मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

२०२४ अनुभव - भाग १


२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय लिहायचं ह्याविषयी काहीच ठरवलं नाही. 

१.  आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीस ढोबळमानानं तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 
अ. पालकांविषयीची जबाबदारी 
ब. अपत्यांविषयीची जबाबदारी 
क. व्यावसायिक जबाबदारी
माझ्या कार्यालयातील मला सतत मार्गदर्शन करणाऱ्या व्यवस्थापकाने ह्याविषयी मोलाचा सल्ला दिला. ह्या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना वेगवेगळ्या कप्प्यांत विभागणे अत्यावश्यक असते. ज्यावेळी आपण कोणतीही एक जबाबदारी पार पडत असतो त्यावेळी दुसऱ्या जबाबदारीविषयीचे विचार कटाक्षानं दूर ठेवावेत. काहीसं भावनाशून्य माणसासारखं वागावं लागतं पण पर्याय नसतो. 

२. तुम्ही कितीही प्रयत्न करा, वर्षभरात काही वेळा तुम्ही काही मोठ्या व्यावसायिक, वैयक्तिक घोडचुका करणारच.  ह्या घोडचुका करणारे आपण कसे मूर्ख आहोत ह्याविषयी विचार करण्यापेक्षा ह्यातून लवकर कसं बाहेर येता येईल ह्याचा विचार करणं इष्ट राहील. आपण त्या परिस्थितीत तसे का वागलो / बोललो; तसा निर्णय का घेतला ह्याविषयी विचार करावा. त्यामागील आपली विचारसरणी, आपलं व्यक्तिमत्व ह्याविषयी शांतपणे चिंतन करावं. ह्यात हळूहळू जमेल तितका बदल घडवत राहावा. 

३. कोणतेही महत्वाचं काम करताना आपण आपल्या सर्वोत्तम शारीरिक, मानसिक स्थितीत असायला हवं. त्यामुळं अशा व्यावसायिक बैठकीच्या वेळी आपल्याला आवश्यक अशी झोप घेणं, आपल्याला झेपणारा आहार घेणं, आपली मनस्थिती चांगली ठेवणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवणं / ती बिघडवू शकणाऱ्या लोकांशी संपर्क टाळणं ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं. 

४. आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील महत्वाच्या व्यक्ती कोणत्या हे नक्की ठाऊक असावं. ही संख्या मर्यादित असावी. ह्या व्यक्तींना नक्की काय आवडतं, काय नाही हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जमेल तितकं त्याप्रमाणं वागावं. 

५. मला आयुष्यातील सर्वात आनंद देणारी गोष्ट - झाडांना, दुर्वा ह्यांना दररोज पाणी देणं. त्यांना येणारे अंकुर, कळ्या ह्यांचं निरीक्षण करावं. अशा झाडांवर येणारा एखादा इवलासा पक्षी जेव्हा आपण फवाऱ्यानं छोटी आंघोळ घातलेल्या झाडावरील जलबिंदू छोट्या चोचीनं टिपतो तो सुवर्णक्षण !

६. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीनं आनंदित होणं किंवा दारुण पराभवानं निराश होणं ह्या भावनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात मी यश मिळविलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक दैदिप्यमान कामगिरीचे आकडे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचे सर्वोच्च मानांकन हे सर्व काही झुट (हा शब्द मुद्दाम वापरला) आहे. 

७. जर तुम्ही ९५% आहार हा घरी बनविलेला घेत असाल, रात्री साडेसातपर्यंत भोजन घेत असाल तर वैद्यकीय चाचण्यांपासून दूर राहणं इष्ट ! त्या चाचण्यांमधून नक्कीच काहीतरी निष्पन्न होत राहणार. 

८. आपण सर्वजण स्वतःच्या प्रेमात पडलेलो असतो. ह्यात काही वावगं नाही. पण ह्याचा आपल्या वागण्यात कुठं अतिरेक होतोय का ह्याची जाणीव होणं आवश्यक आहे. ही जाणीव असल्यावर जाणीवपूर्वक हा अतिरेक करायचा असेल तर करावा. काही लोकांना ह्या अतिरेकाच्या परिणामांविषयी चिंता न करण्याची चैन परवडू शकते. आपण त्यातले आहोत का ह्याची जाणीव असावी. 

(बहुतेक क्रमश: पण नक्की नाही !)

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

ABB Villa Bordi





बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव.  गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्डी आपलं गांवपण टिकवून आहे.  बोर्डीने आपलं हे गांवपण हे असंच टिकवून ठेवावं अशी माझी मनोमन इच्छा! पूर्वी बोर्डीची एक शैक्षणिक केंद्र म्हणून ख्याती होती. अजूनही इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास असतात. बोर्डी हे चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चिकूच्या फळबागा इथं मोठ्या प्रमाणात आढळून येतात.  फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास इथं सुप्रसिद्ध अशा 'चिकू फेस्टिवल' चे सुद्धा आयोजन केले जातं.  बोर्डीला लांबलचक असा समुद्रकिनारा लाभला आहे.  अशा विविध कारणांसाठी  बोर्डी हे एक पर्यटनस्थळ म्हणून जाणकार पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. 

एखादं गाव पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलं की अर्थातच तिथं विविध रिसॉर्टचे पेव फुटतं.  शांत पर्यटक म्हणून भारतीय पर्यटकांची अजिबात ख्याती  नाही. आम्ही पैसा मोजून आलो आहोत, त्यामुळे आम्ही इथं आमच्या मर्जीनं  वागू असा काहीसा मुजोरपणा दुर्दैवानं रिसॉर्टमध्ये काही वेळा पाहायला मिळतो.  माझ्यासारख्या शांततेच्या शोधात असलेल्या अनेक पर्यटकांच्या सृष्टीनं ही अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते.  त्यामुळे आम्हांला बऱ्याच वेळा अशी रिसॉर्ट्स नकोशी वाटतात. 

शांतताप्रिय पर्यटकांसाठी खाजगी निवासस्थानी वास्तव्य करणे हा एक पर्याय उपलब्ध असतो.  २० ते २२ डिसेंबर दरम्यान आम्ही बोर्डी येथील ABB Villa ह्या अतिसुंदर बंगल्यात वास्तव्य केलं.  आम्ही अनुभवलेलं एक सुंदर वास्तव्य सर्वांसोबत शेअर करावं या उद्देशाने लिहलेली ही ब्लॉग पोस्ट! 

बोर्डी गावाची सायंकाळी लवकरच निद्राधीन होणारं गांव अशी ख्याती पूर्वीपासून आहे.  बालपणी आम्ही आजोळी राहायला जात असू,  त्यावेळी साडेसात वाजता रात्रीची जेवणं आटपून गावकरी चिडीचूप निद्राधीन होत असत.  ABB Villa मध्ये सुद्धा आम्हांला  हाच अनुभव आला.  हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सहानंतरच अंधाराने आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते.  थंडी जोरदार होती.  मुंबईतील लोकांना ही थंडी प्रचंड आहे असे वाटण्याची दाट शक्यता आहे.  आम्ही वसईतून आल्याने आम्ही सुरुवातीला काहीसे आत्मविश्वासपूर्ण होतो.  परंतु थोड्या वेळातच आम्ही लोकरीच्या कपड्यांचा आधार घेतला.  एबीबी व्हिला हा अत्यंत एकांताच्या ठिकाणी म्हणावा असा आहे.  जवळपास ५० -१००  मीटर अंतरापर्यंत तुम्हाला कुठेही वस्ती दिसत नाही.  या संपूर्ण परिसरात फक्त एकटे दुकटे  बंगले आहेत. त्यामुळे नीरव शांतता म्हणजे काय याचा अनुभव इथं तुम्हांला येतो. 

श्रीकांत पाटील हे या बंगल्याचे मालक. या बंगल्याचा आराखडा त्यांनी मोठ्या कल्पकतेने रचिला आहे.  खालच्या मजल्यावर एक आणि पहिल्या मजल्यावर दोन अशी एकूण तीन मोठ्या बेडरूम्स, खालील मजल्यावर प्रशस्त बैठकीची खोली, लागूनच असलेले मोठाले स्वयंपाकघर,  भोवताली निळ्याशार पाण्यानं भरलेला तरणतलाव, गच्चीवर सोलार पॅनल, परिसरात विविध प्रकारच्या फुलझाडांची, फळझाडांची लागवड.  अशा निसर्गरम्य वातावरणात तीन दिवस आम्ही मोठ्या आनंदात राहिलो. 

