मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

एक संध्याकाळ !



आश्लेषा - "आपलं दोघांचं एकत्र बसून असं बोलणं कधीच होत नाही?"

ऋषिकेश - "आपलं बोलणं होतच नाही असं कसं म्हणतेस तू? आपण नाही का एकत्र बसून संध्याकाळी चर्चा करतो?

आश्लेषा - "त्याला काही एकत्र बोलणे असे म्हणतात येणार नाही.  त्यावेळी आपल्या दोघांच्या हाती मोबाईल असतात!  टीव्ही चालू असतो, आपली सायली मध्ये मध्ये येऊन तिच्या विश्वातील काही घटना आपल्याला सांगत असते !

ऋषिकेश - "या पलीकडे तुला कोणत्या प्रकारचा संवाद अपेक्षित आहे?"

या प्रश्नावर आश्लेषा अत्यंत हैराण!! काही मिनिटांच्या मौनानंतर 

आश्लेषा - " मला नक्की काय म्हणायचं आहे ना ते तुला इतक्या वर्षांच्या संसारानंतर सुद्धा कधी कळणारच नाही!! कधी कधी तर मला असा संशय येतो की तु न समजल्याचे नाटक करत असावा!! 

ऋषिकेश काहीसा नाराज होतो.  थोडा वेळ दोघंही गप्प बसतात त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर ऋषिकेश आपले विचार सावरून घेतो आणि पुन्हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करतो.  

ऋषिकेश - " म्हणजे आपल्या आयुष्यातील आतापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि त्यानंतरच्या संभाव्य वाटचालीविषयी आपण बोलावं असं म्हणायचं आहे का तुला? "

आश्लेषाची नाराजी पूर्ण दूर झालेली नाही. तरीसुद्धा ऋषिकेशने हा संवाद पुढे सूरू करण्याचा प्रयत्न केला याचं तिला मनातून कुठेतरी बरं वाटतं.  या बरं वाटलं म्हणून ऋषिकेशला शाबासकी द्यावी हा विचार कुठेसा अस्पष्टपणे तिच्या मनात डोकावतो.  त्या विचारानं गंभीर रुप धारण करुन  तो आपल्या तोंडुन बाहेर निघण्याआधीच त्या विचाराला धुडकावून लावण्याची काळजी ती घेते !!

आश्लेषा - "हो,  हो!! काहीसं असंच म्हणायचं आहे मला !!"

ऋषिकेश - " असे संवाद आपण गंभीरपणे जरी चर्चिले नसले तरी ढोबळमानाने पुढील आयुष्यात काय करायचं आहे याविषयी आपलं एकमत आहे असं मला वाटतं!  म्हणजे अगदी मुद्देसुद आराखडा बारीकसारीक तपशीलांसहित जरी आपण बनवला नसला तरी योग्य वेळ येताच आपण तो नक्कीच बनवु ह्याची खात्री आहे मला !!

आश्लेषा - "ओके !! आपण एकमेकांना पुरेसा वेळ देतोय का? भावनिकदृष्ट्या एकमेकांना आपण जाणुन घेतोय का?"

ऋषिकेश बहुदा चर्चेनं घेतलेल्या ह्या वळणाला तयार नसावा. त्यामुळं तो काहीसा हबकुन जातो. ही आतापर्यंत ठीक होती, अचानक तिला काय झालं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसुन येतात !

ऋषिकेश - "तुला नक्की काय म्हणायचं आहे समजावुन सांगशील का?"

आश्लेषा - "मी शुद्ध मराठीत सांगितलं आहे. तु मला भावनिकदृष्ट्या समजुन घेतोस का किंबहुना तसा किमान प्रयत्न तरी करतोस का?"

आश्लेषानं उत्तर देईस्तोवर मिळालेल्या वेळात ऋषिकेशचा मेंदु परिस्थितीचं गांभीर्य ओळखतो. मेंदुचा सर्व विचारशक्ती ह्या चर्चेकडं आणणं ही ह्यावेळची गरज आहे हे त्याच्या मेंदुला समजलेलं असतं ! 


ऋषिकेश - "तु मला भावनिकदृष्ट्या समजावुन घेतेस का? किंबहुना मलासुद्धा भावनिकदृष्ट्या समजावुन घेणं ही तुझ्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी ह्याचा तु कधी विचार केला आहेस का ?

भयंकर आश्चर्यचकित झालेली आश्लेषा मध्ये  काही  बोलु  इच्छिते ! तिला थांबवुन 

ऋषिकेश - " लेट मी फिनिश ! मला माझं बोलणं पुर्ण करु देतं ! तु लौकीकार्थानं माझी सगळी काळजी घेतेस. वेळच्यावेळी डबा, जेवण देतेस. घरात मला काही एक म्हणुन पाहावं लागत नाही. तु ही माझ्याप्रमाणं नोकरी करत असलीस तरी सुद्धा घरकामात मला अजिबात लक्ष घालावं लागत नाही. पण .... पण मलासुद्धा काही भावनिक गरजा असु शकतात ह्याचा तु कधी विचार केला आहेस का? 

