मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

गुलजार आंधी चित्रपट



हा एक सत्तरच्या दशकातील गाजलेला चित्रपट. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. एका महत्वाकांक्षी स्त्रीने तरुणपणात आपल्या संसारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, ९ वर्षानंतर पतीशी झालेली अचानक भेट. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ..एक सुरेख चित्रपट. ह्या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाददेखील थेट हृदयाला भिडणारे. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेनचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते. बर्याच वेळा असंच होत बघा, प्रेमिक एखाद्या गुणावर भाळून जातात. नायक नायिकेला जवळच्याच एका भग्न जुन्या वास्तूच्या स्थळाविषयी माहिती देवून म्हणतो की जेवणानंतर आपण तिथे फिरायला जात जाऊ, त्यानिमित्ताने ह्या उजाड इमारतीला थोडे जीवन तरी लाभेल.
ह्या चित्रपटातील ३ गाणी ऐकणार्यास मंत्रमुग्ध करून टाकतात. चित्रपटाच्या कथेत ही गाणी एकदम चपलख बसतात अगदी देहात वसणाऱ्या हृदयाप्रमाणे!
१> तुम आ गये हो नूर आ गया हैं
तू माझ्या जीवनात आल्याने माझ्या जीवनाचा कायापालट झाला आहे. जीवनात रस निर्माण झाला आहे. नाही तर जीवन एकदम भकास चालले होते. तू माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला आहेस. तू येण्याआधी मी एक दिशाहीन जीवन जगात होतो. कोठून कोठे चाललो आहे हे माझेच मला कळत नव्हते. पण मला विश्वास होता की जीवनाच्या एका वळणावर आपण परत भेटू. तुझी इच्छा मला तुझ्याकडे खेचून आणत होती.
२> इस मोड से जाते हैं
बहुदा हे गाणे चित्रपटात दोनदा येत. पहिल्यांदा नायक नायिका लग्नाआधी भेटतात तेव्हा आणि दुसर्यांदा नऊ वर्षानंतरच्या भेटीच्या वेळी. आयुष्याच्या ह्या वळणावर आपण भेटलो आहोत. इथून जाणारे काही रस्ते वेगवान (नायिकेचा महत्वाकांक्षी मार्ग) आहेत तर काही सुस्त (नायकाने साध आयुष्य जगण्याचा घेतलेला निर्णय) आहेत. ह्या वळणावरून पुढे बनणारी काही नाती चिरेबंदी वाड्याप्रमाणे भरभक्कम आहेत तर काही काचेच्या महालासारखी क्षणभंगुर आहेत. एका सुसाट वादळाप्रमाणे जाणारा हा एक मार्ग माझ्या मार्गाजवळ आल्यावर मात्र काहीसा बुजरा होतो. ह्या अनेक मार्गांतील एक मार्ग असा असावा जो मला तुझ्याकडे घेवून जाईल.   
३> तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं एक तू सोडलीस तर माझी जीवनाविषयी काहीच तक्रार नाही. पण तुझ्यावाचूनच्या जीवनाला जीवन म्हणणे जीवावर येते. माझी जीवनरेखा तुझ्या पाऊलवाटेशी मिळतीजुळती असती तर किती बरे झाले असते. तू जर बरोबर असलीस तर आयुष्यात ध्येयांची काही कमतरता नाही. मग मध्येच संवाद येतो ह्या ज्या फुलांच्या माळा दिसतायेय त्या माळा नाहीयेत अरबी भाषेतील रचना आहेत दिवसा स्पष्ट दिसतात दिवसा हा परिसर पाण्याने भरलेला असतो. नायिका त्याला अडवून म्हणते दिवसाच्या गोष्टी का करतोस, मी थोडीच दिवसा इथे येवू शकणार? मग नायक आकाशातील चंद्राकडे वळून म्हणतो हा दिवसा नसतो, रात्रीच येतो. इथे परिस्थितीमुळे दिवसा नायकाला भेटू न शकणारी नायिका लक्षात घ्या. पण मग कधी कधी अमावस्या येते, (कृष्णपक्ष), खरेतर कृष्ण पक्ष १५ दिवसांचा असतो पण या वेळी बराच काळ (९ वर्ष) टिकला. इथे नायिका भारावून म्हणते नऊ वर्षांचा दुरावा फार कठीण होता नाही? खरेतर आपल्या महत्वाकांक्षी वृत्तीमुळे नायिकेने स्वतंत्र मार्ग पत्करलेला आहे. पण अशा क्षणी तिची नायकाच्या बाहुपाशात येवून आपली सर्व दुःख अश्रुद्वारे मोकळे करून टाकण्याची इच्छा अनावर होते. पुढची पंक्ती पहा. तुम जो कह दो तो आज कि रात चांद डूबेगा नही! नऊ वर्षांनी आज एकमेकाला परत भेटलेलो आपण, जर तुझी इच्छा असेल तर तर माझ्या आयुष्यातील ही रात्र , तुझ्या रूपाने आलेला चंद्र असाच कायम राहील. हे नायकाने नायिकेला आपल्याबरोबर राहण्यासाठी केलेले आर्जव किती अप्रतिमरीत्या रुपकाद्वारे मांडले गेले आहे.
घर असो वा आंधी, प्रेमी युगुलाचा वास्तविक जीवनातील प्रवास गाण्याभोवती गुंफला गेला आहे. प्रत्येक मनुष्याचे एक स्वत्व असत, प्रेमात असताना हे स्वत्व फुलून निघत, उजळून निघत. लग्नानंतर समोर येत ते व्यावहारिक जीवनातील कठोर सत्य. ह्यात दोन वेगळे जीव आपापली स्वत्व घेवून जीवन जगत असतात. जीवनरगाड्यात आपल स्वत्व तर हरवून जात तसच आपल्या साथीदाराच्या स्वत्वाच्या अस्तित्वाचा देखील कधी कधी विसर पडू शकतो. गुलजार यांची ही गाणी ह्या स्वत्वाभोवती कशी गुंफली जातात हे अनुभवण शब्दांच्या पलीकडल असत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाच ग घुमा !

  शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे...