहत होता. निळी गाडी पार्टी त्यावर लक्ष ठेवून होती. आतापर्यंत त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. फक्त बँकेतून परेराच्या खात्यातून ठराविक कालांतराने रक्कम काढली जात होती. ही रक्कम कुठे जाते ह्यावर निळी गाडी पार्टी लक्ष ठेवून होती. बऱ्याच प्रयत्नाने त्यांना पुण्यापर्यंत त्याचा माग काढण्यात यश आले. आणि एक दिवस अचानक त्यांना परेराच्या थंड हवेच्या ठिकाणाचा पत्ता लागला! हणम्याच्या गावाच्या दिशेने तीन पार्ट्या एकदम निघाल्या होत्या. एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या! हणम्या जन्मठेप सजा मिळवून देण्याचा मनसुबा घेवून निघालेली जामनिसांच्या नेतृत्वाखालील पोलिसपार्टी, 'य' पार्टी आणि परेराच्या शोधार्थ निघालेली निळी गाडी पार्टी! नाट्य अगदी रंगत चालले होते!! हणम्या आणि शैलेश बरेच दिवस विचार करीत होते. हणम्याने शैलेशला काही लपवून न ठेवता सर्व काही सांगून टाकले होते. शैलेशला आपल्या मित्राची काळजी लागून राहिली होती. मुंबई पोलिसात शेजारच्याच गावचा रमेश गेले १० वर्षे नोकरीला होता. मेहनती रमेश आता इन्स्पेक्टर पदाला पोहोचला होता. रमेश आणि शैलेश खास मित्र. शैलेशने रमेशला विश्वासात घेवून हणम्याविषयी सांगितले होते. पेपरात दररोज क्ष च्या बातम्या तर येतच होत्या. सर्व प्लान तयार होताच, 'क्ष हत्येची चौकशी अंतिम टप्प्यात' असा मथळा पेपरात झळकला आणि काही तासातच 'मंडळी गावाला निघाली' असा फोन रमेशने शैलेशला केला. परेरा थोडाफार अस्वस्थ होत होता. थंड हवेच्या ठिकाणी येऊन एक आठवडा उलटला होता आणि तरीही दिल्लीत विसा मुलाखतीची तारीख काही मिळत नव्हती. एकाच ठिकाणी इतके दिवस राहणे धोक्याचे होते. हॉटेलच्या खोलीत बसून बसून तो कंटाळला होता. मुंबईची नंबर प्लेट त्याने एव्हाना बदलली होती आणि हा बदल हॉटेलमधील कोणाच्या लक्षात आला नसावा अशी आशा तो बाळगून होता. आज पहिल्यांदाच आजूबाजूला फेरफटका मारावा असा त्याने विचार केला होता. रमेशचा फोन येताच शैलेश घाईनेच कामाला लागला होता. हणम्याच्या घरी अचानक हणम्या मुंबईला परतणार ह्याची धावपळ सुरु झाली आणि एका तासातच हणम्या शैलेशने बोलविलेल्या गाडीत बसून मुंबईला निघाला. आई वडिलांच्या अश्रुकडे पाहताना हणम्याच्या मनात सुरु असलेल्या वादळाची कोणालाच कल्पना नव्हती. हणम्याची गाडी बस डेपोत जाणार होती. परंतु अचानक मध्येच हणम्याला त्याचा खास मित्र भेटल्याने त्याने गाडी सोडून दिली आणि तो मित्राच्या बाईकवरून निघाला. मित्राची बाईक बस डेपोत न जाता आडबाजूच्या गावाकडे निघाली. बाजूच्या गावातील एका उसाच्या मोठ्या मळ्यात हणम्या उतरला. आणि मळ्यातील कामगारात एकाची वाढ झाली. एकंदरीत शैलेशची घाई कामास आली होती. हणम्या मळ्यात कामाला लागत नाही तोच 'य' पार्टी हणम्याच्या घरापर्यंत पोहोचली होती. घराचा कानाकोपरा त्यांनी उलथून काढला. बिचाऱ्या वयस्क आईवडिलांची त्यांनी रांगड्या भाषेत चौकशी केली. शेवटी नाईलाजाने हणम्या मुंबईची बस पकडून गेला ही बातमी वडिलांनी त्या गुंडांना दिली. हे ऐकताच सर्व काही सोडून ते सर्व