मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

मस्त्यगाथा !!



वसईत मांसाहारी लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. या लक्षणीय वर्गामध्ये माझादेखील समावेश होतो. आता या सर्व मांसाहारी लोकांना सरसकट एका वर्गात बसविता येणे कठीण आहे. काही लोकांची झेप मांसाहाराच्या विशिष्ट प्रकारांपुरता मर्यादित असते तर काही लोक मांसाहाराचे उपलब्ध सर्व प्रकार अजमावुन पाहतात. 

मी ज्या मांसाहारी वर्गात मोडतो त्या वर्गाच्या मांसाहाराचे दोन मुख्य प्रकार केले असता चिकन / मटण हा पहिला प्रकार आणि मासे हा दुसरा प्रकार म्हणता येईल. माशांमध्ये सुद्धा वर्गीकरण करायचे झाले तर पापलेट आणि पापलेट सोडून बाकी सर्व मासे असे दोन मुख्य प्रकार म्हणता येतील. वसईतील काही पुरुष मंडळी बाजारात मासे आणायला जातात. बहुदा लग्नानंतर या प्रकारास सुरुवात होते. स्वानुभवावरून मी हे विधान केलं असावं. ज्यावेळी पुरुष मंडळी मासेबाजारात आणि खास करून होळी बाजारात येतात त्यावेळी तिथल्या
कोळिणींची खास प्रतिक्रिया होत असावी असा माझा अंदाज आहे. पुरुषवर्गाच्या आगमनानंतर माशांचे दर आपसूक काही टक्क्याने वरती जात असावेत. ही बाब गेल्या काही वर्षांच्या अनुभवाने मी शिकलोअसावो असं मला वाटतं. ज्या दराने मी मासे विकत आणले तो दर मी केव्हाच घरी सांगत नाही.  मी बाजारात मासे आणायला जाण्याआधी ही अट कबूल करून घेतली आहे. मासे प्रत्यक्ष खरेदी करण्याआधी संपूर्ण बाजारात एक चक्कर मारावी आणि थोडीशी चाचपणी करावी आणि मगच खरेदी करावी असा अनुभवी लोकांचा सिद्धांत आहे. परंतु मी मात्र मोजक्या कोळिणींकडुनच मासे विकत घेणे पसंत करतो. यामध्ये loyalty या प्रकाराचा काही प्रभाव पडत असावा असा माझा अंधविश्वास आहे. 

वसईच्या होळी बाजारात मासे विकत घेणे आणि बोरिवलीला मासे विकत घेणे यामध्ये बराच फरक आहे. बोरिवलीला लोक फारशी घासाघीस करीत नाहीत. कोळिणींचा धाक असावा ! होळीबाजारात कोळिणीने सांगितलेल्या किमतीच्या बरोबर अर्ध्या किमतीवर आपण घासाघीस सुरू करावी असा सर्वसाधारण सिद्धांत आहे.  त्यावेळी कोळीण जे काय म्हणेल त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रगल्भता निर्माण होण्यासाठी काही महिने अथवा वर्षे  यांची तपस्या आवश्यक आहे. थोड्या वेळाने दोन्ही पक्ष काही बोलत नाहीत हे पाहून एक पक्ष नमते घेतो आणि मग खऱ्या बोलाचालीला सुरुवात होते. साधारणतः सुरुवातीच्या सांगितलेल्या किंमतीच्या ६५% च्या आसपास आपल्याला जर मासे खरेदी करता आले तर आनंद मानावा.  बाजारात आपल्या काही परिचयाची माणसे आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि आपण खरेदी केलेल्या माशांनंतर ते आपल्याला किंवा कोळीणीला कितीला मासे घेतले हा प्रश्न विचारतात. हा फार मोठा अवघड प्रसंग असतो. पुरुष मंडळी उगाचच माशांचे भाव वाढवुन ठेवतात असा सर्वसाधारण समज असतो. 

