मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद


वसईमध्ये चिन्मय गवाणकर आणि मित्रमंडळी दोन - तीन संघटनाच्या माध्यमातून सुरेख असे सामाजिक प्रबोधन घडविण्याचे कार्य गेल्या काही वर्षात करीत आले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि जागरूक नागरिक संस्था वसई ह्या दोन संस्था ह्या बाबतीत प्रामुख्याने गणल्या जातील. १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागरूक नागरिक संस्था वसई ह्यांनी प्रमुख राजकीय पक्षांना राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची एक प्रश्नावली सादर केली होती आणि ह्या प्रश्नांबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय स्पष्ट करण्याची विनंती केली होती. परंतु दुर्दैवाने दिलेल्या मुदतीत ह्या प्रश्नावलीला उत्तर देण्याची तसदी एकाही पक्षाने घेतली नाही. परंतु त्याने नाउमेद न होता शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ह्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना एका व्यासपीठावर बोलावून लोकसभेसाठी आपल्याच पक्षाची निवड लोकांनी का करावी हे पटवून देण्याचे आव्हान करण्यात आले होते. समाधानाची गोष्ट म्हणजे ह्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना पाठवलं आणि एका सुरेख बौद्धिक चर्चेत सहभाग घेतला. मी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला तो आपल्या सर्वांना मिळावा म्हणून ही ब्लॉग पोस्ट! ह्यातील माझ्या नोंदी १०० टक्के अचूक असतीलच असे नाही त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी! ह्या परिसंवादात भाग घेतलेले विविध पक्षांचे प्रतिनिधी ह्या प्रमाणे डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (भाजपा) श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी) कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M) श्री. राजीव पाटील (बहुजन विकास आघाडी) न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा सचिव चिन्मय आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर ह्यांनी ह्या कार्यक्रमाच्या संचालनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या आरंभी चिन्मयने सर्व प्रतिनिधींना ह्या चर्चेचे स्वरूप राष्ट्रीय पातळीवरील धोरणासंबधित मुद्द्यांशी सीमित ठेवत तिला प्रत्यक्ष उमेदवारांसंबंधित मुद्द्यांवर न आणण्याचे आवाहन केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सर्वांनी ते पाळले. प्रत्येक प्रतिनिधीला वीस मिनिटाची मर्यादा आखून देण्यात आली होती. श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी) सर्वप्रथम आम आदमी पक्षाचे श्री गजानन खातू आपल्या पक्षाचा जाहीरनामा / धोरण स्पष्ट करण्यासाठी व्यासपीठावर आले. भ्रष्टाचार हा केवळ एकच मुद्दा घेऊन आप पक्ष आपला लढा लढत असल्याचा काहीसा गैरसमज समाजात दुर्दैवाने पसरला असून ती सत्यपरिस्थिती नाही; शेती, संरक्षण, अंतर्गत सुरक्षा अशा अनेक मुद्द्यासहीत एकूण ३६ मुद्दे असलेला आप पक्षाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ह्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त भ्रष्टाचार, प्रशासकीय कारभार (Governance) अशा व्यापक मुद्द्यावर चर्चा होईल अशी आपली अपेक्षा होती परंतु मुख्य पक्षांनी सर्व रोख व्यक्तीकेंद्रित चर्चेकडे वळविला आहे. प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचे वैशिष्ट्य असते जसे की डाव्या पक्षांची बंदिस्त विचारसरणी, उजव्या विचारसरणीचा भाजपा, गेल्या काही वर्षात मुक्त आर्थिक धोरणाचा अंगीकार करणारा काँग्रेस पक्ष वगैरे. खरे तर समता, बंधुता ह्या सारख्या जीवनमुल्यांना खोलवर स्पर्श करणारी आपली भारतीय घटना अंगीकारणे हाच एक मोठा जाहीरनामा असू शकतो. ह्या घटनेने दाखवून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे हे ही मोठे काम आहे. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा दोन पातळीवर असतो. राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल विधेयक वगैरे मार्ग आप पक्षाने अनुसरले आहेत. परंतु दैनदिन व्यवहारातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. स्थानिक पातळीवर समित्या नेमल्या जातील. पोलिस यंत्रणा ह्या समित्यांबरोबर समन्वय साधेल. इथे खरे तर खातू ह्यांनी answerable असा शब्दप्रयोग केला. आप पक्ष स्वराज बिलाचा पाठपुरावा करेल. लोकपाल कायद्याच्या अखत्यारीत पंतप्रधानसुद्धा यावेत असा प्रयत्न केला जाईल. सध्याची निवडणूक प्रसारमाध्यमाद्वारे लढविली जात आहे. ह्यात पैशाचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. निवडणुकीच्या सद्य प्रणालीत बदल घडवून आणण्याचा आप पक्षाचा प्रयत्न राहील. हल्ली असे आढळून येते की एखाद्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात २ - ३ टक्क्यांचा जरी फरक पडला तरीसुद्धा त्यांना मिळालेल्या जागांमध्ये १० - १०० इतका लक्षणीय बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात राजकीय पक्षांना जागा मिळाव्यात ह्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आप पक्षाचा मानस आहे. त्यानंतर खातू ह्यांच्या बोलण्याचा रोख भांडवलशाहीकडे वळला. आज खुल्या स्वरुपात भांडवलशाही जरी अस्तित्वात नसली तरी छुप्या स्वरुपात ती नक्कीच आहे. ज्याच्या उत्पादन खर्च केवळ २ रुपये १० पैसे प्रतीयुनिट आहे अशी गोष्ट एक मोठी कंपनी ४ रुपये २० पैशाच्या किमान दराने वीज विकते ही भांडवलशाहीच आहे. आपल्या देशाचा GDP ८ - १०% टक्क्यांनी वाढले ह्यात भांडवलशाहीचा वाटा किती? वेतनआयोगामुळे पगारवाढ होते तीही GDP मध्ये समाविष्ट होतेच ना! आपल्या देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पादन हे कृषीउत्पादन आहे पण त्यावर देशातील ५० टक्के जनता अवलंबून आहे. आज वसईची स्थिती अशी आहे की इथे केवळ १० टक्के वस्तूंची निर्यात केली जाते पण ९० टक्के वस्तू आयात केल्या जातात. आपला देश सोने आणि तेलाचा मोठा उपभोक्ता आहे. मध्यंतरी आपल्या देशाची तुट कमी झाली त्यात मुख्य कारण आपण त्या कालावधीत सोन्याची आयात कमी केली हे होते. आपल्या देशातील शेतीविषयक चर्चा प्रामुख्याने शेतीउत्पादनाच्या अनुषंगाने होते. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. आप पक्ष शेतकऱ्यांसाठी कमिशनचा पाठपुरावा करील. शेतकऱ्यांना उत्पनाचे संरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करतं. परंतु पुढील मोसमात शेतकरी उभा कसा राहणार ह्याचा विचार कोणी करीत नाही. मधल्या सहा महिन्यातील शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे काय? मुख्य खनिज, पाणी ह्यासारख्या स्त्रोतांवर सरकारचं जरी नियंत्रण असलं तरी त्याच्या वापरासाठी जनतेची संमती आवश्यक असायला हवी. पावसाच्या पाण्यावर स्थानिक जनतेचा हक्क असायला हवा. अशा शब्दांत खातू ह्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M) कम्युनिस्ट पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे निधन झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित प्रतिनिधी ह्या समारंभास हजर राहू शकले नाहीत आणि त्याऐवजी कॉम्रेड प्रकाशन ह्यांनी इथे उपस्थिती लावली. १९९७ साली मी केमटेक्स मध्ये असतानाचे प्रकाशन हे माझे सहकारी! आपल्या पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील समस्यांवर १७ मुद्द्यांचे एक कागदपत्र प्रसिद्ध केले आहे. आधी खातू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात पक्षाला लोकसभेत जागा मिळायला हव्यात. प्रत्येक पक्षाने आपल्या पसंतीक्रमानुसार आधीच एक यादी प्रसिद्ध करावयास हवी. समजा त्या पक्षास टक्केवारीच्या प्रमाणानुसार १० जागा मिळत असतील तर ह्या यादीतील पहिले १० उमेदवार लोकसभेत निवडले जातील. राज्यपातळीवर जे निर्णय घेतले जातात त्यासाठी विधानसभेची परवानगी असणे आवश्यक असावे. तेलंगणा निर्मितीचा निर्णय लोकसभेत घेतला गेला हे चुकीचे आहे. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही निर्णय केवळ केंद्रातील मंत्रिमंडळ घेते ते चुकीचे आहे. ह्या निर्णयांत लोकसभेतील सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मध्यंतरी प्रणव मुखर्जी अमेरिकेत असताना संरक्षणविषयक एक करार होऊ घातला आणि मग अचानक तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना तातडीने अमेरिकेत नेण्याची वेळ आली. ह्या प्रक्रियेत ह्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा सुरुवातीपासून समावेश असणे गरजेचे होते. आमचा पक्ष संशोधनास योग्य प्रोत्साहन देईल. देशात आज विविध प्रकारे लोकसंख्येचे स्थलांतर सुरु आहे. जसे की मुंबईतील जनता वसईत स्थलांतरित होत आहे. दीड - दोन कोटींची सदनिका विकत घेणे बहुसंख्य जनतेच्या आवाक्याबाहेर आहे. अशा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावयास हवे. सर्व जेष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन कसे मिळेल ह्याचा विचार करावयास हवा. आज आपल्या देशातील गरिबांची परिस्थिती फार बिकट आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण, लसीकरण ह्यासारख्या मुलभूत सोयी