मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० जानेवारी, २०१८

Critique


जगात असंख्य संकल्पना, विविध घटनांची शक्यता नेहमीच अस्तित्वात राहिल्या आहेत. ह्या सर्वांचं भान असणं आणि त्या प्रत्यक्षात अनुभवणं ह्या दोन भिन्न घटना आहेत. माणसांना आयुष्यात ह्या भोवताली अदृश्य स्वरुपात वावरणाऱ्या संकल्पनांना कधीतरी सामोरं जावं लागतं. 

वाढत्या वयानुसार माणसांची काही बाबतीतली क्षमता वाढीस लागते. स्वतःकडे विरक्तपणे पाहण्याची क्षमता ही अशीच एक बाब आहे. ही संकल्पना माणसाच्या भोवताली त्याच्या / तिच्या जन्मापासुन सदैव अस्तित्वात असते, वावरत असते. पण सुरुवातीच्या वर्षांत ह्या संकल्पनेचं माणसाला भान अजिबात नसतं आणि ते नसणं हेच माणसांसाठी उत्तम असतं. पण मग एक क्षण असा येतो की आपल्या शरीराच्या बाहेर पाच - सहा फुट उंचावर (उंचीचं हे माप निव्वळ अंदाजानं !!) जाऊन स्वतःकडे पाहण्याची क्षमता आपल्याला अचानक लाभते किंबहुना अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे ह्याची जाणीव होते. 

मग काही मजेशीर गोष्टी घडतात. आपण कोणाशी तरी जोरदार भांडतो आणि मग थोडा वेळानं हा पाच फुटावर वावरणारा मिनी आदित्य आपल्याला सांगतो, "अरे भल्या माणसा! इथं तुझं चुकलं बरं का !" हा क्षण महत्वाचा असतो. सर्वप्रथम आपलं काही चुकलंय हे आपलं आपल्याला जाणवणं ही काहीशी अस्वस्थ करणारी भावना असते. ती अगदी वेगानं झटकुन टाकावी असाच आपला 'by default' प्रयत्न राहतो. पण आपणसुद्धा चुकू शकतो ह्या जाणिवेशी मैत्री करायला आपण एकदा का शिकलो की मग मात्र आपल्या मनातील अस्वस्थता कमी होते आणि मग आपण काहीसा वास्तववादी विचार करु शकतो. अजुन एक प्रसंग म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात किंवा सोशल मीडियात आपल्यावर कोणीतरी टीका करतं तेव्हा त्याच्याकडं विरक्तपणे पाहण्याची क्षमता सुद्धा ह्या वरील गुणाचाच भाग आहे. 

व्यावसायिक जगातील चर्चेत आपल्याला ज्या विषयात अगदी १००% टक्के खात्री नाही आणि जिथं आपण काही ठोकताळे बांधुन आपले विचार एखाद्या बैठकीत मांडत असतो अशा वेळी 'keep me honest here' असं म्हणण्याची पद्धत असते. मुख्यतः माझ्याकडं संपुर्ण माहिती नाही, त्यामुळं मी इथं चुकू शकतो आणि तुम्ही तज्ञ मंडळींनी मी ज्या पद्धतीने विचार करतोय ते बरोबर आहे का ह्यावर खास लक्ष ठेवा अशी विनंती असते. कोणी वरील वाक्य म्हणाला की मग सर्वजण अगदी ध्यानपुर्वक लक्ष देऊन ऐकतात. 

पुर्वी लोक म्हणायचे, "निंदकाचे  घर असावे शेजारी!" कारण शेजाऱ्याला आपलं चालणंबोलणं कुंपणापलिकडून बारकाईनं दिसायचं. आणि त्यामुळं आपण कुठं चुकतोय का हे शोधण्यासाठी त्याच्यासारखा योग्य माणुस नसावा. हल्ली आपण आपल्या शेजाऱ्याला महिन्यातुन एखादं वेळा सामोरे जातो आणि त्यामुळं तुम्ही हॅलो कसे करता,मनापासुन करता की नाही ह्यावरुन तो टीका करण्याची शक्यता कमीच ! म्हणूनच स्वतःच ही भुमिका बजावणे आवश्यक ठरतं. 

स्वतःचे स्वतः परीक्षण करण्याची सवय चांगली असली तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक ज्याप्रमाणं वाईट असतो तसंच स्वपरीक्षणाचा अतिरेक सुद्धा वाईट ठरु शकतो. काही समुह, काही देश ह्यांच्यामध्ये ह्या स्वपरीक्षणाचा अतिरेक दिसुन येतो. स्वपरीक्षण ह्या संज्ञेचा शोध घेता घेता Self-deprecation पर्यंत पोहोचलो. आणि मग wikipedia वर खालील संदर्भ आढळला.  

Self-deprecation is often perceived as being a characteristic of certain nations, such as in the United Kingdom, Ireland, Australia and New Zealand, where "blowing one's own trumpet" is frowned upon. 
ह्याउलट एक राष्ट्र म्हणुन आपली बऱ्याच वेळा blowing one's own trumpet च्या दिशेनं वाटचाल चालु आहे की काय अशी भिती वाटते. 


मागच्या पोस्टमध्ये सारांश तर दिला नाहीच ह्यावर सारांश देणं अथवा न देणं हे सर्वस्वी माझ्या मर्जीवर अवलंबुन आहे असं विधान मी केलं होतं. महर्षींनी ह्या विधानावर आणि मुख्यत्वे माझ्या ऍटिट्यूडवर सोशल मीडियातून कडाडुन टीका केली त्यामुळं ह्यावेळी सारांश देणं हे माझ्या भल्यासाठी अत्यावश्यक आहे.  

सारांश - स्वस्तुती आणि स्वनिंदा ह्या दोन सीमांमध्ये कोठंतरी मनुष्याचं वागणं, विचारपद्धती  बसते. ह्याची रेखा अगदी मध्यावर केव्हाच नसते आणि नसावी. पण त्या रेषेचं कोणत्याही एका सीमेकडं झुकणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी ह्या रेषेला अगदी डांबरी रस्त्यावरील रेषेप्रमाणं पक्की न ठेवता धुळीत स्वहस्ते आखलेल्या रेषेप्रमाणं flexible ठेवणं हेच योग्य ! आणि हे रेख आखणाऱ्या दोरीच्या एका टोकाला आपण स्वतः आणि दुसऱ्या टोकाला आपली जवळची माणसं असणं केव्हाही इष्टच !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...