होळीबाजारात अजून एक प्रकार पहावयास मिळतो. जर मासा मोठा असेल आणि एका माणसाला त्याचे प्रमाण जास्त होणार असेल तर दोघं मिळून मासा विकत घेण्याची पद्धती आहे.  ह्यात  दोघांचा एकमेकांवर आणि कोळीणीवर विश्वास असतो असणे आवश्यक आहे. ग्राहकाने किमतीविषयी जास्त कटकट केल्यास आधी मासे खा मग पैसे दे हा कोळिणींचा आवडता डायलॉग आहे. 

आता वळूयात या पोस्टच्या चित्राविषयी! या चित्रात दाखवलेली कोळीण आमच्या घरी मागील रविवारी मासेविक्रीसाठी आली होती.  "मावरं" या टिपिकल हेल काढलेल्या तिच्या हाकेनं गल्लीतील इच्छुक लोक आपसूक घराबाहेर आले. तिनं "catch of the day" असलेल्या ६ पापलेटची किंमत पाच हजारापासून सुरु केली. वर उल्लेखलेल्या तत्त्वाचा वापर करून आणि त्यात अजूनही थोडी घट करून आम्ही दोन हजार रुपयापासून माशाच्या किमतीच्या सौद्यास प्रारंभ केला. तिने २००० रुपये किंमत ऐकल्यावर आम्हाला एक लुक दिला.  त्यानंतर मी तिला फोटोसाठी खास मुद्रा देण्याची विनंती केली आणि तिने ती लगेच मान्य सुद्धा केली. 

आमच्या घरातील बरीच तज्ज्ञ मंडळी गोळा झाली होती. २००० किंमतीवर एकमत होणे शक्य नाही हे समजल्यावर तिला दुसरी कोणती किंमत ऑफर करावी याविषयी आमचं एकमत होत नव्हते. काहीजण २२०० म्हणत होते तर काहीजण अडीच हजार! शेवटी वैतागुन माझ्या उद्योगाला लागलो.  शेवटी अर्ध्या तासानंतर हा सौदा २७०० रुपये किंमतीला पार पडला. 

आता परत वळूयात वसईतील माशांच्या प्रकाराकडे! पापलेट हा महागडा प्रकार असला तरीच चवीच्या दृष्टीने माझा विशेष आवडत नाही. काहीशी कंटाळवाणी / बोरिंग अशी त्याची चव असते. 

त्यानंतर क्रमांक होतो रावस आणि सुरमई यांचा! हे दोन मासे हल्ली किंमतीच्या बाबतीत पापलेटची स्पर्धा करू लागले आहेत. त्यानंतर एक प्रकार आहे तो म्हणजे काळा सरंगा याला स्थानिक भाषेत हलवा असेसुध्दा म्हणतात.  खाऱ्याचे अनेक प्रकार असतात. त्यात घोळीचं खारं हा लोकप्रिय प्रकार आहे. याची किंमतसुद्धा अव्वाच्या सव्वा बनू शकते.  यामध्ये काट्याचं म्हणून एक प्रकार असतो. 

त्यानंतर आहेत  बोंबील मांदेली हा प्रकार ! हे मासे किंमतीच्या दृष्टीने तसे परवडणारे असतात! बोरिवलीत  शंभर रुपयाला 5 बोंबील देऊन तुम्हाला अक्षरशः लुबाडलं जाते. परंतु वसईत जर तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हांला हे चांगले स्वस्त मिळू शकतात.  कोलंबी हा एक एव्हरग्रीन प्रकार आहे. कोळिंबीचे आमटे करुन  खावे किंवा कांदा फ्राय करावा! ती कशीही केली तरी चविष्टच लागते! कोळिंबीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत.  खाडीची कोळिंबीचे आणि बाकी इतर! कोळिंबीच्या छोट्या प्रकाराला करंदी असे म्हणतात. करंदी साफ करणे म्हणजे डोकेफोड असते त्यामुळे ज्या कोळीणी करंदी साफ करून देतात. त्या खास लोकप्रिय असतात बाकी मग स्पेशलिटी प्रकारांमध्ये काले (clams) या प्रकाराचा समावेश होतो.  हे  फक्त जानेवारी महिन्याच्या कालावधीत आणि आसपास उपलब्ध होतात. 