पोहोचत नाहीत. आपल्या देशातील गरिबांची संख्या वाढत चालली आहे असे आपण म्हणतो. आपल्या अपत्यांच्या जगण्याची शाश्वती नसल्याने अधिक अपत्य होऊन देण्याकडे गरीबांचा कल असतो. आज राजकारणात विविध कार्यकर्त्यांची सेवा पैसा फेकून विकत घेतली जाते. दिवसाचा दर ७५० ते १००० रुपयांपर्यंत असतो. ह्याला आमचा पक्ष अपवाद आहे. करोडो रुपये प्रसारमाध्यमांवर, परदेशी कन्सल्टिंग फर्मवर खर्च केले जातात. एखादा ब्रैंड निर्माण करण्यासाठी अफाट पैसा राजकारणात सुद्धा खर्च केला जातो. मोठमोठाल्या उद्योगांनी, विविध वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीत न भूतो न भविष्यति असा रस घेतल्याचे दिसून येते. मुसोलिनी ज्याचे नाव fascism शी निगडीत आहे त्याने म्हटले होते, 'fascism should rightly be called corporatism'. आज भारतात आपणास मोठमोठाले उद्योग आणि राजकीय शक्तींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया दिसत आहे. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा अशा प्रकारचा फेसिझम उदयास येताना दिसतोय. सुमारे वीस वर्षांपूर्वी भारतात उदार आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि विदेशी गुंतवणुकीस चालना देण्यात आली. बऱ्याच वेळा विदेशी गुंतवणूक भांडवलशाहीला प्रोत्साहन देते. त्यांना समाजकल्याणकरणाऱ्या योजनांवर पैसा खर्च केलेला आवडत नाही. समाजकल्याणकरी योजनांच्या अभावी दूरदृष्टीने पाहिले असताना समाज काहीसा दुर्बल बनतो. रोजगाराचे प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले असे आपण म्हणतो, पण १.५ % ह्या दराने वाढणाऱ्या लोकसंख्येचे काय? आणि बरेच रोजगार (उदाहरणार्थ कुरियर बॉय, बूटपॉलीश करणारे) असे आहेत की ज्यात आत्मसन्मान नाही. आमचा पक्ष ट्रेड युनियनआधारित राजकारणास प्रोत्साहन देईल. हक्काधारित राजकारण करण्याकडे आमचा कल राहील. अन्नाचा हक्क सर्वांना मिळावा असा आमचा प्रयत्न राहील. काँग्रेसने फूड बिल आणले. पण ते केवळ वार्षिक उत्पन्न ५९००० रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या लोकांसाठी आहे. ह्या उत्पन्नाखालील लोक हे आर्थिकदृष्ट्या अगदी दुर्बल असे मानले जाऊ शकतात. आमचा पक्ष बहुतांशी लोकांसाठी अन्नाचा हक्क आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारत हा देश विशाल आहे. ह्या देशावर कोणी एकच पक्ष सत्ताधारी बनू शकतो असे मानणे चुकीचे राहील. त्यामुळे आमचा पक्ष सदैव युतीच्या सरकारांच्या तत्वाचा पुरस्कार करीत आला आहे. ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार नाहीत तिथे आम्ही आप पक्षाला विनाअट पाठींबा देऊ. डॉ. सहस्त्रबुद्धे भाजपा रुईया कॉलेजात वर्टी सरांच्या शिक्षकी पेशातील कालावधी मी अनुभवला आहे. १९७७ सालानंतर काँग्रेसेतर पक्ष सुद्धा शासन देऊ शकतात हा समज हळूहळू पसरू लागला होता. ह्या कालावधीत भाजपाने काँग्रेसनंतरचा दुसरा क्रमाकांचा पक्ष म्हणून आपले स्थान पक्के करण्यास सुरुवात केली होती. १७ राज्यात भाजपाने स्वतः किंवा मित्र पक्षांबरोबर आघाडीचे सरकार आणले आहे. हा तुलना करण्यासाठी ऐवज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे १९९८ ते २००४ ह्या कालावधीतील वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची कामगिरी आणि २००४ ते २०१४ ह्या कालावधीतील काँग्रेस पक्षाची कामगिरी हा तुलना करण्यासाठीचा ऐवज उपलब्ध आहे. गुजरात राज्यातील विकास आकड्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. पण मुख्य म्हणजे चांगले जीवन जगण्याच्या जनतेच्या आकांक्षेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारची कामगिरी पाहिली असता विकासाचा घटता दर, गमावलेली आंतरराष्ट्रीय पत ह्या गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. आमचा पक्ष अधिकाराधिष्टीत राजकारणाचा पाठपुरावा करील. गेल्या दहा वर्षात नेतृत्वाची अकार्यक्षमता प्रामुख्याने नजरेत भरते. पूर्वी चीन आणि भारत ह्यांची जोडीने तुलना केली जात असे. परंतु सध्या तसे आढळत नाही. आपणास दुहेरी नेतृत्व पहावयास मिळाले. पंतप्रधानांकडे असलेली मर्यादित निर्णयक्षमता पहावयास मिळाली. भ्रष्टाचार, कुशासन ह्या समस्यांनी आपणास व्यापले गेले आहे. सकारात्मक, हेतुपूर्वक राजकारण करण्याकडे भाजपचा कल राहील. भारतात एकंदरीत १३५० च्या आसपास राजकीय पक्ष आहेत. त्यातील सुमारे ५० पक्षांचे विधायक / लोकप्रतिनिधी आहेत. ह्या ५० पक्षांपैकी ४० पक्ष घराणेशाहीशी संबंधित असल्याचे आपणास आढळून येते. उरलेल्या १० पक्षांपैकी ३ कम्युनिस्ट पक्ष आहेत आणि १ पक्ष भाजपा