गाडी बसले आणि बस डेपोच्या मार्गाची चौकशी करत निघाले. एका शांत गावात झालेल्या असल्या प्रकाराने तिथे एकदम खळबळ माजली. मुंबईपासून इतक्या लांबवर आल्याने तोंडावर फडके टाकून वावरण्याची काळजी ह्या लोकांनी घेतली नव्हती. हणम्याच्या गावात पोहोचताच जामनिस एकदम खुश झाले. हे सगळे प्रकरण आटोपताच काही महिन्यात मुंबईचा गाशा गुंडाळून अशाच एका शांत गावी स्थिरस्थावर व्हायचे मनसुबे ते रचू लागले. जीप एव्हाना बस डेपो पार करून जात होती. जामनिसांच्या दक्ष नजरेने अजून एका सुमोच्या मुंबई नंबर प्लेटची मेंदूत नोंद केली. सुमो पूर्ण नजरेआड होता होता एक ओळखीचा चेहरा दिसल्यासारखे त्यांना वाटले. अर्धा मिनिट गाडी पुढे जात नाही तोच त्यांनी गाडी परत फिरविण्याचा इशारा केला. हा ओळखीचा चेहरा आताच्याच वाटाघाटीतील होता ह्याची त्यांना खात्री झाली. गाडी परत फिरताफिरता त्यांनी वरिष्ठांना फोन करून ही धक्कादायक बातमी दिली. आश्चर्यचकित झालेल्या वरिष्ठांनी जामनिसांना सबुरीने धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. संशय खरा असल्यास त्या लोकांशी थेट पंगा न घेता त्याच्या मागावर राहण्याचे जामनिसांना सांगण्यात आले. संशय तर खरा होताच. मंडळी संपूर्ण बस पिंजून काढत होती. हणम्या न मिळाल्याने निराश झालेली मंडळी सीटची मोडतोड करीतच खाली उतरली. चाणाक्ष शैलेशने एव्हाना हणम्याच्या आईवडिलांना घरून हलविले होते. आणि घरात प्रशिक्षित कुत्रांची फौज लपवून ठेवली होती. य पार्टी बघता बघता गायब झाली. स्वतःचे अस्तित्व लपवायला बसलेले जामनिस त्यांच्या अचानक गायब होण्याचे एकदम वैतागले परंतु वरिष्ठांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला व तिथेच आसपास मुक्काम करावयास सांगितले. गावातून फेरफटका मारून परतलेला परेरा स्वागतकक्षातील पोलीस मंडळींना पाहून एकदम चरकला. जमेल तितका चेहरा लपवित त्याने खोलीत पोबारा केला. 'काही तरीच काय सुदामराव' शैलेश जवळजवळ किंचाळललाच! आपण सुदामरावांकडे यायचा विचार कसा केला हे आठविण्याचा शैलेश प्रयत्न करू लागला. एकंदरीत परिस्थिती गंभीर असल्याचे शैलेशने जाणले होते. अशा वेळी सुदामरावांचा सल्ला घ्यावा हे अनुभवाने शैलेश शिकला होता. परंतु सर्व परिस्थिती सुदामरावांना सांगणे म्हणजे हणम्याच्या खऱ्या रुपाला गावकऱ्यासमोर आणणे! नेमकी हीच गोष्ट टाळण्याचा शैलेश प्रयत्न करीत होता. शेवटी पैश्याच्या आर्थिक व्यवहारातील गैरसमजुतीमुळे हणम्याच्या मागे काही लोक लागले असून ते गावापर्यंत पोहचले असून आता हणम्याच्या जीवाला धोका आहे असे सुदामरावांना सांगण्याचे शैलेशने ठरविले. सुदामरावांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य कळले. अशा परिस्थितीत तोडगा काढायचा तोही तसला नामी असे अनुभवी सुदामरावांनी जाणले. आणि आपला तोडगा शैलेशच्या कानात घातला. हणम्याचा रात्री खून झाला अशी बातमी पसरवायचा तो तोडगा होता. काही वेळ थंड डोक्याने विचार केल्यावर शैलेश तयार झाला. हणम्याला तयार करायला फारसा वेळ लागला नाही. आपल्या गावातच आपल्या मागे असली लोक आलेली पाहून तो एकदम भयभीत झाला होता. ह्या नंतरची पाळी होती हणम्याच्या आई वडिलांना समजविण्याची ! त्यांची समजूत काढावयास फार कठीण जाईल असे शैलेशला वाटत होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ह्या योजनेला एकदम तयार झाले. 