अजुन उल्लेखनीय मासे म्हणजे खाटखूट, काटे वगैरे ! पुर्वी काट्याचे मासे घरी बऱ्याच वेळा आणले जायचे आणि त्यावेळी काटे बाजुला काढून मासे खाताना बराच वेळ लागायचा. एक - दीड तास वगैरे पण चव मात्र अप्रतिम असायची !

बोय नावाचा माशांचा प्रकार सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हे विकत घेण्याआधी विशेष काळजी घ्यावी लागते. जिथं बोय मासे आढळतात तिथं काही वेळा रॉकेलचा फवारा मारुन त्यांना बेशुद्ध केलं जातं असं मी ऐकलं आहे. त्यामुळं हे विकत घेण्याआधी जाणकार मंडळी त्यांना हुंगून पाहतात. असले प्रकार मला झेपत नसल्यानं मी बोय विकतच घ्यायला जात नाही. 

बांगडा हा मासा सुद्धा खवय्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण बहुदा तो पचायला जड असावा. दिलीप वेंगसरकर १९८७ रिलायन्स विश्वचषकाच्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी बांगडे खाऊन आजारी झाल्यानं आपण सामना हरलो. आणि त्यामुळं सुद्धा मी बांगडे खात नाही. 

मासे खरेदीच्या वेळी त्यांचे कल्ले तपासुन पाहायची पद्धत आहे. ते दाबुन त्यातून पांढरं पाणी निघालं तर मासा ताजा असं काही लोक म्हणतात. परंतु हा ही प्रकार करुन दाखवायला कोळीणीला सांगायचं धारिष्ट्य माझ्यात नसल्यानं मी गप्प बसतो. आणि घरी आल्यावर कधी कधी माझी हजेरी घेतली जाते. पुरुष मंडळी जास्त पैसे देऊन मासे विकत घेण्यामागे कोळिणींचा विश्वास संपादन करुन त्यांनी आपली फसवणूक करु नये हे एक कारण असावं. 

मे महिन्यात वसईतील बावखल, विहिरी आटल्या की त्यातील सिलोनी वगैरे मासे उपलब्ध होतात. पूर्वी कलकत्ता, चिवडा वगैरे मासे सुद्धा आमच्या बावखलात मिळत ! चिंबोरीचा उल्लेख केल्याशिवाय मस्त्यगाथा पुर्ण होणार नाही ! बावखलात उन्हाळ्यात चिंबोऱ्या काठाला आल्या की पकडायला सोप्या जात. 

तरीही मी पडलो प्राथमिक पातळीवरील मासे खाणारा आणि त्यामुळं अनेक माश्याचे प्रकार इथं उल्लेखाशिवाय राहून गेले असणार! त्याबद्दल त्या माश्यांची आणि रसिकांची माफी मागतो !

काही प्रसंगी घरी मासे घेऊन येणाऱ्या कोळीणी अत्यंत मोक्याच्या क्षणी येतात. जुलै महिन्यात धुवांधार पाऊस पडत आहे, अंगणात सर्वत्र पाणी साचलं आहे, आणि बाजारात जाऊन मासे आणण्याचा आदेश मिळाला आहे! अशा वेळी ही कोळीण ताजे बोंबील आणि सोबत कोळंबी घेऊन अंगणात येते ! मासे विकत घेऊन साफ करुन भांड्यात पडतात आणि मग घरभर पसरतो तो कालवणाचा आणि तळलेल्या बोंबलाचा घमघमाट ! रविवारच्या लोकसत्तेचा अग्रलेख डोळ्यात भरतो पण डोक्यात शिरत नाही! सुख वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावं ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...