हा आहे. Politics ऑफ performance (कामगिरीआधारित राजकारण) करण्याकडे आमचा कल राहील. सध्या एकंदरीत सामान्य जनतेच्या मनात लोकशाही, निवडणुका ह्या प्रकाराविषयी औदासिन्य आल्याचे आढळून येते. लोकशाहीने माझ्या ताटात काय वाढलं? हा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे. परंतु भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे तिथे बऱ्याच वेळा ते पुन्हा निवडले गेल्याचे आपणास आढळून येते. शहर वाहतुकीचा सफल प्रयोग झालेले अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे. कृषिविकासाचा दर गुजरातमध्ये १० टक्के तर मध्य प्रदेशात १६ टक्के आहे. सर्वसमाविष्ट विकास (inclusive / participative development) करण्याकडे आमचा कल राहील. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आम्ही हाताळू. संरक्षणखात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे जे आरोप होत आहेत त्याकडे आम्ही लक्ष देवू. आपल्या भारतात नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली जी चार पाच राज्ये आहेत त्यांतील प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येतो. हे समन्वय आणण्याकडे आमचा कल राहील. बालसंगोपन, आरोग्य ह्या मुद्द्यांकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष पुरवू. मातृत्वाच्या सुट्टीसोबत पितृत्वाची रजासुद्धा मिळावी असा आमचा प्रयत्न राहील. नोकरीवर जाणाऱ्या स्त्रियांच्या अपत्यांसाठी पाळणाघराची सोय केली जाईल. अपत्यपालनासाठी मातेला दीर्घकालीन मुदतीची रजा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कुपोषण ही एक गंभीर समस्या आहे त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोयाबीन आपण निर्यात करतो आणि ते परदेशात डुक्करांना खाऊ घातले जावून त्याचा मासनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. हेच सोयाबीन वापरून त्याचे लाडू बनवले असता कुपोषणग्रस्त भागात त्याचा उपयोग मुलांना खाद्य म्हणून केला जाऊ शकतो असे आढळून आले आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आपल्या देशातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे अगदी वाईट स्थितीत आहेत. आर्थिक दृष्ट्या ती फायदेशीर नाहीत. पण त्यांच्याकडे सभोवताली बराच मोठा परिसर असतो. त्याचा व्यावसायिक वापर करून ह्या आरोग्यकेंद्रांची स्थिती सुधारता येऊ शकते. अशा उदाहरणात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा योग्य मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न राहील. छोट्या मुदतीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आम्ही पाठपुरावा करू. जनतेच्या भोवतालच्या परिसरात चांगल्या शाळा असाव्यात असा आमचा प्रयत्न राहील. बऱ्याच वेळा प्रसार आणि गुणवत्ता ह्याचे व्यस्त प्रमाण दिसून येते. आपल्या देशात उच्च शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. रोजगाराची उपलब्धता हा प्रश्न राहिला नसून रोजगार देण्यालायक युवक उपलब्ध नाहीत हा खरा प्रश्न आहे! कला आणि विज्ञानक्षेत्रातील पदवीधरांना पाच ते सहा महीने इंटर्नशिप मिळावी असा आमचा प्रयत्न राहिला. एका खिडकीत परमिट मिळून देण्याकडे आमचा प्रयत्न राहील. सरकारी कार्यालयात काम होत नाही असा आपला अनुभव असेल परंतु मध्य प्रदेशचे उदाहरण पहा. तिथे जन्म, मृत्यू दाखला आणि इतर नेहमीच्या कामासाठी सरासरी किती वेळ लागेल ह्याचा आलेखच मांडलेला असतो. त्याच्या पलीकडे वेळ लागल्यास त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पुरुषांच्या मानासिकेत बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. गुजरात राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रशिक्षण दिले जाते. आम्ही अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देऊ. शेती आणि प्रयोगशाळा ह्यांची सांगड घालू. जमिनीचे पृथ्थकरण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. नद्या जोडण्याचा जो प्रकल्प आहे त्यातील पर्यावरणाला हानिकारक असलेला भाग काढून टाकून त्याची अंमलबजावणी करू. भूजलाची पातळी वाढविण्याचे आमचे प्रयत्न राहतील. पर्यायी उर्जास्त्रोत विकसित करू, कालव्यावर सोलर पत्रे बसवून ऊर्जानिर्मितीचा जो प्रयोग भाजपशासित राज्यात झाला तसेच प्रयोग करू. आज सामान्य जनतेत एका प्रकारचे औदासिन्य (sense ऑफ given up) आला आहे ते आम्ही दूर करू. महाशक्ती बनण्याचे भारताचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते. शेवटी एका वाक्य सांगू इच्छितो - थोर माणसे काही वेगळ्या गोष्टी करीत नाहीत ते नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात!) राजीव पाटील - बहुजन विकास आघाडी राजीव पाटील हे वसईत राजीवनाना ह्या नावाने ओळखले जातात. वसई विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पालघर जागेसाठी बहुजन विकास पार्टीचे उमेदवार बळीराम जाधव ह्यांना पाठींबा जाहीर केला आहे. राजीव पाटील ह्यांच्या भाषणात त्यांच्या पक्षाने केलेल्या कार्याविषयीच्या आकडेवारीचे बरेच संदर्भ होते. त्यातील जमले तितके इथे उद्धृत करीत आहे. 