'य' पार्टीचे भयानक गुंड बघितल्यावर अशा लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याची त्यांची खात्री पटली. त्याच रात्री निळी गाडी पार्टी गावात येवून पोहचली. त्या परिसरातील एकमेव चांगले हॉटेल म्हणजे जिथे परेरा उतरला होता, तिथेच त्यांनी मुक्काम ठोकण्याचा विचार केला होता. परेरा तसा नशीबवान होता, एक तर निळी गाडी पार्टी आली त्यावेळी तो झोपला होता. नाहीतर मुंबईच्या गाडीतून आलेले असले तगडे लोक पाहून त्याला हृदयविकाराचा झटकाच यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जामनिस आणि मंडळीनी त्या छोटेखानी हॉटेलच्या सर्व खोल्या व्यापून टाकल्या होत्या त्यामुळे निळी गाडी पार्टीला गावातच दुसरा घरगुती आसरा शोधावा लागला. 'य' पार्टीने देखील असाच एक घरगुती आसरा एका शेतात शोधला होता. अशा प्रकारे त्या गावात नाट्यातील तिन्ही पार्ट्या आणि दोन्ही मुख्य पात्रे त्या रात्री हजर होती. एकदा योजना आखली की तिची एकदम परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात सुदामरावांचा हातखंडा होता. दोन तासातच त्या योजनेची संपूर्ण तयारी झाली होती. रात्री २ वाजताच्या सुमारास गावच्या त्या एकदम शांत वातावरणात एकदम आरडाओरडा ऐकू लागला.काही वेळाने एकदम रडण्याचे आवाज ऐकू येवू लागले. निळी गाडी आणि य पार्टीतील बऱ्याच लोकांची त्यामुळे झोपमोड झाली देखील! त्यातील काहींनी खोलीबाहेर येवून हा कसला आवाज आहे म्हणून चौकशी केली सुद्धा! सुदामरावांच्या मास्टरप्लाननुसार त्यांच्या चेल्यानी कोणीतरी मेले असेल आणि अशावेळी गावाबाहेर लोकांनी तिथे जाणे कसे योग्य नाही हे सांगून त्यांची समजूत घातली. ह्यात फारसा रस नसलेली ती मंडळी आपसूकच मग झोपी गेली. हॉटेल लांबवर असल्याने जामनिस आणि परेरा पार्टीची झोपमोड सुद्धा झाली नाही. सकाळ सकाळी राम नाम सत्य हैं च्या स्वरात प्रेतयात्रा चालल्याचे पाहून गावातील लोक एकदम आश्चर्यचकित झाले. एरव्ही कोणाचा पाय मुरगळला तरी गावात ती मोठी बातमी व्हायची आणि इथे गावातील एका मरणाची बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहचू नये ह्याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. हे आश्चर्य ओसरते तोच सर्वांना दुसरा धक्का बसला आणि तो म्हणजे हे प्रेतयात्रा हणम्याची असल्याचा! आता मात्र आश्चर्यांचे रुपांतर क्रोधात झाले. आदल्याच दिवशी हणम्याच्या घरी आणि बस डेपोवर हणम्याचा शोध घेणारी मंडळीच ह्यामागे असावीत अशा निष्कर्षापर्यंत गावकरी येवून पोहचले. आणि त्यात सुदामरावांच्या हस्तकांनी अजून भर घातली. बघता बघता लोक स्मशानाच्या दिशेने निघु लागले ते पोहचण्याआधीच प्रेताला (खोट्या) अग्नी देण्यात आला होता. गावच्या पोलिसांना विश्वासात घेतल्याने सर्व काम सोपे झाले होते. इतक्या घाईत सर्व काही का