मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

२०२५ आठवणींच्या हिंदोळ्यावर

दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की वर्तमानकाळाशी आपल्या भुमिकेसाठी सदैव सज्ज राहत भविष्यकाळाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूक करायची हा यक्ष प्रश्न! 

२०२५ वर्ष पहायला गेलं तर माझ्यासाठी मानवी मनाच्या आतील कंगोरे उलगडवून दाखविणारे ठरलं. 'केल्यानं देशांतर मनुजा येत शहाणपण'  ह्या म्हणीची सार्थता मला प्रत्येक दौऱ्यात येते. माझ्या बाबतीत शहाणपण म्हणण्यापेक्षा प्रत्येक दौरा माझं अज्ञानीपण थोडं थोडं कमी करत असतो. एक क्षण असा येतो की आपण स्वतःला आपल्या अज्ञानीपणासहित आत्मविश्वासानं स्वीकारतो, त्यानंतर सर्व काही रम्य भासु लागतं. 

फेब्रुवारी अमेरिका दौऱ्यात फिलाडेल्फिया विमानतळावरून डल्लासला जाताना विमानाचे चाक पंक्चर झाल्याची उद्घोषणा झाल्यानंतर चार तास भोवताली असलेल्या प्रवाशांचे वागणं हे मानवी स्वभावाच्या अभ्यासासाठी एक उत्तम संधी होती. काहीजण शांतपणे आपल्या कामात व्यग्र राहिले, तर काही जण बैचैन झाले. चार तासानंतर परत विमानात बसल्यावर देखील ज्यावेळी अर्धा तास विमान निघण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मात्र काही जण खरोखर बैचैन झाले. दोघा जणांनी तर विमानातुन उतरणे पसंत केले. मला ह्यावेळी नक्की काय वाटत होते हे मला नक्की सांगता येणार नाही. पण एकदा का तुम्ही एखादा व्यवसाय निवडला की त्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकाराव्या लागतात. जर तुमच्या व्यवसायामुळं तुम्हांला सतत प्रवास करावा लागणार असेल तर प्रत्येक वेळी विमानात बसताना तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकता कामा नये. 

मे महिन्यात मोजके दिवसच सुरु असलेल्या युद्धानं देखील आपल्या सर्वांना जीवनाच्या अशाश्वततेबद्दल पुन्हा एकदा जाणीव करून दिली. बढती मिळाली नाही, पगार कमी प्रमाणात वाढला, सेन्सेक्स गडगडला ह्या गोष्टींनी दुःखी होणारे आपण! ह्या सर्व गोष्टींना जीवनातील सर्वात मोठ्या सत्याच्या भिंगातून तपासून पाहावं, मग आपल्याला आपल्या विचारांचा फोलपणा जाणवुन येतो. 

पावसाळा वेळेआधी सुरु होऊन बराच काळ लांबला. निसर्ग आपल्याला स्पष्ट संदेश आहे. पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करत आपल्या अल्पकालीन स्वार्थासाठी जगण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवानं आपल्या पुढील पिढीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील.  महानगरातील आपली प्रशस्त घरं, गाड्या, शेअर बाजारातील गुंतवणुकी हे सारं सारं काही निसर्गाच्या प्रलयापुढं शून्य आहे. भारतातील समस्यांपासून परदेशी जाणं हा काही वर्षांपुर्वी योग्य असलेला पर्याय आपणच तिथं केलेल्या गर्दीमुळं आता फारसा योग्य ठरणारा राहिला नाही. 

ह्या वर्षातील माझ्या आयुष्यातील काही मोजकी छायाचित्रं !
 



भाईंदर खाडीवरून लोकल जातांना फोटो काढल्याशिवाय चैन न पडणारा मी ! 



घराभोवतालच्या अंगणात फिरताना आकाशातील ढगांची सुंदर नक्षी! 


आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान - पाटील कुटुंबीयांचा गावातील गणपती! बालपण पुन्हा नव्यानं आठवून देणारा हा गणपती !



अग्रोवन सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला अमिश वसाहतीवरील माझा लेख! 


घराभोवतीच्या गोकर्णाचं फुल !



सप्टेंबर मधील अमेरिका फेरीनंतर परतताना उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात दिसलेलं लाल रंगांचं रहस्यमय विवर ! मला पळवुन नेण्यासाठी परग्रहवासी अंतरिक्षयान घेऊन नक्की येणार ह्याविषयी माझी नक्की खात्री झाली होती. X Files मालिका बघण्याचा हा परिणाम !


सप्टेंबर मधील अमेरिका फेरीत सहकाऱ्याच्या घरी नवरात्रात मांडलेला गोलु ! खरी श्रद्धाळू माणसं कोणत्याच सबबी पुढे करत नाहीत हा माझ्यासाठीचा संदेश ! 


अमेरिकेतील हॉटेलभोवतालची बदके ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 

                        अमेरिकेतील हॉटेलभोवतालच्या पाऊलवाटेवर भेटलेली ही रानफ़ळे  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 




अमेरिकेतील हॉटेलभोवतालची पानगळ  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 





वसईत आढळणारा रानटी वेल ! त्याची फळं आम्ही क्रिकेटचा चेंडू म्हणून वापरलेली. वसईत ज्यांचं बालपण गेलं त्यांना नक्की आठवेल. 


कार्यालयातील नेत्रदीपक भोजन ! ह्यातील नक्षी किती आणि खरं ग्रहण करण्यासारखे खाद्यपदार्थ किती ह्याविषयी प्रचंड साशंक असणारा मी ! 


चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे !
एअर इंडिया विमानातुन विश्रांती घेत असलेल्या इंडिगो विमानाचं घेतलेलं छायाचित्र !




कार्यालयातील आसनावरून दिसणारा सुर्यास्त ! दक्षिणायन आणि उत्तरायण बरोबर समजावून सांगणारं माझं आसन !


मराठी भाषेची भोवताली सुरु असलेली अधोगती दाखवणारा हा T1 टर्मिनलवरील बोर्ड ! सोलापूरवरून आलेल्या विमानाची स्थिती "आलेली"

 

सुदैवानं ह्या आठवड्यात थंडी जोरदार पडलेली ! तेल गोठल्यावर उन्हात ठेवून ते वितळविणे ही माझ्या वडिलांची सवय! त्या आठवणीला उजाळा देताना !


अमेरिकेतील संजेशला वसईतल्या खऱ्याखुऱ्या नाश्त्याची चव मिळावी ह्यासाठी मेहनत घेऊन राकेश, वैभव ह्यांनी चार पाच हॉटेलातून आणलेले हे चविष्ट पदार्थ ! 

धन्यवाद २०२५ ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२५ आठवणींच्या हिंदोळ्यावर

दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...