'मी सध्या पंच्चावन वयात प्रवेश केलेला आहे. माझं लहानपणाचा काळ मी आठवतो किंवा इथे उपस्थित असलेले माझ्याहून ज्येष्ठ नागरिक जेव्हा पन्नास - साठ वर्षापूर्वीचा काळ आठवतील त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती. विरार गावात अवघ्या ४ मोटारी होत्या. त्यातील एक भाऊसाहेब वर्तकांच्या घरातील होती. गुजरातला जायचे असले तर भिवंडीमार्गे जावे लागे. त्या दिशेने जाणाऱ्या अगदी मोजक्या गाड्या होत्या. गेल्या ६० वर्षात चित्र बरेच पालटले आहे. भारताने खूप विकास साधला आहे. ज्या गुजरात राज्याचे हल्ली सतत उदाहरण दिले जाते तिथे अमूल डेयरीची स्थापना करण्यात आली आहे, मुंबईत सागरी सेतू बनविला गेला, नर्मदा सरोवर सारखी मोठी धरणे बांधण्यात आली. इंदिरा गांधींच्या कालावधीत भारतीय सेनादलाचा जगातील पहिल्या ५ देशांत क्रमांक लागला. भारताने यशस्वीपणे अणुचाचणी केली. ती इतकी गुप्तपणे करण्यात आली की जगातील महाशक्तींना सुद्धा त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यावेळी 'बुद्ध हसला' हे सांकेतिक नाव वापरण्यात आले होते. मला ह्या नावाविषयी बरेच कुतूहल होते. एका ज्येष्ठ व्यक्तीकडे ह्याविषयी विचारणा केली असता त्यांनी शांततामय मार्गासाठी अणुशक्तीचा वापर करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याने शांततेचा संदेश देण्याऱ्या बुद्धाच्या नावाचा वापर केल्याचे स्पष्ट केले. राजीव गांधीनी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतात माहिती आणि तंत्रज्ञान युग बरेच आधी येऊन स्थिरावलं असं म्हणता येईल. नरसिंहराव, मनमोहनसिंग ह्या नेत्यांनी जागतिकीकरणाचा प्रसार केला आणि भारताला एक जागतिक शक्ती बनविण्याच्या मार्गाकडे नेलं. भारतातील लोकशाहीशी तुलना फार तर अमेरिकेसोबत होऊ शकते. भारतात पहिल्या निवडणुकीपासून सर्वांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. बऱ्याच वेळा भारत आणि चीनची तुलना केली जाते. पण चीनमध्ये पोलादी भिंतीआड मानवी हक्कांचे कसे उल्लंघन चाललं आहे ते कोणालाच कळू शकत नाही. मी चीनमध्ये चार पाच वेळा गेलो. पण केवळ शहरातील रम्य भाग आपणास पहावयास मिळतो. गावात काय चाललंय ते कळायला मार्ग नाही. तिथल्या चौकात ५ लाख विद्यार्थ्यांना चिरडलं जातं. तर भारताला सन्मानाने जगासमोर नेणारा पक्ष म्हणून काँग्रेस ओळखला जाईल. अशा ह्या पक्षाशी आम्ही युती केली आहे. प्राथमिक शिक्षणावर भर देण्याचा आमचा भर राहील. ग्रामीण भागात ITI शिक्षण देणाऱ्या संस्था उभारण्याचा प्रयत्न करू. दर ५०००० लोकसंख्येमागे एक ITI संस्था उभारली जाईल. उच्च शिक्षणाद्वारे तंत्रज्ञान सुधारणा आणली जाईल. रोजगारनिर्मितीसाठी SEZ मॉडेलचा प्रसार केला जाईल. हे मॉडेल प्रामुख्याने ज्या विभागातून लोकसंख्येचे स्थलांतर होते (जसे की उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ) अशा ठिकाणी अंमलात आणले जाईल. नापीक जमिनीत SEZ केंद्रे उघडली जाऊ शकतात. वसईतसुद्धा अशी केंद्रे उभारण्यासाठी अनुकूल स्थिती असल्यास आम्ही त्याचा पाठपुरावा करू. ह्या लोकसभा मतदारसंघात वसई ते गुजरातच्या सीमेपर्यंतचे ८ तालुके आहेत. उत्तम प्रशासनाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची स्थापना करण्याची आमची मागणी राहील. शेतकऱ्यांसाठी आरक्षित भूभाग ठेवले जातील. शाळा, कॉलेज, नाट्यगृह ह्यांची संख्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतकी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक राहू. तारापूर अणुप्रकल्पामुळे प्रदूषित पाण्याचा मच्छिमारांना त्रास होतो त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू. उघडीबोडकी झालेल्या जमिनी वनाखाली आणू. मुंबई हायमध्ये निर्माण होणारा गॅस हाजिराला जातो. येत्या पाच वर्षात इथला गॅस स्थानिक जनतेला उपलब्ध करून दिल्यास इंधनासाठी जी वनतोड होते तिला काही प्रमाणात आळा बसेल. सामुदायिक शेतीच्या मॉडेलचा एक प्रयोग यशस्वी झाला. असे मॉडेल सर्वत्र राबविण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पिण्याच्या पाण्याच्या एकंदरीत चार योजना आमच्याकडे आहेत ज्यांच्या योगाने येत्या १० वर्षात एक हजार दशलक्ष अधिक पाण्याचा पुरवठा ह्या भागास केला जाईल. विजेसाठी अधिक क्षमतेची ४ सब स्टेशन उभारली जातील. पड्घ्यावरून वीज गेली असे आपण म्हणतो, त्या पडघ्याच्या क्षमतेचे सब स्टेशन उभारलं जाईल. वसईच्या खाडीवरील पुलाचा पाठपुरावा करून मुंबईचे अंतर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. MMRDA ची हद्द विस्तारता येते का हे पाहू. आज ह्या भागातील म्हाडाच्या घरांच्या किमती खाजगी विकासकाच्या किंमतीइतक्या झाल्या आहेत. त्यावर आम्ही नियंत्रण आणू!" ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर मी गेले वीस वर्षे राजकीय पत्रकार म्हणून काम करीत आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपालिका मिळून जवळजवळ १०० निवडणुकाचे कवरेज मी केले आहे. दिल्ली विधानसभेतील निवडणुकीत झालेला आप पक्षाचा उदय आणि त्यानंतरचा अस्त मी जवळून पाहिला आहे. सुरुवातीच्या काळातील भाबडेपणा आता लोप पावला आहे. मला तुम्ही SADDIST म्हणू शकता, पण हल्ली मला आत्मपीडेतून आनंद मिळतो. संसदीय कारभार हा लोकशाहीतील महत्वाचा घटक आहे. संसदेतील गेल्या ५९ दिवसाचे कामकाज पाहिलं तर एकही दिवस गांभीर्याने चर्चा झाली नाही असे दिसून येतं. अन्नसुरक्षेच्या ज्या विधेयकाचा इतका गाजावाजा करण्यात आला ते केवळ मतानुनयासाठी मांडण्यात आले आहे. उमेदवाराचे कार्य, पक्षाची प्रतिमा पाहून लोकसभेसाठी मतदान केले जाते, जात असे. पण जेव्हापासून सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करण्याची वृत्ती उदयास आली, राजकारणाकडे एक करियर म्हणून पाहिलं जाऊ लागले तेव्हापासून सर्वकाही बदललं. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुका ह्या मार्केटिंगचे उत्तम उदाहरण म्हणून इतिहासात ओळखल्या जातील. सरकार कोणाचे तर मोदींचे, भाजपाचे नव्हे! दोघेही पंतप्रधानपदाचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यांना क्वचितच हात घालताना दिसतात. निवडणूक जिंकण्याचे एक तंत्र हल्ली विकसित झाले आहे. त्यात धनशक्ती, गुंडशक्ती, धर्म, जात ह्या सर्व अनिष्ट बाबींचा वापर केला जातो. १२८ वर्षाचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष सुद्धा व्यक्तीकेंद्रित निवडणुका करण्यावर भर देतोय. भाजपात मोदींची सभा घेण्यासाठी अहमहिका चालू आहे. कम्युनिस्ट पक्षासारखे काही अपवाद वगळता सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येते. प्रचारात व्यक्तिगत हेवेदाव्यांवर मुख्य भर आहे. जसवंतसिंग ह्यांची सुद्धा भाजपात अवहेलना झाली. ह्यात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा हात होता. काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणूक लढविण्यात अजिबात रस नव्हता. मध्यंतरी मी सुझन जॉर्ज ह्यांचे 'How the other half dies' हे पुस्तक वाचले. अन्नधान्याचा कसा व्यापार चालतो हे त्यात उत्तमरित्या उल्लेखलेले आहे. जगातील अर्धे लोक उपाशी राहतात, भुकेने मरतात. ह्याचे मुख्य कारण अन्नव्यापार नियंत्रित करण्याचा एकाधिकारशाहीचा प्रयत्न! आणि त्यांना राजकारण्याचा छुपा पाठींबा असावा असे मानण्यास जागा आहे. मोठमोठाले उद्योग आणि सत्ताकारण ह्यांचा मेळ घातला जात असून तो सर्व अर्थकारण व्यापून टाकत आहे. निवडणुकीचे गांभीर्य कमी झाले आहे. इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रतिनिधी आपल्या पक्षाचा जाहीरनामा बनविण्यात किती सहभागी झाले होते हा प्रश्न आहे. नाहीतर मग केवळ पोपटशाही दिसून येते. जनतेने आपले हित पाहावे. भाबडेपणा बाळगू नका. पक्ष म्हणून विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. चांगले उमेदवार असतील तर त्यांना मत द्या. आपचे यश अभूतपूर्व होते ह्यात शंका नाही. विधानसभेचा प्रचार सुरु झाला त्यावेळी आपला ५ ते ६ जागा मिळतील असे मला वाटलं होतं. नंतर त्यांचा जोर पाहून १० -१२ जागा मिळतील असे वाटलं. शेवटी त्यांना २८ जागा मिळाल्या. मतांचे ध्रुवीकरण काही प्रमाणात पहावयास मिळालं. बसपा, काँग्रेस, भाजपा ह्यांच्या मतांच्या टक्केवारीत जो काही थोडाफार बदल घडला त्याचा एकत्रित फायदा आपला मिळाला. पण त्यांनी यश पचविण्याची क्षमता दाखविली नाही. असे म्हणतात की जीवनभर मी एक चूक केली आणि आरश्यावरील धूळ पुसत राहिलो, पण खरेतर धूळ माझ्या चेहऱ्यावर होती. शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात ही मानसिकता आपण दूर केली पाहिजे. आता शेवट एक गोष्ट सांगून करतो. एका