आटोपण्यात आले असा प्रश्न सर्व गावकऱ्यांनी केला. खुनी लोकांनी हणम्याची दुर्दशा केल्याने इतकी घाई करावी लागली असा खुलासा करण्यात आला. सुदामरावांनी तिथेच जमलेल्या लोकांसमोर एक प्रक्षोभक भाषण केले आता मात्र गावातील सर्व मंडळी फार भडकली होती. गावातील ह्या तापलेल्या वातावरणाची बातमी तिन्ही पार्ट्यापर्यंत पोहचविण्याची काळजी देखील मास्टरप्लान मध्ये समाविष्ट होती. त्याची खात्री पटविण्यासाठी त्यातील निवडक मंडळीना गावातून लपून फेरफटका देखील मारून दाखविण्यात आला. गावातील हे वातावरण पाहून अत्यंत घाबरलेल्या त्या मंडळीनी पुढील अर्ध्या तासात काढता पाय घेतला. निळी गाडी पार्टीला थोडा संभ्रम होता परंतु सर सलामत तर पगडी पचास असा सुज्ञ विचार करून त्यांनीही तिथून पलायन केले. 'य' पार्टी मात्र आधी थोडी खुश झाली. हणम्याचा कट काढण्याचे कारस्थान कसे आपसूक यशस्वी झाले याचा ते पळता पळता विचार करू लागले. परंतु थोड्या वेळाने जामनिस पार्टी हणम्याला का संपवेल असा प्रश्न त्यांच्या डोक्यात आला आणि त्या प्रश्नांचे उत्तर न शोधता आल्याने ते गोंधळून गेले. जामनिस मात्र पूर्ण घाबरून गेले होते. आपल्या हाती सोपविलेली कामगिरी पार न पाडता आल्याचे दुष्परिणाम काय होतील ह्याचा त्यांना अंदाजही बांधता येत नव्हता! हणम्याच्या आकस्मिक खुनाच्या बातमीने सगळीकडे हलकल्लोळ माजविला. थंड हवेत जीव सुखाविलेल्या चौकशी पथकाला अचानक जागृत व्हावे लागले. एकदा का हणम्याला पकडले की सर्व काही प्रकरण बासनात गुंडाळून ठेवावयास सोपे जाणार होते. परंतु आता हणम्याच ह्या भूतलावरून नाहीसा झाला होता आणि त्याच्या खुनाच्या चौकशीचे नुसते लचांड आता चौकशी पथकाच्या मागे लागले होते. ज्या सर्व गटांनी मिळून हे कारस्थान रचले ते आता एकमेकांकडे प्रचंड अविश्वासाने पाहू लागले होते. त्यांच्यातील संवाद आता संपुष्टात आला होता. जे काही प्रयत्न आता करायचे होते ते चौकशी पथकाला प्रभावित करण्याचे. जामनिस गट, य पार्टी त्याच प्रयत्नात गुंतले होते. चौकशी पथकाला मात्र आता सर्व बाह्य घटक सोडून देऊन प्रामाणिकपणे चौकशी करणे भाग पडले होते. क्ष च्या खुनाच्या वेळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी लोकांची त्यांनी साक्ष काढली होती. त्यातील एकाने गोळी मारणाऱ्या माणसाचा चेहरा बघितला. त्याने केलेल्या वर्णनानुसार खुन्याचे रेखाचित्र बनविण्यात आले. हे रेखाचित्र बनविण्यात आले आहे ही बातमी आतल्या वर्तुळात फुटताच निळी गाडी पार्टी प्रचंड बैचैन झाली. आपल्या परीने हे चित्र दाबून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली. त्यांचे खाशा लोकांना फोन चालूच होते की एका खासगी वाहिनीवर हे संशयित खुन्याचे चित्र फुटले. हे चित्र फुटताच जामनिस हादरले. हा संशयित खुनी वाटाघाटीत सतत पुढाकार घेत असे. निळी गाडी पार्टीचा पराकोटीचा संताप झाला होता. अशा प्रचंड अनिश्चित वातावरणातच दुसरी सकाळ उजाडली. जामनिसांना झोप तर लागली नव्हती. बायकोने सकाळी उठवून चहाचा कप त्यांच्या हाती सोपविला. जामनिसांनी चहाचा घोट घेतच दूरदर्शन