आश्लेषा - (डोळे मोठे करुन!) " तुझ्या भावनिक गरजा!! व्हॉट डु यु मीन ऋषिकेश?

ऋषिकेश - " मी सुद्धा कधी उदास असु शकतो, मलाही क्वचित सगळ्याचा कंटाळा येऊ शकतो !!"

आश्लेषा - "हं ... May be I should keep this thing in mind!!"

ऋषिकेश -" Thank You!"

ह्या  चर्चेत आपण अचानक बॅकफूट वर गेलो आहोत ह्याची  आश्लेषाला जाणीव  होते . 

आश्लेषा - " पण तु हा मुद्दा अचानक कसा आज काढलास? इतकी वर्षं तु मला त्याची जाणीव सुद्धा का करुन दिली नाहीस?


ऋषिकेश (खट्याळपणे )- " ते ही खरंच !! पण जर गंभीरपणे बोलायचं झालं तर तुम्ही हल्लीच्या स्त्रिया बहुदा आम्हां पुरुषांना गोंधळवुन टाकत असाव्यात !! बाकीच्या सर्व वेळी आमच्या खांद्याला खांदे लावुन कार्यरत असता आणि मग कधीतरी अचानक आम्ही तुम्हांला भावनिकदृष्ट्या संभाळून घ्यावं आणि ते सुद्धा तुम्ही शब्दरुपात स्पष्टपणे न सांगता ही तुमची अपेक्षा असते ! पण खरं सांगायचं झालं तर ह्या बाबतीत बहुतांशी पुरुषांची बुद्धी जास्त चालत नाही ! "

आश्लेषा - " हे असं बोललं की झालं ! आमची बुद्धी चालत नाही  वगैरे सांगितलं की तुम्ही हात झटकायला मोकळे !!

ऋषिकेश - "आता आपलं बोलणं होतंच नाही इथुन सुरु झालेली चर्चा आपण गेली पंधरा मिनिटं करत आहोत हे तरी तु मान्य करशीलच ना?"

आश्लेषा - " नाही नाही ! ही कसली चर्चा ! हे तर एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन एकमेकांवर टीका करणं चालु आहे आपलं ! मुख्य चर्चा तर बाकी आहे मेरे दोस्त !!"

ऋषिकेश - " ओहो तु  मला दोस्त म्हणालीस ! क्या बात आहे !!"

आश्लेषा - (काहीशी लाजुन) " पण ऋषी मला एक गोष्ट जाणवली ! ही जी काही शांत बसुन चर्चा वगैरे आहे ना , त्यात पहिली काही मिनिटं दोघांना मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्यातच जातात !"

ऋषिकेश - "मगाशी भावनिकदृष्ट्या झालं आता मानसिकदृष्ट्या ! अजुन कोणी दृष्ट्या बाकी आहे काय?"

आश्लेषा - "तु आहेस ना मुख्य दृष्ट्या !!"

ऋषिकेशला हसु आवरत नाही !

आश्लेषा - " महत्वाचा मुद्दा असा की बरीचशी जोडपी अशी शांतपणे चर्चा करायला बसली की सुरुवातीचा हा जो मानसिकदृष्ट्या एका पातळीवर येण्याचा प्रकार असतो ना त्यातच आरोपाच्या फैरी झडत असाव्यात ! त्यामुळं मुख्य चर्चेपर्यंत मंडळी पोहोचतच नसावीत !"

ऋषिकेश - " हे मात्र खरं !"

आश्लेषा - "तर आपण आता मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आलो आहोत ! आता खऱ्या चर्चेला सुरुवात करूयात का?

ऋषिकेश - "अरे यार ! माझा मेंदु पार थकुन गेलाय !! पुन्हा कधीतरी नक्की !

आश्लेषा - " ठीक आहे ! तुझ्या चेहऱ्यावरील भाव पाहुन मी तुला माफ करतेय ! पण दोन अटींवर !

ऋषिकेश - "आता कोणत्या दोन अटी ? "

आश्लेषा - " आज झालेली ही मानसिकदृष्ट्या एका पातळीवर येण्याची चर्चा पुढील एका वर्षासाठी ग्राह्य राहील !! "

ऋषिकेश (डोळे मोठे करीत ) - "आणि दुसरी ?"

आश्लेषा - "आता आपण दोघेजण मॉलमध्ये जायचं !!"

ऋषिकेश - "........ "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...