गावात एक राजा जाऊन प्रजेला विचारता झाला की तुम्हांला काही प्रश्न आहेत का? लोक काही समस्या सांगेनात. शेवटी एक माणूस बोलता झाला की गावात पक्षीच नाहीत. राजाला मग असे आढळून आले की गावात एकही झाड नाही आणि मग त्याने प्रजेला प्रत्येकी एक झाड लावण्याचा सल्ला दिला. शेवटी काय तर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्या प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार! प्रश्नोत्तरे १> आपला पक्ष न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी एका वर्षात काय पावलं उचलेल? प्रकाशन - न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरण्यावर आम्ही भर देऊ. सहस्त्रबुद्धे - ह्या प्रश्नावर व्यापक चर्चा व्हायला हवी. न्यायमूर्तींची संख्या योग्य असली पाहिजे, रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. न्यायालयीन सुट्ट्यांचा पुनर्विचार व्हायला हवा. काही प्रमाणात न्यायमुर्तींचा जो लहरीपणा दिसून येतो त्यावर आळा घालता यायला हवा. आप - आम्ही ग्रामन्यायालयाच्या कल्पनेस प्रोत्साहन देऊ. छोटे छोटे खटले ग्रामन्यायालयात सोडविले गेले पाहिजेत. न्यायमूर्तींना आपल्या मालमत्तेची घोषणा करणे बंधनकारक असले पाहिजे. राजीव पाटील - आम्ही ह्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करू. न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. न्यायप्रक्रियेला काळाचे बंधन घालता यायला हवे, न्यायमूर्तीची संख्या वाढवायला हवी. २> हा प्रश्न सहस्त्रबुद्धे ह्यांच्यासाठी आपला पक्ष काँग्रेसमध्ये १० जनपथ घटनाबाह्य सत्ताकेंद्र असल्याची ओरड करतो मग आपण संघाच्या भाजपावरील प्रभावाचे कसे समर्थन कराल? सहस्त्रबुद्धे - प्रत्येक राजकीय पक्ष कोणत्या तरी चळवळीतून उदय पावला आहे. आपमध्ये सुद्धा समाजवादी विचारसरणीचे लोक जास्त आहेत. भाजपात संघाच्या विचारसरणीचे लोक असले तरी संघेतर विचारसरणी सुद्धा अस्तित्वात आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येकवेळी संघाच्या विचारसरणीनुसार निर्णय घेतले जातात असे नाही. इथे प्रवीण ह्यांनी अजून एक मुद्दा मांडला. ही घटनाबाह्य सत्ताकेंद्रे सर्वत्र आहेत. अगदी आम्ही त्यातले नाहीत असे म्हणणाऱ्या कम्युनिस्ट पक्षात सुद्धा! शिवसेनेतही रिमोट कंट्रोल होताच की. हल्ली मी दोन पुस्तके वाचली. बारू आणि पंतप्रधानाचा आधीपासून परिचय होता. ह्यावरचा माझा ब्लॉग वाचा. बारुंच्या पुस्तकातील एकही गोष्ट दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीस नवीन नाही. हे सर्व मी सुद्धा जवळून पाहिलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानासोबत किमान एक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री असावा अशी परंपरा आहे. पण ती मनमोहनसिंगच्या बाबतीत बऱ्याच वेळा पाळली गेली नाही. त्यांना एकटे पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. ३> हा प्रश्न राजीवनानांसाठी UPA-2 हे आजवरचे सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असे म्हटले जात असताना आपला पक्ष त्या पक्षाला का पाठींबा देत आहे? राजीव पाटील - हे जे काही म्हटले जात आहे त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहित नाही. आज सर्वत्र भ्रष्टाचार दिसतो. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे दिसत आहे. आम्ही भ्रष्टाचार दूर करण्यासाठी IT चा वापर करू. गेल्या वीस वर्षात राष्ट्रीय राजकारणात भ्रष्टाचार दिसत असला तरी नवीन पिढीत ह्याचे प्रमाण कमी आहे. मी नवीन पिढीविषयी आशावादी आहे. त्यानंतर त्यांनी Taxation Pattern आणि जागृत प्रसारमाध्यम ह्यांचा उल्लेख केला. भाजपा - यंत्रणा सडलेली आहे. आमचा भर एका व्यक्तीवर आहे असे म्हटले जाते ते चुकीचे आहे. अबकी बार मोदी सरकार ह्यात अनुप्रासात्मक भाग जास्त आहे. गुजरातमध्ये सुद्धा यंत्रणा सडलेली आहे पण 'Catch the bull by its horn' ह्या उक्तीचा वापर करून आम्ही ह्या यंत्रणेस कामास लावलं. एकदम टोकाची भूमिका घेण्याची, घटनाबदल करण्याची वगैरे गरज नाही. जर शीर्षस्थ माणसाचा vested interest (स्वार्थी भूमिका) नसेल तर हा बदल घडवून आणता येईल. मोदी म्हणतात त्याप्रमाणे - हु खावो नथी आणि बिजानो खावानू देतो नथी (चूकभूल माफ असावी) असा निर्धार केल्यास सर्व शक्य आहे. ४) हा प्रश्न भाजपसाठी मतासाठी एखाद्या धर्माचे तुष्टीकरण करण्याची जी वृत्ती वाढीस लागली आहे त्यावर सर्व धर्म चार भिंतीतच ठेवावे हा उपाय तुम्हास कसा वाटतो? सहस्त्रबुद्धे आम्ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणू. सर्वांना