संच सुरु केला आणि त्यांच्या हातातून चहाचा कप निसटलाच. निळी गाडी पार्टीने आपला बदला घेतला होता. निळी गाडी पार्टीला इतक्या सर्व चर्चेत जी काही माहिती मिळाली होती ती सर्व 'गगनभेदी बातमी' च्या नावाखाली त्या खासगी वाहिनीवर यथासांग झळकत होती. मंत्रालयातील बड्या प्रस्थांच्या नावांचा त्यात पुराव्यानिशी उल्लेख करण्यात आला होता. आता हे प्रकरण व्यवस्थितपणे बड्या घोटाळ्यात समाविष्ट झाले होते. परेराला एकंदरीत ह्या सर्व गोंधळात फुरसत मिळाली होती. निळी गाडी पार्टीचे त्याच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष झाले होते. त्याने ह्याचाच फायदा उठवीत कॅनडाचा विसा मिळविण्यात यश मिळविले आणि एका मध्यरात्रीच्या विमानाने परेरा आपल्या बायकोमुलासहित कॅनडाला रवाना झालाही! कथेतील एक सबकथानक संपल्यासारखे वाटत होते. सुदामराव, शैलेश, हणम्या आणि हणम्याचे आईवडील पुढच्या योजनेच्या तयारीत होते. सुदामरावांनी हणम्यासाठी दूरवर मराठवाड्यात राहणाऱ्या आपल्या मामेभावाच्या मुलीचे स्थळ हणम्यासाठी आणले होते आणि हणम्या पंधरा दिवसातच लग्नाचा बार उडवून तिथेच स्थिरस्थावर होण्याचा विचार करीत होता. सुरुवातीला ह्या प्रकरणात नावे जाहीर झालेल्या मंत्रालयातील लोकांना थोडा फार धक्का बसला. परंतु एक दोन दिवसात ते सावरलेही. त्यातील दिग्गज लोकांनी अशी कित्येक प्रकरणे पाहिली होती. लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते ह्यावर त्यांचा विश्वास होता. आतापर्यंत धरणाचे कंत्राट सोपवण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली गेली होती. हे सर्व प्रकरण CBI कडे सोपविण्यात आले होते. जामनिसांना एकंदरीत काय चालले आहे हे कळेनासे झाले होते. बरेच दिवस त्यांना मंत्रालयातील कंपूचा फोन / निरोप वगैरे आला नव्हता आणि रवानगी बाहेरच्या कामावर करण्यात आली होती. असे असले तरी त्यांचे मन मात्र मंत्रालयातच राहिले होते. मंत्रालयातील कंपू मात्र सर्व सारवासारव करण्याच्या मागे लागली होते. इतका मोठा मोहरा असल्या प्रकरणात अडकवून चालणार नव्हता. त्यामुळे पुराव्यासकट एखाद्या छोट्या प्याद्याला ह्यात अडकवायचे असे ठरत होते. आणि छोटे प्यादे म्हणून जी दोन तीन नावे पुढे येत होती त्यात जामनिस सतत अग्रस्थानी राहत होते. आणि दोन दिवसांच्या अखेरीस जामनिस ह्यांची निवड पक्की करण्यात आली. जामनिस निवडीच्या बाबतीत कितीही दुर्दैवी ठरले तरी त्यांच्या विषयी सहानुभूती असलेले एक दोघे मुख्य कंपूत होतेच. मध्यरात्री १२ वाजता जामनिसांचा फोन खणखणला. गाढ झोपेत असलेल्या जामनिसांनी त्रासिक मुद्रेनेच फोन उचलला. समोर पटवर्धन होते. पटवर्धनांनी जामनिसांना मोजक्या शब्दात सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आपण एक जीप घेवून ड्रायव्हर पाठवत असल्याचे ते सांगत होते आणि ३० मिनिटात तयार राहण्याचा त्यांनी सल्ला जामनिसांना दिला. जामनिसांची पत्नी मागून हे सारे बोलणे ऐकत होती. तिने नजरेनेच जामनिसांना धीर दिला. आपल्या पत्नीच्या मनोबलाविषयी जामनिसांना नेहमीच कौतुक वाटत आले