मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

जडले नाते ढगांशी !






मागच्या जन्मी मी आदिमानव होतो त्यावेळची गोष्ट! जंगलातून फिरताना अचानक सामोऱ्या येणाऱ्या नदीच्या विस्तृत पात्रातील अत्यंत वेगाने वाहणाऱ्या जलप्रवाहाकडे बघून मी खूप अचंबित होत असे. या जलप्रवाहाचा स्त्रोत म्हणजे आकाशातील ढगातून होणारी पर्जन्यवृष्टी हे समजावयास मला फार वेळ लागला होता.  परंतु त्यानंतर मात्र या ढगांकडे मी मोठ्या आदराने पाहत असे.  पावसाळ्यात हे ढग माझ्या जीवनाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवतील की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत असे.  याउलट उन्हाळ्यात झपाट्याने कोरड्या पडू लागलेल्या नदीच्या पात्राकडे पाहून मी मोठ्या आशेने या ढगांची वाट पाहत असे. 

या जन्मी शहरांच्या काँक्रीट जंगलात आयुष्य व्यतित करत असताना ढगांशी संपर्क होत असला तरी त्यांच्याशी संवाद मात्र फारसा होत नाही.  याला अपवादात्मक असे काही क्षण येतात जसे की कार्यालयातील गवाक्षातून पावसाळ्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ढग दाटून येतात! त्यावेळी कदाचित माझ्या मागच्या जन्मीच्या स्मृती जागृत होत असाव्यात.  परंतु ढगांशी या आयुष्यात अगदी जवळून असा संपर्क म्हणा किंवा संवाद म्हणा होतो असा प्रसंग म्हणजे विमानप्रवास! विमानप्रवासाच्या बाबतीत मी कार्यालयीन कामांसाठी जेव्हा प्रवास करतो त्यावेळी खिडकीची जागा मिळवण्यासाठी माझा मोठा अट्टाहास असतो.  असंच या रविवारी हैदराबादला जाताना सायंकाळच्या विमान प्रवासात अचानक ढगांच्या मोठ्या परिसंस्थेतून प्रवास करण्याचा मोका मिळाला. ही परिसंस्था मोठी क्लिष्ट होती. ढगांची आपण ज्यावेळी छायाचित्र पाहत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपण केवळ द्विमितीय ढगांची कल्पना रेखाटत असतो.  परंतु विमान ज्यावेळी अशा महाकाय ढगांमधून प्रवास करतं त्यावेळी त्यांच्या अवाढव्य पसरलेल्या तिन्ही मितींची आपणास स्पष्ट जाणीव होते. या ढगांची ही रूप अत्यंत लोभसवाणी अशी असतात. या चित्रांमध्ये ढगांच्या बहुधा अशा तीन परिसंस्था दिसत आहे. या परिसंस्था निर्माण होण्यासाठी पर्यावरणातील कोणते घटक कारणीभूत ठरले असावेत हा संशोधनाचा विषय आहे.  परंतु असे उभे आडवे पसरलेले गोलाकार ढग ज्यावेळी मावळत्या सूर्यकिरणांनी उजळून निघतात तेव्हा त्यांची ही रूप अत्यंत मनोवेधी अशी असतात.  ह्या महाकाय ढगांच्या आसपास काहीशे अत्यंत छोटुकले परंतु वेगाने प्रवास करणारे स्लिम आणि फिट ढग सुद्धा प्रवास करत असतात.  मनात वेगवेगळे विचार येतात.  महाकाय ढगांची परिसंस्था कमी वेगाने प्रवास करत आपल्या सानिध्यात येणाऱ्या भूमातेला आपल्या थंडगार जलधारांनी तृप्त करत पुढे जात राहते. याउलट स्लिम व फिट ढग मात्र आपल्याच नादात "मै जिंदगी का साथ निभाता चला गया!' हे गाणे गुणगुणत पुढे जात राहतात.  

हैदराबादचा प्रवास मोजून मापून तासाभराचा!  अशी ही ढगांची परिसंस्था आपल्या सोबतीला वीस पंचवीस मिनिटे असली तर हा प्रवास खूपच मनोरंजक होतो.  वास्तवात यायचं झालं तर हे ढग आपल्या विमानाला हेलकावे देत राहतात.  त्यामुळे त्या तासाभरात आपल्याला मिळणार सँडविच आपल्याला काहीशा विलंबाने मिळतं, पाच मिनिटातच आपल्याला ते संपवावे लागतं. बिचाऱ्या त्या ढगाला त्याच्या मुळे होणाऱ्या माझ्या आयुष्यातील परिणामांची काय कल्पना! हैदराबादच्या प्रवासात दिसलेला हा ढग म्हणून कदाचित याचं नाव काहीसं तेलगू प्रकारात मोडणार असावं असा माझा कयास! 

आता सहजच आठवलं म्हणून लंडनच्या परतीच्या प्रवासात दिसलेल्या जॉन ढग आणि त्याच्या कुटुंबाचे हे एक मोहक दृश्य !


चिंता करू नका मी ठीक आहे.  उद्यापासून येणाऱ्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीच्या विचारामुळे असं काही झालं असेल कदाचित! 

जडले नाते ढगांशी !

मागच्या जन्मी मी आदिमानव होतो त्यावेळची गोष्ट! जंगलातून फिरताना अचानक सामोऱ्या येणाऱ्या नदीच्या विस्तृत पात्रातील अत्यंत वेगाने वाहणाऱ्या जल...