न्याय आणि कोणाचेही तुष्टीकरण नाही अशी आमची भूमिका राहील. एकगठ्ठा मतासाठी आम्ही कोणत्याही समाजाचे अनुनय करणार नाहीत. ह्यावर बहुदा प्रवीण ह्यांनी प्रत्येक पक्षाने एकेक धर्मद्वेष्टा जोपासून ठेवला आहे अशी टिपण्णी केली. ५) हा प्रश्न खातू ह्यांच्यासाठी - केजरीवाल ह्यांची दिल्लीतील सत्ताग्रहण ही एक मोठी घटना झाली. परंतु केजरीवाल ह्यांनी सत्तात्याग करण्याची घाई केली असे तुम्हांला वाटत नाही का? ५ वर्षात दिल्लीचे नंदनवन करून पुढील लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर देशापुढे गेला असतात तर ते अधिक योग्य झाले असते असे आपणास वाटत नाही का? खातू - आम्ही काँग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले. १० -१२ मुद्द्यावर कृती केली आणि त्यानंतर लोकपाल बिलाचा मुद्दा हाताशी घेतला. पुढे सरकार चालविण्यासाठी हे बिल पास करणे आवश्यक होते. हे बिल पास न करता सरकार चालविणे चुकीचे झाले असते. प्रवीण - काँग्रेस आणि भाजपने खरेतर दिल्लीत लोकशाहीचे एक चांगले उदाहरण ठेवले होते. भाजपने सत्तेचा दावा केला नाही आणि कॉंग्रेसने आपला पाठींबा दिला. पण दिल्लीत आपचा प्रशासकीय अननुभवीपणा दिसून आला. आपने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांच्या बाबतीत जनतेच्या तीव्र भावना दिसून आल्या. एकदा का लोकपालाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर राज्यसरकारने त्यावर घटनेच्या चौकटीत राहूनच कृती करावयास हवी होती. Political Correctness नावाची एक संकल्पना असते जी आपला दाखविता आली नाही. १९८२ साली भाजपाने एक निर्णय घेतला होता की आमचे विधायक सभागृहातील वेलमध्ये जाणार नाहीत. पण तीन चार वर्षात सर्व विधायकांनी तक्रार केली की आम्हाला मिडियाचे लक्ष मिळत नाही. अभ्यासपूर्ण भाषणाला पेपरात दोन ओळींचे फुटेज मिळते तर वेलमधील गोंधळास ७ -८ ओळींचे! मग शेवटी भाजपने आपला निर्णय बदलला! ६> अंतिम प्रश्न - प्रत्येक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करतो. परंतु त्यातील वचनांची पूर्तता केली की नाही हे केव्हाच तपासून पाहिलं जात नाही. हा जाहीरनामा एक Legal Document म्हणून मानण्याविषयी आपल्या पक्षाचं काय म्हणणं असेल? प्रकाशन - ह्या प्रश्नाविषयीच मला आक्षेप आहे. ह्यात मतदार हा एक ग्राहक आणि राजकिय पक्ष सेवापुरवठा करणारे असे अभिप्रेत आहे. परंतु तसे नसावे. जनता सुद्धा राजकीय प्रक्रियेचा भाग आहेत. जनता विरुद्ध राजकीय पक्ष असे स्वरूप देणे चुकीचे आहे. ह्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची पुढील निवडणुकीच्या वेळी तपासणी करता येईल. दैनदिन व्यवहारात सुद्धा आपण ते तपासून पाहू शकू. प्रत्येक व्यक्तीस अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असावे असे आमचे म्हणणे राहील. सहस्त्रबुद्धे - मोदी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जाहीरनामा ही श्रद्धा आणि गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. त्यातील प्रत्येक वचनाचे पालन करण्याचा आम्ही प्रतिज्ञापूर्वक प्रयत्न करू. त्यावर आम्ही कृती करू आणि त्याचा रिपोर्ट लोकांना देऊ. खातू - प्रवीण ह्यांनी वापरलेल्या पोपटशाही ह्या शब्दप्रयोगाला तीव्र आक्षेप घेतला. इथले प्रत्येक प्रतिनिधी जबाबदार व्यक्ती आहेत. आम्ही काय बोलतो ते आम्हांला चांगलच कळते. ह्याविषयी पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे ते मला माहित नाही, पण माझे मत असे आहे की पुढील वर्षी पुन्हा सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांनी काय कृती केली ह्याच स्पष्टीकरण मागावं. केजरीवालह्यांना बोलवावं! राजीव पाटील - जाहीरनामा हा एक विचार आहे. ह्यातील प्रत्येक बाबीचे पालन करणे कठीण आहे पण त्या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. मतदारराजा जागृत आहे ह्याचे आम्हांला चांगलेच भान आहे कार्यक्रमाच्या शेवटी महेश अभ्यंकर ह्यांनी आभारप्रदर्शन केले. आणि एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. खंत एकाच की इतक्या सुंदर कार्यक्रमास जनतेचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. असे कार्यक्रम किती ठिकाणी होत असतील माहित नाही, पण प्रत्येक पक्षाने जाणकार लोकांना ह्या सभेला पाठविले आणि प्रत्येक प्रतिनिधीने उत्तम ज्ञान प्रदर्शित केले. आपली उदासीनता झटकून देण्याची हीच वेळ आहे. प्रवीण ह्यांनी सांगितलंलेल्या गोष्टीप्रमाणे झाड हे प्रत्येकालाच लावावं लागेल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...