पर्यटकांच्या दृष्टीने येथील वास्तव्य हे सुखकारक व्हावं यासाठी श्रीकांत पाटील यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा सविस्तर विचार केला आहे.  तीव्र हिवाळ्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक बेडरूममध्ये पुरेशा प्रमाणात ब्लॅंकेट पुरवली आहेत. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम्सच्या बाहेर दोघाजणांना झोपण्यासाठी मोठा बिछाना, ब्लॅंकेटस उपलब्ध आहेत. घरातील फ्रीज हा जीवनावश्यक जिन्नसांनी भरलेला असतो. थंड फरशीमुळे पाहुण्यांना सर्दी होऊ नये म्हणून स्लीपरचे जोड इतका सखोल विचार श्रीकांत ह्यांनी केला आहे.  थेट बागेतून टीपॉयवर पहुडलेली सफेद वेलचीची केळी आम्हांला खुणावत होती. बागेत मोठाल्या बोरांचे झाड होतेच. एक काका बंगल्याची आणि आजूबाजूच्या परिसराची अत्यंत आपुलकीने निगराणी राखत होते. आम्हांला आमच्या वास्तव्यात त्यांनी हवा तेव्हा कित्येकदा गरमागरम चहा बनवून दिला. सकाळी आंघोळीसाठी गरमागरम बंबाचे पाणी उपलब्ध होते. आपण किती वाजता उठणार हे फक्त श्रीकांत ह्यांना कळविले की काका बंब त्यावेळी सुरु करत असत.  

आम्ही एका विवाह समारंभासाठी इथे आलो असल्याने आमचे वेळापत्रक अगदी व्यस्त होते. त्यामुळं आम्हांला गच्चीवर जाऊन आकाशाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली नाही.  परंतु सवडीने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असेल.  आसमंतात कुठेही कृत्रिम प्रकाश अस्तित्वात नसल्याने आकाशातील अत्यंत मंद तारे सुद्धा केवळ डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतील. लोकरीच्या कपड्यांनीसुद्धा आमची थंडी न गेल्याने श्रीकांत यांनी आमच्यासाठी शेकोटीची व्यवस्था केली. आमच्यातील उत्साही मंडळींनी लगेचच शेकोटी पेटवण्यात पुढाकार घेतला.  थोड्याच वेळात त्या शेकोटीच्या उबेचा  आनंद लुटण्यासाठी आम्ही सर्वजण शेकोटीभोवती गोळा झालो.  बऱ्याच वर्षांनी एका थंड प्रदेशात शेकोटीचा आनंद घेण्याचा अनुभव अविस्मरणीय असा होता.  

श्रीकांत हे माझे मोठे बंधू संजीव यांचे खास मित्र.  त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी शुक्रवारी रात्री एका चविष्ट मटन बिर्याणीचे आयोजन केले होते.  ही चविष्ट मटन बिर्याणी खाऊन आम्ही सर्व तृप्त झालो. त्यानंतर संजीव आणि श्रीकांत यांनी आपल्या सुरेख गायनानं आमचे मनोरंजन केले. रात्रीचे अकरा वाजले होते. बोर्डीच्या मापकदंडानुसार ही मध्यरात्रीनंतरची वेळ!  सकाळी लवकर उठून लग्न समारंभाला आम्हाला हजर राहायचे असल्याने आम्ही झोपायच्या तयारीत होतो. तेव्हा बोर्डीतील प्रसिद्ध शेतकरी आणि सुप्रसिद्ध 'द जंगल फार्म' चे (The Jungle Farm) मालक सूर्यहास चौधरी यांचे आगमन झाले.  त्यानंतर गप्पांना बहर आला.  पूर्वीच्या काळातील आठवणींपासून सुरू झालेल्या गप्पा सद्यकाळातील शेती उत्पादन आणि शेती उत्पादनातील विविध समस्या इथपर्यंत येऊन पोहोचल्या.  सूर्यहास हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. The Jungle Farm ला ह्यावेळी अगदी धावती भेट दिली. पण लवकरच सवडीने भेट देऊन त्यावर मोठी पोस्ट लिहिण्याचा मानस आहे. सकाळी उठण्याचे भान ठेवून आम्ही बारा वाजता गप्पा आटोपत्या घेतल्या.  या निसर्गरम्य थंड वातावरणात झोप ही अत्यंत गाढ असते.  त्यामुळे केवळ पाच ते सहा तास झोपलो असलो तरी सकाळी प्रसन्नचित्ताने आम्ही उठलो. 

परिसरात चिकू,बोरं, पपई, आंबे यांच्या झाडांसोबत विविध प्रकारची गुलाबं, जास्वंदी, सदाफुली आणि मला नावं माहिती नसलेले अनेक फुलं यांचा समावेश आहे.  खास वैशिष्ट्य म्हणजे रुद्राक्षाचे झाड! श्रीकांत आणि त्यांची पत्नी बाबा अमरनाथ ह्यांच्या आशीवार्दानं पवित्र झालेली ह्या झाडाची रुद्राक्षे प्रत्येक जोडप्याला भेट देतात. हा एक खास अनुभव !   

इथे अत्यंत शुद्ध अशा निळ्याशार पाण्याचा तरणतलाव आमच्यातील काही जणांना खुणावत होता.  परंतु इतक्या थंड वातावरणात भल्या पहाटे त्यात डुंबण्याची हिंमत नसल्याने म्हणा किंवा लग्नाला जाण्याची घाई असल्याने म्हणा या तरणतलावाचा आनंद लुटण्याची संधी आम्हांला गमवावी लागली. परंतु जे कोणी पर्यटक सवडीने या ठिकाणी जातील, त्यांना या तरणतलावातून बाहेर काढणे हे जिकरीचे काम असेल हे नक्कीच मी सांगू इच्छितो. 

या बंगल्याकडे जाण्याचा रस्ता शेवटची पाच मिनिटे अत्यंत खडबडीत असा आहे.  सुरुवातीला आम्ही काहीसे कंटाळले होतो.  परंतु हा खडबडीत असा रस्ता असल्याने तिथे अजिबातच वाहतूक नाही त्यामुळे शांतता अबाधित  राहते ह्याची जाणीव ज्यावेळी आम्हांला झाली त्यावेळी त्या रस्त्याच्या खडबडीतपणाचे आम्ही आभार मानले.  हल्लीच्या मुंबईत जो कोणी राहतो त्याला शांततेचे इतके मोल आहे की आपण शांततेसाठी जंग जंग पछाडू शकतो.  दुर्दैव म्हणावे पण ही वस्तुस्थिती आहे. 

अत्यंत शांततामय परिसरात आकर्षक वातावरणात वैयक्तिक आवडीनिवडी ध्यानात घेणारी एक अविस्मरणीय सहल जर तुम्हांला अनुभवायची असेल तर ABB Villa Bordi ला भेट देणे तुम्हांला क्रमप्राप्त आहे! श्रीकांत पाटील हे ९८२००२०४४९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध आहेत. 

आम्ही घेतलेली परिसरातील काही छायाचित्र !










शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

 


दोन पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर होत राहतं. आयुष्य हा मोठा कालावधी आहे. त्यामुळं ज्या कालावधीत आपल्या ह्या नात्यात थोडाफार तणाव निर्माण होतो त्यावेळी काही काळ शांत राहणं योग्य असं माझं मत! काही वर्षात संदर्भ बदलतात, आपण दुसऱ्या भुमिकेत प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या भूतकाळातील भुमिकेमागील विचारसरणी अधिक स्पष्टपणे समजू शकते. त्यामुळं कधीही कोणाविषयी टोकाचे गैरसमज करून घेऊ नयेत. प्रत्येकजण आपल्या भूमिकेत थोड्या प्रमाणात का होईना बरोबर असतो, प्रत्येकाच्या वागण्याबोलण्यामागे काही तरी कारण असतं.

आम्ही वाढलो तो काळ वेगळा होता. भारतानं मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं नव्हतं. माझ्या पहिली नोकरीत (जी मी पहिल्या आठवड्यातील गुरुवारी सोडली) मला मोजका पगार मिळणार होता. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित नोकऱ्या भारतात अत्यल्प प्रमाणात असल्यानं पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. पारंपरिक नोकऱ्यांचे प्रमाण अगदी कमी होतं. त्यावेळी असलेल्या कमी पगारांमुळं स्वतःच घर घेण्याचा विचार जर केलाच तर तो वयाच्या चाळीस - पंचेचाळीशीनंतर करावा अशी मनोधारणा होती.

घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही पैसे जपून वापरावेत ही मानसिकता होती. हॉस्टेलला जाताना आठवड्याभरासाठी शंभर रुपये घेऊन जात असू, आणि ते ही पुरेसे होत. वसई स्टेशन ते रमेदी हे तिकीट बहुदा एक रुपया होते. ह्या बससाठी आम्ही अर्धा अर्धा तास स्टेशनवर वाट पाहत असू.

हे सर्व सांगण्याचा हेतू हा केवळ त्याकाळची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सांगणं इतकाच आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही बऱ्यापैकी आनंदी होतो. 'दिल ही छोटा, छोटी सी आशा !' असला प्रकार होता. मी फारसा महत्वाकांक्षी नव्हतो. आयुष्यावर नियंत्रण मिळवावं असं वाटावं इतका आत्मविश्वास बहुदा नव्हता. अशी पार्श्वभूमी सोबतीला घेऊन आम्ही व्यावसायिक जीवनात आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश करणार होतो. केवळ प्रामाणिक मनोभावनेने व्यावसायिक, वैवाहिक जीवनात प्रयत्न करत जीवन व्यतित करावं ही मानसिकता होती आणि जी आमची एक मोठी जमेची बाजू होती.

त्यानंतर आयुष्य जसं उलगडत गेलं तसं आम्ही त्याला स्वीकारलं. आयुष्यातील सुरुवातीच्या काळात मिळालेल्या शिकवणुकीमुळं भविष्यात जर बिकट परिस्थिती उद्भवली तर आपल्याजवळ अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकी तरी बचत असावी हा विचार आम्ही कायम आयुष्यभर बाळगला. २००४ साली अमेरिकेत असताना निर्वासित लोकांच्या निवाराघरात जाऊन मी स्वयंपाक केला होता. वीस - पंचवीस कोबी कापले होते. त्यावेळी तिथल्या संचालिकेने सांगितलेले बोल माझ्या सदैव लक्षात राहिले आहेत. ती म्हणाली, "ही लोक ह्या निर्वासितांच्या छावणीत राहत आहेत म्हणून ह्यांच्याकडे तुच्छतेनं पाहू नका. अमेरिकेतील कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाचे ओळीनं तीन - चार निर्णय चुकीचे ठरले तर त्याच्यावर ही पाळी येऊ शकते." हे वाक्य जरा जास्तच प्रमाणात माझ्या डोक्यात भरून राहिलं आहे.

हल्लीच्या काळात विवाह का करावा हा मोठा गहन प्रश्न बनला आहे. माणसं जसजशी आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक स्वावलंबी होत चालली तसतसं हे घडणं क्रमप्राप्तच होतं. विवाहानंतर जीवन परिपूर्ण होतं असं आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? नक्कीच नाही. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो, कोणतंही जोडपं आदर्शवत नसते. माणसाला आयुष्यभर आपल्या सर्व त्रुटींसह स्विकारणारं, आपली सर्व भयं ज्याला अगदी मोकळेपणानं सांगू शकतो, ज्याला हक्काने आपल्या महत्त्वाच्या क्षणी हाक मारु शकतो असं कोणीतरी हवं असतं. लहानपणी ही भूमिका बजावणारे आईवडील, भावंडं आयुष्यभर आपल्याला पुरे पडू शकत नाहीत. आपला साथीदारच आपल्याला अशी साथ देऊ शकतो किंबहुना त्यानं/ तिनं अशी साथ द्यावी अशी अपेक्षा असते. बहुतेक सर्वांसाठी एकटेपणा हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकण्याची शक्यता असते. मराठीत म्हण आहे - 'रिकामी मन सैतानाचे घर' ! माणूस एकटा राहिला की मनात नको नको ते विचार येतात, खाण्यापिण्याच्या वेळांवर, आहारावर नियंत्रण राहत नाही. माणसाला फारसा मोकळा वेळ मिळू न देणं हा विवाहसंस्थेचा एक छुपा फायदा आहे.

आता चर्चेचा ओघ "योग्य साथीदाराची निवड कशी करावी ?" ह्या मुद्दयाकडे नेऊयात. आयुष्यभर आनंदानं विवाहबद्ध राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यभराच्या कालावधीत पती पत्नी दोघांच्या स्वभावात बरेच बदल घडत असतात. लग्नाआधी समोरच्या माणसाची जी ओळख आपल्याला असते ती बहुदा हिमनगाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या भागाइतकी असते. माणसाचं खरं रूप त्याच्यासोबत चोवीस तास राहायला सुरुवात केल्यानंतर समजायला लागतं. पण ह्यात एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आपल्याला आपणच किती कळलो आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. लग्नाआधीचं स्वातंत्र्य काही / बऱ्याच प्रमाणात लोप पावतं. पण ही काही नकारात्मक गोष्ट नाही. लग्नानंतर आपल्याला आपली ओळख पटली आणि साथीदाराच्या वागण्याची कल्पना आली की आपण आपल्यात योग्य असे बदल घडवून आणून ह्या नात्यात गोडवा आणू शकतो. Every relationship needs a owner. हे स्वामित्व स्त्री किंवा पुरुष ह्यापैकी कोणीही घेऊ शकतं. ह्या स्वामित्वात मला नक्की काय अभिप्रेत आहे? सुरुवातीच्या काळात काही वेळा शाब्दिक अपमान सहन करावा लागणं, घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी घेणं, वाद झाल्यावर इगो बाजूला ठेऊन काही वेळानं पुन्हा संवाद सुरु करण्यात पुढाकार घेणं अशा काही गोष्टींचा समावेश होतो. आपल्या साथीदाराला नक्की काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात खपत नाही ह्याची अभ्यासपूर्ण माहिती करून घेणं हे महत्वाचं असतं.

हे मुद्दे लक्षात घेता आपला साथीदार व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणे ही सुखी वैवाहिक जीवनातील एकमेव महत्वाची गोष्ट नाही हे आपल्या ध्यानात येईल. हल्ली स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक स्त्रीने आपल्यापेक्षा वरचढ असा साथीदार मिळावा अशी अपेक्षा बाळगणं योग्य ठरणार नाही. लौकिकार्थाने कमी यशस्वी नवऱ्याकडे एक चांगला माणूस म्हणून पाहणं हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरून (background) त्याविषयी पूर्वग्रह बनवू नये. 

साथीदाराने आपल्या महत्वाच्या क्षणी आपल्यासाठी उपलब्ध असणं ही प्रत्येक विवाहित व्यक्तीची महत्वाची गरज असते. आणि हे उपलब्ध असणं हे केवळ त्या जागी असण्यानं नव्हे तर मनानं तिथं पूर्णपणे असण्यानं असावं. साथीदाराविषयी असणारी Empathy हा वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारा सर्वात मोठा घटक आहे. ही Empathy आपल्या वागण्यातून, आपल्या संवादशैलीतून प्रतित व्हायला हवी. हे सर्व मुद्दे काहीसे विस्कळीत स्वरूपात मांडले आहेत पण ह्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यावसायिक यश हा एकमेव मुद्दा आपल्या साथीदाराची निवड करताना डोळ्यासमोर नसावा.

ह्यापुढील  विचार अस्ताव्यस्त असणार आहेत. त्यामुळं संयम बाळगावा ही विनंती.

१. अमेरिकेत २००७ सालापर्यंतच्या वास्तव्यात माझ्या संपर्कात आलेल्या काही अमेरिकन सहकाऱ्यांच्या बाबतीत एक समान धागा दिसून आला होता. ह्या सर्वांच्या पहिल्या लग्नाची परिणिती घटस्फोटात झाली होती. पण त्यामुळं हताश न होता त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यात मात्र हे पठ्ठे गुण्यागोविंदानं नांदत होते. माझा त्यावेळचा माईक त्या कालावधीत माझ्याशी बऱ्यापैकी मोकळेपणानं बोलायचा. त्यानंच एकदा सहजपणं सूचित केलं की पहिल्या लग्नबंधनात प्रवेश करताना ही माणसं बहुदा अवास्तव अपेक्षा बाळगत असावीत. पण दुसऱ्या लग्नात मात्र त्यांचे पाय जमिनीवर आलेले असतात, सहचारिणीशी जुळवून घेण्यासाठी जे काही बदल घडवून आणावे लागतात त्यांची मानसिक तयारी त्यांनी केलेली असते. काहीसा मनोरंजक मुद्दा!

२. अमेरिकेत असताना अजून एक गोष्ट वारंवार जाणवायची. सार्वजनिक आयुष्यात बरेच नियम सामोरे यायचे आणि सर्वजण त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचे. त्यामुळं आयुष्य अगदी सुरुळीतपणे पार पडायचं. रस्त्यावरील सिग्नलचे पालन,मार्गिकांना उगाचच छेद न देणारे चालक, मोठाल्या दुकानात वर्षोनुवर्षे मिळणाऱ्या ताज्या भाज्या, मासे, केक ह्यामुळं मेंदूवर ताण असा पडायचा नाही. आपल्या देशात कसा मेंदू अगदी सतर्क अवस्थेत राहतो. कार चालवताना उजव्या, डाव्या बाजूने अचानक अवतीर्ण होणारे बाईक / रिक्षावाले, वाटलं म्हणून समोरून आत्मविश्वासानं रस्ता पार करणारा पादचारी ह्यामुळं मेंदू जागृत असतो. ह्या उदाहरणातून घेण्याचा मुद्दा हा की आपल्या मेंदूला एकदा की सुस्पष्ट पर्याय उपलब्ध असलेले आयुष्य जगायची सवय झाली की थोडी जरी क्लिष्ट परिस्थिती आली की तो बिचारा गोंधळून जातो.

३. वरील उदाहरणाचा दाखला घेऊन एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीत वाढलेल्या मुलांचा विचार करूयात. एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलांना आयुष्यात चूक किंवा बरोबर, आनंद किंवा वाईट ह्यामधील ज्या असंख्य छटा आयुष्य आपल्यासमोर सादर करू शकतं त्या दैनंदिन जीवनात अगदी सहजासहजी पाहायला मिळायच्या. त्यामुळं लग्नाला (आयुष्यातील अशी एक घटना जी आपल्यासमोर चूक किंवा बरोबर ह्यामधील अगणित शक्यता सादर करू शकतं) सामोरं जाताना ही मुलं अजाणतेपणी त्यासाठी सज्ज झालेली असायची. "दैनंदिन आयुष्यात तू चुकलास" असं कोणी सांगितलं तर मोठा प्रलय आला अशी परिस्थिती उद्भवत नाही ही शिकवणूक एकत्र कुटुंबपद्धतीनं दिल्यानं नवरे मंडळींना सतत त्यांच्या चुका दाखविल्या गेल्या तरीही आपण आयुष्यात काही बरोबर करूच शकत नाही असा न्यूनगंड वगैरे निर्माण होत नसे.

४. वरील उदाहरणाचे दूरगामी परिणाम झाले. स्त्रियांना एकत्र कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य अनुभवायला न मिळाल्यानं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. हळूहळू त्याचं परिवर्तन प्रत्यक्ष आचरणात यायला लागलं. काहींनी ही स्वातंत्र्याची कास स्वतः धरली तर काहींनी हे बीज आपल्या पोटात वाढणाऱ्या पुढच्या पिढीकडं सुपूर्द केलं. पुढील पिढीला अनुकूल वातावरण मिळाल्यानं त्यांनी आपल्या आचारविचारांतून ह्या स्वातंत्र्याला कवटाळलं. हे स्वातंत्र्य मिळालं, ज्याची आस धरली ते मिळाल्याचा déjà vu क्षण आला. पण पुढं काय? आयुष्य खूप दीर्घकालीन असतं. विविध टप्प्यावर ते आपल्याला एकच प्रश्न वारंवार विचारत राहतं. गतआयुष्यातील आपल्या निर्णयांचं परीक्षण करायला भाग पाडत राहतं. नव्या पिढीनं हा मुद्दा ध्यानात घ्यायला हवा.

५. Giving it back to Society - समाजऋणाची परतफेड - मनुष्यजातीच्या आरंभीस बलवान टोळ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर बुद्धिमान माणसांनी आपल्या बुद्धीद्वारे हळूहळू समाजव्यवस्थेचा ताबा घेतला. पुढं हे चालू ठेवायचं असेल तर सुशिक्षित स्त्री - पुरुषांनी आपला वंश पुढे वाढवायला हवा. ह्या मुद्द्यामुळं मला बुरसटलेल्या विचारसरणीचा संबोधिण्यात येण्याची शक्यता ध्यानात घेऊन सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित करत आहे.

६. सद्यपिढीने दाखविलेला संवादकलेचा प्रचंड अभाव - सद्य पिढीनं विवाहसंस्थेविषयी बहुतांश नकारात्मक संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवले. चाळीस - पन्नास वर्षे संसार केलेली जोडपी सुद्धा जेव्हा सर्वांसमोर एकमेकांचा अपमान करतात, पूर्ण आयुष्याचा फक्त आणि फक्त नकारात्मक हिशोब मांडतात, तेव्हा ही विवाहसंस्था फक्त दिखाऊ / दांभिक आहे का असा विचार नवीन पिढीच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. विवाहसंस्थेच्या बाबतीत व्यक्त केल्या जाणाऱ्या नकारात्मक संदेशाच्या तुलनेत अगदी खरेखुरे वाटणारे सकारात्मक संदेश तुलनेनं खूपच कमी आढळतात.

७. तिरंगी सामना - हा केवळ माझा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांत मांडल्यामुळं मी वेडा आहे अशा निष्कर्षापर्यंत तुम्ही कृपया येऊ नकात. सर्वशक्तिमानानं विश्वाची निर्मिती केली. मनुष्यानं हळूहळू आपल्या बुद्धीचे प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. भूमातेवरील सर्वोत्तम बुद्धिमान माणसांनी जर आपल्या प्रज्ञेचा पुरेपूर वापर केला तर कधीतरी ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या वर्चस्वाला आव्हान देऊन कदाचित आपल्याला विस्थापित करतील असं भय हल्ली सर्वशक्तिमानाला वाटू लागलं असावं. त्यामुळं मनुष्यांना विचलित करण्यासाठी त्यानं संगणकांच्या माध्यमातून AI / ML चा किडा आपल्या डोक्यात घुसवला आहे. AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक भविष्यात सर्वशक्तिमान आपल्या बाजूनं ओढून घेईल आणि मग सुरु होईल तो सर्वशक्तिमान आणि AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक एका बाजूला आणि बुद्धिमान माणसं दुसऱ्या बाजूला असा लढा ! आता ह्या सर्वात विवाहसंस्थेचा संबंध काय हे अजून तुम्हांला कळलं नसेल तर सांगू इच्छितो की बुद्धिमान मनुष्यांच्या मनात "पुढील पिढी निर्माण करण्याचं प्रयोजनच काय?" असल्या नसत्या शंका निर्माण करण्याचं काम सर्वशक्तिमान करत आहे. नवीन पिढीनं हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

लेखाची सुरुवात कुठं झाली आणि शेवट कुठं झाला !! असो मी आणि लेख जरी भरकटला असला तरी ह्यातील महत्वाचे मुद्दे ध्यानात घ्यावेत ही विनंती ! आणि मुद्दा ७ हा खासच आहे, त्यावर नक्की विचार करा!!


सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

बालपणात (अति) गुंतलो मी !

 



युरोप प्रवासवर्णनाची शेवटची दोन - तीन पुष्पं गुंफायला काही कारणांमुळं अक्षम्य दिरंगाई होत आहे. 'देर से आये पर दुरुस्त आये' असं काही तरी म्हणतात ते हे दोन - तीन भाग लिहिल्यानंतर खरं ठरावं अशी आशा ! पुढील भाग कधी येणार अशी पृच्छा एकाही वाचकाने न केल्यानं त्या गोष्टीचं दडपण नाही ही चांगली गोष्ट !

'बालपणातील दिवस खरे सुखाचे दिवस' असं हल्ली बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. ह्या विधानाविषयी मला आक्षेप नाही. आयुष्यातील ह्या सुवर्णकाळात मनानं जर आपण जास्तच गुंतून राहिलो तर आयुष्यातील इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो का ह्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न. ही माझी वैयक्तिक मतं असून त्यांचा कोणत्याही विशिष्ट गटावर , गावावर रोख नाही हे आधीच मी स्पष्ट करू इच्छितो. सोमवारी सकाळी हा लेख लिहिण्याचा भुंगा डोक्यात शिरल्यानं हा लेख अति संक्षिप्त स्वरूपात असणार आहे. 

१. आपलं बालपण अगदी सुखात गेलं असेल तर आपण नक्कीच सुदैवी आहात. ह्या सुखी बालपणामागे आईवडील, लहान मोठी भावंडं आजी - आजोबा, काका, काकू , आत्या, मामा, मामी, मावशी ह्या मंडळींचा मोठा हातभार होता. आता आपण जसा बालपणीच्या आठवणींचा गवगवा करतो आहोत तसा गवगवा करण्याची संधी ह्या मंडळींना मिळाली होती का हे आठवून पाहण्याचा प्रयत्न करा. 

२. बालपण सुखात गेलं, तुम्ही मोठे झालात. आता नवीन जबाबदाऱ्या आल्या, नवीन भूमिकांत तुम्ही प्रवेश केलात. मुलांच्या लहानपणी त्यांचे व्यवस्थित लाड केलेत. विशीत पोहोचलेल्या मुलांशी सुसंवाद सुरु ठेवण्यासाठी, त्यांच्या समस्या खरोखर जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? उत्तर होकारार्थी असेल खूप छान. तुमचं अभिनंदन. पण नसेल तर मग आताच विचार करायला हवा. आतापर्यंत घडलेलं आपलं व्यक्तिमत्व आपल्याला बालपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळं घडलं. नवीन भूमिका, जबाबदाऱ्या पेलविण्यासाठी ह्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू पाडण्याचं काम तुम्ही केलंत का?

३. आतापर्यंत नोकऱ्या, व्यवसायही व्यवस्थित पार पाडलेत. इतक्या वर्षांची गुंतवणूक केल्यानं आता अधिक जबाबदारी असणाऱ्या संधी तुम्हांला कदाचित खुणावतील. त्या स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारी नवीन कौशल्यं अवगत करण्याची, अधिक वेळ देण्याची गुंतवणूक करायला तुम्ही सज्ज आहात ना? मुद्दा असा आहे की अशी संधी मिळत असेल तर ती दवडू नका.  अशा सामोऱ्या येणाऱ्या संधींचा स्वीकार करा. बालपणीच्या स्मृती मधुर आहेतच, त्या सवंगड्यांसोबत असलेले आपले बंध अतुलनीय आहेत . पण सद्यकाळात सुद्धा अशा आठवणी घडू शकतात, असे बंध जुळू शकतात हेही कुठंतरी लक्षात असायला हवं.  

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

रस्त्यावरील पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट - वसईतील आठवणी




काल आमच्या शाळेच्या व्हाट्सअँप ग्रुपवर गावात मैदानावर तात्पुरता पडदा उभारून त्यावर दाखविल्या जाणाऱ्या शिणुमाविषयीची एक पोस्ट आली. आमचे शालेय मित्र अगदी जाणकार आहेत. असा शालेय जीवनातील कालावधीतील आठवणींशी संबंधित विषय निघाला की खूप मस्त चर्चा होते. १९८० - १९९० कालावधीतील जुन्या आठवणींचं भांडार उघडलं जातं. लहानपणी माझा संचार प्रामुख्यानं घर, घराभोवतालचा परिसर आणि शाळा ह्या ठिकाणांपुरता मर्यादित असल्यानं ह्या "रस्ता -मैदान सिनेमा" संबंधित आठवणीत मी भर घालू शकलो नाही. पण काल ग्रुपवर मित्रांनी व्यक्त केलेल्या ह्या आठवणींचं संकलन करण्याचा हा एक प्रयत्न ! ह्या रम्य आठवणी सांगितल्याबद्दल सर्वांचं मनःपुर्वक आभार !

सिनेमा पडदा / प्रोजेक्टर व्यावसायिक - त्या काळात रमेदी विभागातील तेली कुटुंबीय, पारनाक्यावरील भाटकर कुटुंबीय आणि होळीवरील फडके हे तीन व्यावसायिक वसई गांव आणि भोवतालच्या परिसरात सिनेमा पडदा / प्रोजेक्टर ही सेवा पुरवत असत. 

तत्कालीन वसई ग्रामस्थांच्या मनोरंजन विश्वात पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट अगदी महत्वाचे स्थान बाळगून होते. त्यामुळं कामगारदिनानिमित्त होणाऱ्या सत्यनारायण पूजेनंतर रात्री कोणता चित्रपट दाखवावा, गावातील तीन व्यवसायिकांपैकी कोणाकडून ही सेवा उपलब्ध करून घ्यावी हे निर्णय घेण्यासाठी कार्यकारी मंडळ घमासान चर्चा करत असे. घमासान हे विशेषण शक्यतो युद्धाच्या संदर्भात वापरलं जातं. कालच्या चॅटवर हे विशेषण चर्चेसाठी वापरण्यात आलं.  ह्यावरून ह्या चर्चेची तीव्रता, त्यात गुंतल्या गेलेल्या भावना ह्याचा अंदाज बांधता येतो.  

ह्या व्यावसायिकांच्या निवड प्रकियेमध्ये त्यांच्याकडं जातीने जाऊन उपलब्ध असलेल्या चित्रपटांची यादी पाहणे, प्रिंटचा दर्जावर  कार्यकारी मंडळातील सदस्यांमध्ये होणारे बौद्धिक हे अत्यंत महत्वाचे टप्पे असत. चित्रपट मराठी असावा की हिंदी ह्यावरून सभासदांमध्ये दोन तट पडत. इंग्लिश चित्रपट सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासमोर दाखवू नये हे तारतम्य सर्व सभासद बाळगून असल्यानं तिसरा तट पडत नसे. मराठी विरुद्ध हिंदी वादाला शमविण्यासाठी आळीतील जुनीजाणती मंडळी पुढाकार घेत असत. 

आळीतील बालगोपाळांचा ह्या पिक्चरच्या निवडप्रक्रियेत सहभाग नसला तरी सत्यनारायणाच्या पूजेची वर्गणी गोळा करण्यासाठी ही मंडळी आपल्या आळीबाहेर, वडीलधारी मंडळींनी आखून दिलेल्या हद्दीबाहेर जाऊन सुद्धा वर्गणी गोळा करत असत. त्यांच्या ह्या व्रात्य हरकतींमुळं वसईतील दोन आळींमधील गुण्यागोविंदाच्या संबंधांना बाधा आल्याचं उदाहरण ऐतिहासिक बखरींमध्ये आढळत नाही. 

एप्रिल महिन्यात तत्कालीन वसईतील शालेय मुलांच्या जीवनात आळीत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये रबरी चेंडूने क्रिकेट खेळणे, गोळेवाल्याकडून दहा पैशाला एक गोळा (अधिक रंगासहित) खाणे, शेजारच्या आळीतील कैऱ्या दगडानं पाडून त्यात मसाला, मीठ टाकून कोशिंबीर (हा अगदी पांढरपेशा मराठी शब्द झाला) करून खाणं वा पन्हं बनवून पिणं  आणि तीस एप्रिलला घोषित होणाऱ्या निकालाची वाट पाहणं ह्याव्यतिरिक्त फारसं काही इंटरेस्टिंग नसल्यानं कामगारदिनानिमित्त दाखविल्या जाणाऱ्या ह्या चित्रपटांशी संबंधित घडामोडी एप्रिल महिना थोडाफार मनोरंजक बनवत असत. पूजेनंतर झालेल्या प्रीमियर शो नंतर उर्वरित सुट्टी ह्या शोच्या आठवणी आळवण्यात जाई. 

अजूनही तेली कुटुंब डिजिटल प्रोजेक्टर, स्क्रीन, डिजिटल पडदा भाड्याने देण्याच्या व्यवसायात आहेत. फक्त सिनेमा ग्राहकांनी निवडायचा आणि त्यांनीच स्वतःच्या  मोबाईलवरून किंवा लॅपटॉप वरून प्रोजेक्टरला कनेक्ट करायचा हे बदल घडून आले आहेत. 

सार्वजनिक ठिकाणी पडदा उभारून पिक्चर दाखवणारी वसईतील प्रसिद्ध ठिकाणं 

इथं बऱ्याच वेळा सिनेमा ऐवजी पिक्चर ह्या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे. तत्कालीन बरेच नागरिक पिक्चर हाच शब्दप्रयोग करीत. 
  • कोळीवाडा, पोलीस लाईन, पारनाका ह्या ठिकाणी असे सार्वजनिक ठिकाणी  प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत असत. 
  • खोचीवडा, भंडारआळी, नायगाव, दरपाळे, खोचीवडा कोळीवाडा, किरवली, पापडी बाजार, पापडी ब्राह्मणआळी, वसई पारनाका, प्रभूआळी, झेंडा बाजार, चोबारे, चणेबोरी, भुईगांव ह्या ठिकाणी सुद्धा ह्या चित्रपटांचा आनंद लुटता येत असे. 
  • वसईत पूर्वी बहुतेक देवतलाव जवळ एक चंद्रलेखा नावाचे walk in थिएटर होते. तिकडे खुर्च्या नव्हत्या. जाऊन थेट जमिनीवर बसून picture बघावा लागे असे ऐकिवात आहे. लगेचच ह्या माहितीला दुजोरा देण्यात आला. "मी चंद्रलेखाला 'दुनिया मेरी जेब मे' हा सिनेमा पहायला गेलो होतो... without entry pass" असे मुख्य जाणकारांनी तात्काळ सांगितलं. 
  • रमेदी दत्त मंदिर इथं "वो कौन थी" हा चित्रपट पाहिल्याची आठवण काढण्यात आली.  
सहअध्यायी मंडळींनी नोंदविलेल्या आठवणी इथं सादर करीत आहे. 
  • हनुमान जयंतीनिमित्त झेंडाबाजारात दरवर्षी जत्रा भरायची. त्यानंतर रात्री पडद्यावर सिनेमा दाखवित असत.
  • झेंडाबाजारात संजय दत्तचा रॉकी चित्रपट पाहिला असल्याचं आठवतं असं जाणकार म्हणाले. ह्यावरून संजय दत्त ह्यांच्यासारखी पिळदार देहयष्टी बनविण्याची सुप्त इच्छा जाणकार बाळगून होते ह्या जुन्या दाव्याला पुष्टी मिळते. 
  • किल्लाबंदरला जाणारी शेवटची बस गेली की (बहुदा) रस्त्यावर पडदा उभारून चित्रपट दाखवला जात असे. उपलब्ध परिस्थितीत मार्ग कसा काढावा हे ह्या उदाहरणातून अगदी उत्तमरित्या आपल्यासमोर उभं राहतं. 
  • बाजीपुर कॉलेजच्या मैदानावर दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या फडके, होळी ह्यांच्याकडून आणलेला भयपट दाखवला जाई. इतरांना रात्री घाबरलेले बघून  भारी वाटायचे. ह्या विधान मानवी स्वभावाच्या एका महत्वाच्या पैलूचा उलगडा आपल्याला होतो. फडके ह्यांच्याकडे रामसे बंधूंच्या चित्रपटांचा भरपूर खजिना असायचा असे जाणकार म्हणाले. 
  • आता जिथे सुरतवाला complex आहे तिथे लहानपणी सुरतवाला चाळ होती. त्यासमोर देसाई वाडा आणि चाळ होती. "जागृती मित्र मंडळ" ही आमच्या वाड्यातली सक्रिय संस्था. गेल्या काही वर्षांपासून ते सुरतवाला इथं सार्वजनिक गणपती बसवतात. पूर्वी दरवर्षी  डिसेंबर महिन्यात सकाळी वार्षिक सत्यनारायण पूजा आणि रात्री शेवटची बस गेली की पडद्यावरचा चित्रपट असे. सिध्दार्थनगर आणि पोलीस लाईन मधले लोक पडद्याच्या पलीकडे बसत ( त्यामुळे त्यांना अमिताभ right handed आणि धर्मेंद्र left handed दिसत असे). ही अत्यंत मनोरंजक माहिती पुरविण्यात आली. उलट्या बाजूनं बसून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा खराखुरा आनंद मिळत असावा का ह्याविषयी जाणकारांनी आपलं मत व्यक्त करावं. 
  • पोलिस लाईनीत गणेशोत्सव एप्रिल-मे महिन्यांत सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा असायची. ह्या दोन दिवशी पडद्यावर चित्रपट दाखवला जायचा. नंतरच्या काळात VCR आले..भाड्याने VCR आणि कॅसेट आणून रात्री तीन चित्रपट दाखवले जायचे. तरीदेखील एक दिवस मात्र पडद्यावरचा चित्रपट असायचाच. त्यावेळी शाळेला हरितालिका ते अनंत चतुर्दशी अशी सुट्टी असायची .
  • आम्ही सर्व मित्र, भावंडं फाटक आळीत दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी फाटक आळीत सिनेमा बघायला जायचो. 'बॉम्बे टू गोवा' हा चित्रपट बघितलेला मला आठवतोय.
  • खोचिवड्यात दरवर्षी त्यावर्षीचा सर्वात हिट पिक्चर (जसं की शोले, जानी दुश्मन, जॉनी मेरा नाम, दिवार) आणून लोकांना त्याचा आनंद लुटण्याची संधी दिली जात असे. 
  • माझ्या  दरपाळे गावात पण मे महिन्यात पडद्यावर पिक्चर असायचा.
  • वसई मार्केटमधील नगरपालिकेच्या नाट्यगृहात पुजा असताना पडद्यावर सिनेमा दाखवला जायचा.विपुल स्विट कॉर्नर ते बाफना क्लॉथचा कॉर्नर असा पडदा लावायचे. एकदा सिनेमा चालू असताना कस्टम ऑफिसर फियाटमधुन आला. पब्लिकला माहिती नव्हते. त्याला जाऊन दिलं नाही म्हणून त्याने फायरींग केले.पब्लिकने त्याची गाडी फोडली. तेव्हापासून सिनेमा बंद झाला.
  • पडद्यावर सिनेमा पाहणे ही एक पर्वणीच असायची. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा रस्त्यावर चित्रपट बघायलाही काही वाटायचं नाही  स्वतःचं आसन, पाणी आणि खाऊ घेऊन योग्य जागा निवडून बसायचं ,खरंच किती छान होते ना दिवस! 
  • वसईच्या मार्केटमध्ये वसईतील मोठं नाट्यगृह होते. इतरवेळी तेथे फुलवाल्या व भाजीपालावाले बसायचे.
आता चर्चेचा ओघ वसईतील स्थायी स्वरूपातील चित्रपटगृहांकडे वळला. 

वसईतील चित्रपटगृहं - प्रभात, जानकी, सपना, पार्वती K. T. Vision.
  • त्याकाळी असलेल्या वसई विरार आणि परिसरातील थिएटरची नाव ठिकाणासहित सांगा? असा प्रश्न जाणकारांनी बाकी सदस्यांसमोर उपस्थित केला. 
    • वुडलँड - विरार,  धनंजय (नालासोपारा), पार्वती व के. टी. विज़न (वसई स्टेशन), जानकी व सपना - वसई गाव असे अचूक उत्तर तात्काळ दुसऱ्या जाणकारांनी दिलं.  
  • प्रभात चित्रपटगृहाचं नूतनीकरण करून त्याला मग 'जानकी' असं नांव देण्यात आलं. 
  • प्रभात सिनेमामध्ये कोणी कुठला सिनेमा बघितलेला आहे असा स्मरणशक्तीला ताण देणारा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. 
    • प्रभात थिएटरमध्ये राज कपूरचा एक सिनेमा पाहिला होता. राज कपूरच्या मागे पोलिस किंवा गुंड लागले असतात आणि तो पळत असतो. अशी माहिती पुरविण्यात आली. 
    • प्रभात मध्ये मी दादा कोंडके यांचा "राम राम गंगाराम" हा पिक्चर पाहिला होता असं जाणकार म्हणाले. 
    • प्रभातमध्ये बघितला आहे एकच, आता नाव आठवत नाही. ह्या उत्तराला मदत करण्यासाठी जाणकार पुन्हा धावून आले. कदाचित तो "बाळा गाऊ कशी अंगाई" हा चित्रपट असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं.  
  • जानकी चित्रपटगृह जेव्हा सुरू झाल तेव्हा पहिला सिनेमा कोणता होता? हा पुन्हा आत्यंतिक काठिण्य पातळीचा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. थोड्याच "नसीब" हे अचूक उत्तर देण्यात आलं.  जाणकारांनी लगेचच मी हा चित्रपट FDFS पाहिला होता ही मौल्यवान माहिती पुरवली. FDFS म्हणजे First Day First Show हे उमगायला मला बराच वेळ लागला. FDFS ची हौस पुरविण्यासाठी अडीच रुपयांचं तिकीट दहा रुपयाला घेतलं होतं असे जाणकार म्हणाले. तत्कालीन वसईतील जीवनखर्चाचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीनं ही अत्यंत मौल्यवान माहिती आहे. 
  • "नसीब" नंतर कर्झ हा चित्रपट होता अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात आली. 
  • आताच मला जाणकारांनी दहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत दिलेली अजून एक मौल्यवान माहिती आठवली. फेअर आणि लव्हली क्रीम लावून तीन तास सिनेमागृहात बसल्यास चेहरा अगदी उजळून निघतो असं ते त्यावेळी म्हणाले होते. 
  • त्याकाळी शाळेतर्फे सुद्धा मुलांना जानकी आणि सपना चित्रपटगृहात निवडक चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात येत असे. 
    • शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला होता.
    • "श्यामची आई, लॉरेन अँड हार्डी हे सपना येथे तर रॉबिनहूड हा जानकी थेटरला पाहायला गेल्याचे मला आठवते. श्यामची आई सिनेमा पाहायला गेलो होतो तेव्हा भरपूर पाऊस पडत होता" असं जाणकार म्हणाले. 
    • छोटा चेतन हा त्रिमितीय चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात आलं होतं. 
  • जानकीला तिकिटं तीन प्रकारची होती. लोअर स्टॉल, अप्पर आणि बाल्कनी. मज्जा यायची. पण एक असे होते की जानकी व सपनावाले एकावेळी कधीच सारखे सारखे चित्रपट प्रदर्शित करत नसत. 
  • दुकानात मिळणाऱ्या शाळेच्या वह्यांवर पण चित्रपटाचे नाव असे. मला शोलेची वही आठवते. 
  • अनोखा बंधन चित्रपट एकानं जानकीमध्ये तर दुसऱ्यानं सपना चित्रपटगृहात पाहिला होता .
  • वडील आम्हाला रवींद्र महाजनी ,अशोक सराफ ,अरुण सरनाईक यांचेच चित्रपट दाखवायचे अशी तक्रारवजा माहिती पुरवण्यात आली. 
  • सपना आणि जानकी ह्या दोनच टॉकीज मध्ये पिक्चर बघितलेत; पार्वती आणि के. टी. व्हिजनला कधी बघितले नाहीत. हे विधान गावातील बऱ्याच मुलांच्या बाबतीत लागू होते. सिनेमा पाहण्यासाठी खास स्टेशनला जाण्याची हौस वा चैन पुरविण्याच्या मनःस्थितीत पालक नसायचे. 
  • दिलीप प्रभावळकर यांचा एक डाव भुताचा हा चित्रपट जानकी टॉकीज ला पाहिला आहे. 
  • दादा कोंडके यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आहे. त्यांचे सलग नऊ चित्रपट गोल्डन जुबीली झालेले आहेत.
  • दादा कोंडके ह्यांच्या आणि त्यांच्या चित्रपटांच्या ख्यातीमुळं त्यांचा "गनिमी कावा" हा एकमेव चित्रपट पाहिला गेल्याचं उदाहरण सामोरे आले.
  • माझी आठवण - आमचं महामंडळ सव्वीस जानेवारी, एक मे अशा दिवशी जानकी थेटरमध्ये चित्रपटाचा शो आयोजित करत असत. बहुदा मोहोळ कुटुंबीय त्यांना चित्रपटगृह विनामूल्य उपलब्ध करून देत असत. 
  • वसई गावातील मर्यादित लोकसंख्या आणि गावातील दोनच सिनेमागृहे ह्यामुळं सुट्टीच्या दिवशी कुतूहलापोटी एखादा पिक्चर पाहायला जावं आणि नेमके शिक्षक समोर यावेत असे दुर्धर प्रसंग मित्रमंडळींवर ओढवले आहेत. अशा वेळी शिक्षकांनी बहुदा मुद्दाम कानाडोळा करून पुढं कधीच ह्या प्रसंगाची चर्चा केली नाही. 
ह्या चर्चेअखेरीस "चित्रपट" आणि "रस्ता चित्रपट" या विद्यपीठाचे कुलगुरूपद जाणकार ह्यांना  देण्यात येत आले.