होते. आणि ३० मिनिटानंतर महत्वाच्या सामानासकट तिच्या आणि मुलासोबत जीपमध्ये शिरताना जामनिसांना ह्या ही परिस्थितीत तिचे फार कौतुक वाटत होते. हणम्याचे लग्न आता आठवड्यावर आले होते. सर्व गुपचूप मामला असल्याने गावात तर आमंत्रणाची काही सोयच नव्हती. त्यामुळे आई वडील काहीसे हिरमुसले झाले होते. त्याही परिस्थितीत रत्नागिरीला राहणाऱ्या आत्याला घेवून येण्याची भुणभुण आईवडिलांनी त्याच्या मागे लावली होती. बऱ्याच दिवसांनी शैलेशबरोबर भटकायला मिळणार म्हणून हणम्याहि खुश झाला होता. भूमिगतासारखी त्याची अवस्था असल्याने पहाटे एक वाजताच त्यांची जीप रत्नागिरीला निघाली होती. हा सर्व खर्च केवळ न केलेल्या खुनाची कमाई आणि वडिलांना लागलेल्या लॉटरीच्या पैशानेच झेपतो आहे असा विचार राहून राहून भरधाव धावणाऱ्या जीपमध्ये बसलेल्या हणम्याच्या मनात येत होता. मुंबई गोवा महामार्गावर एका मोठ्या नाट्यातील दोन महत्वाची पात्रे दोन वेगवेगळ्या जीपमधून थोड्याशाच अंतरावर गोव्याच्या दिशेने चालली होती. सकाळच्या मंद हवेत जामनिसांना छान झोप लागली होती. आयुष्य काय रंग दाखवतंय असा विचार राहून राहून त्यांच्या मनात येवून गेला होता. अचानक जीपला लावलेल्या जोरदार ब्रेकने जामनिसांचा निद्राभंग झाला. त्यांनी वैतागुनच त्रासिक मुद्रेने ड्रायवर कडे पाहिले. ड्रायव्हरने नजरेनेच त्यांना समोरच्या दिशेने खुणावले. समोर बस बाजूच्या छोट्या खड्ड्यात पडली होती. खड्डा काही खोलवर नसल्याने सुदैवाने प्रवासी केवळ जखमांवर निभावले होते. बस खड्ड्यात पडण्य़ाआधी तिने एका ट्रकला धडक दिली होती. त्यामुळे वाहनांची रांगच लागली होती. मनाने सदैव दुसऱ्याला मदत करायला तयार असणाऱ्या जामनिसांना ह्याही परिस्थितीत राहवले नाही. त्यांनी लगेच बसकडे धाव घेतली. परंतु एकंदरीत परिस्थिती आटोक्यात आली होती. आधीच तिथे दोन तरुण सर्व प्रवाशांना मदत करीत होते. त्यामुळे जवळजवळ सर्व प्रवासी आता रस्त्याच्या कडेला येवून बसले. जामनिस कौतुकाने ह्या तरुणांकडे पाहत होते. त्यातल्या एकाचे त्यांनी आभारहि मानले दुसरा मात्र अजूनही पाठमोरा होता तो एका वृद्ध आजोबांना उचलून आणत होता. आजोबांना उचलून आणल्यावर त्याने मागे वळून पाहिले आणि..... पटवर्धन ह्यांचा फोन अगदी वेळेत आला होता. सकाळीच सहा वाजता जामनिसांच्या घरावर CBI ची धाड पडली होती. परंतु जामनिस मात्र त्यांना सापडले नव्हते. प्रशासनीय कामात अगदी कुशल असणाऱ्या पटवर्धनांनी दूरध्वनीची नोंद गायब सुद्धा केल्याने जामनिस असे अचानक गायब कसे झाले ह्याचा अचंबा CBI बरोबर मंत्रालयातील कम्पुलाही वाटत होता.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
भेदी

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जडले नाते ढगांशी !
मागच्या जन्मी मी आदिमानव होतो त्यावेळची गोष्ट! जंगलातून फिरताना अचानक सामोऱ्या येणाऱ्या नदीच्या विस्तृत पात्रातील अत्यंत वेगाने वाहणाऱ्या जल...

-
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी स...
-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा