मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

Park Your Thoughts!


मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली.   This is a boy. His name is Gopal. He is reading a book. इथून आमची इंग्लिशशी तोंडओळख झाली. इंग्लिश भाषेचा वापर करताना देखील मराठी भाषेचा पगडा कायम होता. सागर चित्रपट प्रसिद्ध झाला त्यावेळी डिंपलचे स्पेलिंग Dimpal असावे ह्याविषयी आमच्या सर्वांचं एकमत होतं. बरीच वर्षे उलटुन गेली. व्यावसायिक जगात नवनवीन वाक्प्रचारांचा वापर ज्यावेळी प्रथमच ऐकला त्यावेळी मनातील विनोदी बुद्धी जागृत झाली. हे वाक्प्रचार आता मी ही सर्रास वापरतो. पण अजुनही हे विनोदी विचार मनात अधुनमधून येत राहतात. 

Keep Me Honest Here 

खरा अर्थ - एखाद्या संदिग्ध विषयावर आपल्या समजुतीनुसार भल्या मोठ्या मीटिंगमध्ये आपण मोठमोठी वाक्यं बोलत असतो त्यावेळी आपली समजुतच चुकीची असेल तर आपल्या पुढील बोलण्याला काही अर्थच उरत नाही. अशा वेळी चारचौघात आपलं हसं होऊ नये म्हणून त्या बैठकीतील सर्वात ज्ञानी माणसाचे नांव घेऊन Keep Me Honest अशी प्रस्तावना करण्याची पद्धत आहे. असं बोललं की पुढं काहीही ठोकून द्यायला आपल्याला मोकळं रान मिळतं. 

chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !




Park Your Thoughts 

खरा अर्थ - मीटिंग मध्ये एकाच वेळी अनेक जण बोलायला लागले की त्यातील एक माणुस दुसऱ्याला "Park Your Thoughts" अशी विनंती करतो. आपल्या स्वतःच्या विचारांची शृंखला (Chain of thoughts) अबाधित राहावी असा स्वार्थी विचार त्यामागं असतो. आता दुसरा देखील ह्याला बोलू शकतो की "You Park Your Thoughts" पण हे सभ्य लोकांचं जग असल्यानं असं काही घडत नाही. बऱ्याच वेळा पहिल्याचं बोलणं संपेपर्यंत दुसरा एक तर आपले विचार विसरलेला असतो किंवा त्याच्या मुद्द्यातील हवा निघुन गेलेली असते! 


chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !



आमच्या मनात आधीच इतके विचार असतात की नवीन विचारांना वाहनतळावर थांबवून ठेवायला जागाच नसते !


All things being equal 

खरा अर्थ - दोन शक्यतांमध्ये निव्वळ तुलना करताना बाकीचे सर्व घटक समान असावेत. 


chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !




Leap of Faith 

खरा अर्थ - आपल्याजवळ असलेली माहिती, उपलब्ध सामुग्री ह्यांच्या आधारे एखादं मोठं आव्हान स्वीकारताना यशाची १०० टक्के खात्री नसताना देखील पुढं जाण्याचा धाडसी निर्णय घेणं ! 



chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !



Lock, Stock and Barrel 

खरा अर्थ - सरसकट! 



Groundhog Day - 

हा वाक्प्रचार नसुन उत्तर अमेरिका आणि कॅनडा भागातील परंपरा आहे. दोन फेब्रुवारी रोजी जर groundhog नावाचा प्राणी आपल्या बिळातून बाहेर आला आणि आपली सावली पाहु शकला तर हिवाळा अजून सहा आठवडे टिकेल. आणि जर असं झालं नाही तर वसंत ऋतूचे आगमन लवकर होईल. यंदाचा groundhog चा कौल प्रदीर्घ हिवाळ्याच्या पारड्यात पडला आहे. आगामी भेटीसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे !

(विनोदी प्रतिमांसाठी chatgpt चे आभार !)

जाता जाता एक विनोदी विचार! मागील पिढ्यांतील पुरुष पुर्वसूचना न देता पाच सहा मित्रांना घरी अचानक भोजनासाठी आणण्याची Leap Of Faith वारंवार घेत असत. आम्ही मात्र हा विचार सदैव Park Your Thoughts मध्ये गुंडाळून ठेवतो. 

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

Murphy's Law आणि आपत्कालीन व्यवस्थापन


मी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तत्वांचा चाहता आहे. ही तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात योग्य प्रकारे वापरली तर खुप सकारात्मक बदल घडून येऊ शकतो ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. वेळेअभावी आजची पोस्ट अगदी छोटी असणार आहे.  

आजचं तत्त्व आहे 'आपत्कालीन व्यवस्थापन'.  माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यावेळी एखादा मोठा बदल (आज्ञावली / infrastructure संबंधित) अंमलात आणण्याची तयारी सुरु असते त्यावेळी संबंधित टीमला अनेक मुद्द्यांची तपासणी यादी भरून द्यावी लागते. त्यातील काही महत्वाचे मुद्दे 

१. ह्या बदलामुळं जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर ती तुम्ही कशी निस्तराल? 

२. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या क्षणापासून ते योग्य व्यक्तीला संदेश पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे? ही संदेशवहनाची प्रक्रिया पुर्णपणे automated आहे की नाही?

३. ह्या आणीबाणीच्या परिस्थितीची रंगीत तालीम तुम्ही केली आहे की नाही?  ही रंगीत तालीम प्रत्यक्षातील परिस्थितीशी किती मिळतीजुळती आहे? 

टीमकडे वरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरं नसतील तर त्यांना तो बदल अंमलात आणण्यास परवानगी दिली जात नाही. आणि जर ह्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं देऊन जर बदल अंमलात आणला गेला आणि प्रत्यक्ष जीवनात (production environment) मध्ये ह्या बदलाने गोंधळ घातला तर तुमचं नाव काळ्या यादीत टाकलं जातं. पुढील बदल अमलात आणण्यासाठी तुमच्यावर अधिक कठोर बंधनं घातली जातात. 

आपल्या भोवती जे सुरु आहे त्यात प्रचंड बदल अगदी किमान तपासणी यादीच्या आधारावर प्रत्यक्ष जीवनात अमलात आणले जात आहेत. ह्या सर्व मुलभूत सुविधांच्या बाबतीत आणीबाणीच्या कोणत्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात, त्यावर उपाय कसा काढावा, कोणाला तात्काळ पाचारण करावं ह्याविषयी कोणतीही सुस्पष्ट योजना कागदावर नाही. त्यामुळं आपण ह्या सर्व सुविधांचा वापर करत असताना कोणता धोका घेत आहोत ह्याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे.  इथं मर्फीचे तत्त्व उद्धृत करावंसं वाटतं. 

 Murphy's Law -  "Anything that can go wrong, will go wrong". 

भविष्यात जर तुम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यासाठी पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस वे ने निघणार असाल तर गेले दोन दिवस चाललेली महाकाय वाहतूक कोंडी लक्षात ठेवा. ही सुविधा निर्माण करणाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाकडं पुरेसं लक्ष न दिल्यानं ह्या महामार्गाचा आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी वापर करण्यात जो काही धोका असतो त्याचं स्वामित्व तुम्हांलाच घ्यावं लागणार आहे! 

Park Your Thoughts!

मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली.   This is a boy. His name is Gopal. ...