अशा चर्चा जुन्या काळातील आठवणींना उजाळा देतात. कमी पैशात जीवन कसं सुखी होतं, एकमेकांशी स्पर्धा करण्याची भावना अस्तित्वात असली तरी जाणवण्याइतकी कशी प्रखर नव्हती हे आठवून बरंही वाटतं पण त्याच वेळी आजच्या जगात जे काही मिळवलं त्यासाठी गमावलेल्या अमूल्य गोष्टींची आठवण येऊन मन खंतावतं. 

युरोप सहलींचे उर्वरित भाग पुढील महिनाभरात नक्की प्रसिद्ध करण्यात येतील. 

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ११- सॅन मॅरिनो

२२ जून २०२४ 

एक आटपाट नगरी होती.  ही नगरी काहीशी डोंगराळ भागात वसली होती.ह्या देशावर राजाराणी राज्य करत होते. सर्व प्रजा सुखानं नांदत होती.  ह्या देशाला सर्व बाजुंनी एका मोठ्या देशानं वेढले होते. ह्या धाटणीची गोष्ट आपण बालपणी वाचली असेलच. गोष्टीचा प्रवास पुढे व्हायचा असेल तर ह्या दोन देशांमध्ये काहीतरी वैमनस्य असायला हवंच.  छोट्या देशाच्या राजाला सैन्य वगैरे घेऊन मोठ्या देशात जंगलातून प्रवेश करायला हवा. थकला भागला राजा घनदाट जंगलातील निळ्याशार पाण्याच्या तळ्याकाठी विश्रांती घेत असताना त्याला एखाद्या सिंहाच्या तावडीत सापडलेल्या मोठ्या राज्याच्या राजकन्येची किंकाळी ऐकू येते.... ही कथा पुढे कधीतरी!

ह्या गोष्टीला साजेशी अशी सॅन मॅरिनो आणि इटलीची गोष्ट!  मरिनो म्हणा, कोणी मारिनो म्हणा किंवा कोणी मॅरिनो म्हणा! आश्चर्याची गोष्ट म्हणजे इटलीने सॅन मॅरिनोला पूर्णपणे वेढलं  असून सुद्धा ह्या दोन्ही देशांचं अगदी व्यवस्थित चाललं आहे. दोन्ही देशातील नागरिक अगदी हसतखेळत एकमेकांच्या देशात प्रवेश करतात,  काही दिवस वास्तव्य करून  पुन्हा आपल्या देशात परत येतात. 

हॉटेल ऍडमिरल मधील स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेऊन आमची बस आता सॅन मॅरिनोच्या दिशेनं निघणार होती. जॅकला पुन्हा चालकत्व मिळाल्यानं तो खुशीत होता. आपली जबाबदारी संपल्यानं खुशीत असलेल्या एडिन (कालच्या संध्याकाळचा बदली चालक) आणि अतुलचं छायाचित्र !


तुम्हांला एखाद्या काहीशा वेगळ्या धाटणीच्या देशाविषयी माहिती करून घ्यायची असेल तर सॅन मरिनो हे एक उत्तम उदाहरण आहे. हा जगातील फक्त तीन अशा देशांपैकी एक आहे, ज्यांना पूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढले आहे.  (दुसरा देश व्हॅटिकन सिटी ज्याला सुद्धा इटलीने वेढलेले आहे.  लेसोथो हा तिसरा देश ज्याला दक्षिण आफ्रिकेने वेढलेले आहे). व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको नंतर हा युरोपमधील तिसरा सर्वात लहान देश आहे आणि जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे.  व्हॅटिकन सिटी - इटली, सॅन मॅरिनो - इटली ह्या देशांतील संबंध सौहार्दपूर्ण आहेत, लेसोथो - दक्षिण आफ्रिका संबंधामध्ये दक्षिण आफ्रिका थोडीफार दादागिरी करत असावा असं मानण्यास वाव आहे.   

सॅन मॅरिनोच्या संविधानातील तरतुदीनुसार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कायदेमंडळ, ग्रँड आणि जनरल कौन्सिल दर सहा महिन्यांनी 'कॅप्टन रीजेंट' म्हणून ओळखले जाणारे दोन राज्यप्रमुख निवडतात. ते एकाच वेळी आणि समान अधिकारांसह सेवा करतात. इथं एकंदरीत सर्व काही सौहार्दपूर्ण कारभार दिसतोय. सॅन मॅरिनो हा भूपरिवेष्टित देश आहे; तथापि, त्याचे ईशान्य टोक एड्रियाटिक किनाऱ्यावरील इटालियन शहर रिमिनीच्या दहा किलोमीटर (सहा मैल) आत आहे. देशाचे राजधानीचे शहर, सॅन मारिनो मॉन्टे टिटानोच्या वर स्थित आहे, तर त्याची सर्वात मोठी वस्ती डोगाना सेर्रावले नगरपालिकेत आहे. सॅन मारिनोची अधिकृत भाषा इटालियन आहे.

सध्याच्या क्रोएशियामधील रब या तत्कालीन रोमन बेटावरील सेंट मारिनस ह्या पाथरवटाच्या (पाथरवट हा व्यवसाय आहे!!) नावावरून या देशाचे नाव पडले आहे. पौराणिक अहवालांनुसार, त्याचा जन्म इसवीसन २७५ साली झाला होता.  लिबर्नियन समुद्री चाच्यांनी रिमीनी शहर बेचिराख  केल्यानंतर ह्या शहराच्या पुनर्बांधणीत सेंट मारिनस ह्यांनी मोलाची भूमिका बजावली. नंतर इसवीसन ३०१ मध्ये मॉन्टे टिटानोवर स्वतंत्र मठ समुदायाची स्थापना केली होती.  अशा प्रकारे, सॅन मारिनो सर्वात जुने विद्यमान सार्वभौम राज्य, तसेच सर्वात जुने घटनात्मक प्रजासत्ताक असल्याचा दावा करते. 

१७९७ साली नेपोलियनच्या सैन्याच्या आगेकुचीमुळे सॅन मारिनोच्या स्वातंत्र्याला एक छोटासा धोका निर्माण झाला.  परंतु देशातील एक रीजंट अँटोनियो ओनोफ्रीने नेपोलियनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि देशाचे स्वातंत्र्य गमावण्याचा धोका टाळला. ओनोफ्रीच्या हस्तक्षेपामुळे, नेपोलियनने, शास्त्रज्ञ आणि फ्रान्स सरकारचे विज्ञान आणि कलेचे कमिशनरी गॅस्पर्ड मोंगे यांना पत्र लिहून, प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची हमी आणि संरक्षण देण्याचे वचन दिले, त्याच्या गरजेनुसार ह्या देशाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला. इतर राज्यांच्या पुनर्वसनवाद्यांकडून भविष्यात सूड उगवला जाईल या भीतीने रीजंट्सनी हा प्रस्ताव फेटाळला. 

एकोणिसाव्या शतकात इटालियन एकीकरण प्रक्रियेतील  नंतरच्या टप्प्यात, सॅन मारिनोने एकीकरणाला पाठिंबा दिल्याने रोष पत्करलेल्या ज्युसेप्पे गॅरिबाल्डी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह  अनेक लोकांना आश्रय दिला. कालांतरानं गॅरिबाल्डीने सॅन मारिनोला स्वतंत्र राहण्याची परवानगी दिली. सॅन मॅरिनो आणि इटलीने १८६२ मध्ये मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली.

मराठी माध्यमातील नववी, दहावी इयत्तेतील इतिहासाच्या पुस्तकातील एखादा पाठ वाचतो आहोत असं तुम्हांला वाटल्यास नवल नाही. सॅन मॅरिनो इटलीमध्ये कसा काय गुण्यागोविंदानं नांदू शकतो असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं थोडीफार माहिती विकिपीडियावर मिळविली त्याचा हा परिणाम !

हॉटेल ऍडमिरल ते सॅन मॅरिनो ह्या प्रवासात सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या इटलीचे दर्शन होत होते. 








सॅन मॅरिनो देशाला वीणा वर्ल्डच्या युरोप सहलीच्या वेळापत्रकात अगदी नुकतंच समाविष्ट करण्यात आलं आहे. आपल्या सहलीत  बारा - तेरा दिवसांत इतके देश समाविष्ट करतो अशी जाहिरात करण्यासाठी सहल कंपनीला सॅन मॅरिनोसारखे इवलेसे देश हातभार लावतात. पर्यटकांच्या दृष्टीनं सुद्धा सॅन मॅरिनोला भेट देणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव आहे.

इथं आम्ही बराच वेळ चढणीच्या रस्त्यानं चालणार होतो. वृक्षांची छाया सदैव उपलब्ध असेल ह्याची शाश्वती देता येणार नव्हती. त्यामुळं ज्यांना हा तास - दीड तासाचा फेरफटका झेपणार नाही असं वाटत होतं त्यांना बसून राहण्यासाठी  एका कॅफेच्या बाह्यभागात अतुलने सोय करून ठेवली होती. आमची स्थानिक मार्गदर्शक पॅट्रिशिया आमच्या सोबतीला होती. नेहमीप्रमाणं तिनं दिलेल्या माहितीकडं लक्ष देण्याचा माझा कसोशीचा प्रयत्न आरंभीच्या काही मिनिटांतच फोल ठरला. 

ही चढणीची वाटचाल मनोरंजक होती. अनेक चिंचोळ्या मार्गांचे दर्शन होत होते. 


विविध आकर्षक वस्तूंची दुकानं होती. त्यांची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरला नाही. अचानक एक खऱ्याखुऱ्या बंदुकी, काडतुसांचं दुकान सुद्धा सामोरे आले. त्याचं छायाचित्र घेण्याचं टाळलं असलं तरी एका भयाण वास्तवाची जाणीव मनाला स्पर्शून गेली. 



अगदी काही मिनिटांतच क्रॉसबोमनच्या खाणीचं मनोहारी दर्शन झालं. 


आरंभीच्या काळात खाण म्हणून वापरली गेलेली ही जागा १९६० पासून इटालियन पद्धतीच्या क्रोसबो ह्या आयुधांच्या खेळासाठी वापरली जात आहे.  


दरवर्षी ३ सप्टेंबर रोजी इथं Palio dei Balestrieri हा सण आणि स्पर्धा आयोजित केली जाते.  पुढील वाटचालीत वैविध्यपूर्ण शिल्पं, नजराणे दिसत राहिले. 







थोड्याच वेळात आमचं आगमन Piazza della Libertà ह्या सॅन मॅरिनोच्या मुख्य चौकात झालं. छायाचित्रणासाठी ही एक उत्तम संधी होती. परंतु उन्हात बराच वेळ चालल्यानं चेहऱ्यावरील टवटवीतपणा काही प्रमाणात लोप पावला होता.  इथल्या मुख्य वास्तूला Palazzo Pubblico ह्या नावानं संबोधिले जाते. इटालियन भाषेतून इंग्लिश भाषेत भाषांतर करण्यासाठी हा एक सोपा शब्द आहे. इथं सार्वजनिक समारंभ आयोजिले जातात; त्याचसोबत अधिकृत शासकीय समारंभाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं. 




बराच वेळ फेरफटका मारून झाल्यावर आम्ही खाली कॅफेमध्ये थांबलेल्या आमच्या सहप्रवाशांना भेटलो. त्याच कॅफेमध्ये आम्ही इटालियन जेवणाचा आस्वाद घेणार होतो. युरोपियन देशांत सुद्धा भारतीय जेवणांचाच सतत आस्वाद (?) घ्यावा लागल्यानंतर आता इटालियन पद्धतीचं जेवण दिलं जाणार ह्या बातमीनं निर्माण झालेली हास्यमुद्रा ! 


इथं थ्री कोर्स जेवण होतं. प्रथम आला तो tortellini पास्ता ! हा बंदिस्त पास्ता असतो. सहसा ह्यात मांसाहारी पदार्थ भरले असले तरी आमच्यासाठी खास शाकाहारी आवृत्ती बनविण्यात आली होती. 


त्यानंतर आलं ते वांगं ! आता हे असं आपल्याला वसई - बोरिवलीत आणून दिलं असतं तर आपण ह्याकडं ढूंकूनसुद्धा पाहिलं नसतं. पण सॅन मॅरिनोमध्ये एक खास इटालियन नव्हे सॅन मॅरियन शेफ आपल्याला हे आणून देतोय ह्या विचारानेच आनंदी होऊन आम्ही हे वांगं खुशीने ग्रहण केलं.  त्यानंतर अमर्यादित पिझ्झा आणून देण्यात आला. परंतु बहुदा तीन स्लाइस नंतर त्यांचा पिझ्झा संपला. पण एकंदरीत एक वेगळा अनुभव !




मुख्य आचारी अगदी हसऱ्या मुद्रेचा होता. सोहमला "त्याच्यासोबत फोटो घे!" अशी मी केलेली विनंती सोहमने थोड्याच वेळात मान्य केली. १९९० सालच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान  मी इटालियन फुटबॉल संघाचा आणि खास करून रॉबेर्तो बाजिओचा चाहता होतो. हा शेफ त्याच्यासारखा दिसतोय अशी मनाची समजूत करून मी हे छायाचित्र संग्रही ठेवणार आहे. 


बाकी काही म्हणा ह्या वांगीं समाविष्ट इटालियन जेवणाने पोट काही फारसं भरलं नाही. त्यानंतर बराच वेळ आम्ही इथं दुकानांत खरेदीसाठी भटकलो. माझ्यासारख्या माणसानं सुद्धा इथं थोडीफार खरेदी केली. ह्यावरून इथल्या काही दुकानातील वस्तुंचा भाव खरोखर माफक असावा ! 


आता आम्ही बसमध्ये बसून रोमच्या दिशेनं प्रस्थान केलं. हा साधारणतः  साडेतीनशे किलोमीटर अंतराचा पल्ला होता. ह्या प्रवासात आरंभीच्या काळात ऍंड्रियाटिक समुद्राने आमची साथ दिली. ह्या समुद्राचं पाणी अगदी निळंशार, नितळ होतं. कधी पाण्याच्या दोन तर कधी तीन छटा बसमधून सुद्धा स्पष्ट दिसत होत्या. कोकणात आरे वारे इथं समुद्राच्या अशा छटा दिसल्या होत्या असं प्राजक्ता म्हणाली. मला कोकणातील जेवणाव्यतिरिक्त फारसं काही आठवत नसल्यानं मी मान डोलावली. 



ह्या प्रवासातील दोन व्हिडीओ आणि काही चित्रं !







ऍंड्रियाटिक समुद्र







इटालियन शेती ! 
युरोपातील  थंड भागांना अन्नधान्याचा पुरवठा करायचा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना मेहनत तर करावी लागणारच !



कापणी केलेल्या शेतांमध्ये शिस्तीनं उभे राहिलेले बाल वृक्ष ! त्यांनाही दररोज न्हाऊ घालून, त्यांचे केस वगैरे विंचरून त्यांच्या मातांनी इथं उभं केलं आहे की काय असा संशय यावा इतकं त्यांचं नीटनेटकं रूप !


रोमच्या जवळ आल्यानंतर दिसलेली काही सुंदर फुलं !



आमचं रोममधील हॉटेल शहराच्या बाह्य भागात होतं. रोम शहराच्या ह्या बाह्य भागाचं  प्रथम दर्शन तरी काही फारसं आकर्षक नव्हतं. 



हॉटेल आणि सायंकाळचे भारतीय हॉटेलमधून मागविलेलं जेवणसुद्धा साधारण दर्जाचं होतं. जेवणानंतर आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला नसला तरी सायंकाळच्या वेळची जाणवणारी एक हुरहूर इथंही जाणवत होती. ऐतिहासिक रोम शहरात प्रवेश केल्याचा आनंद एकीकडं मनाला सुखावत होता, त्याचवेळी आता ह्या एका संस्मरणीय सहलीचे केवळ दोनच दिवस बाकी राहिल्याची भावना कुठंतरी चुटपुट निर्माण करत होती. 


ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 

(क्रमशः )
 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...