Wednesday, January 10, 2018

Cricket ऊहापोह - Men Vs Boys


(Disclaimer - व्यक्ती खऱ्याखुऱ्या, प्रसंग काल्पनिक)

स्थळ - केप टाऊन, भारतीय हॉटेल, रवी शास्त्री ह्यांची रुम 
वेळ - ८ जानेवारी सायंकाळ 
Attendee - रवी शास्त्री, विराट कोहली (१:१)

शास्त्री - "विराट ये बस!"
विराट - (चेहऱ्यावर भन्नाट भाव) "हं"
शास्त्री - "आज इथं ABCD नको!"
विराट - (चेहऱ्यावर कसनुसं हसु आणत) "ठीक आहे !"
शास्त्री - "विराट, सुरुवात सकारात्मक गोष्टींपासुन करुयात! तुझ्या दृष्टीनं गेल्या चार दिवसातील चांगल्या घटना कोणत्या?"
विराट - (तोंडावर येणारं ABCD महत्प्रयासानं रोखुन) "हरले म्हणजे हरले, त्यात सकारात्मक काय पाहायचं !" 
शास्त्री - "विराटा, क्रिकेट एक गोष्ट, पण आता तु संसारात सुद्धा पडलायस, तर तुला सर्वत्र सकारात्मक गोष्टींचा शोध घेता आला पाहिजे !"
विराट - "व्हॉट डू यु मीन बाय संसारात सुद्धा पडलायस?"
शास्त्री - चेहऱ्यावर गंभीर भाव त्याला एक लुक देतो. 
विराट - "ओके, लेट मी ट्राय !"
१) गोलंदाजी - दक्षिण आफ्रिकेसारख्या बलवान फलंदाजी असलेल्या संघास त्यांच्या देशात १३० धावांमध्ये आपण बाद करु शकलो! 
२) हार्दिक पंड्या - ज्यावेळी तुमच्या समोर चार अतिजलद गोलंदाज १४०+ किमीहुन अधिक वेगानं एकामागुन एक येत असतात त्यावेळी केवळ बचाव हे तुमचं खेळपट्टीवर टिकुन राहण्याचं तंत्र असु शकत नाही, हे पंड्याने दाखवुन दिलं. तुम्हांला UNORTHODOX फटके मारुन त्यांची लय बिघडवता आली पाहिजे. ज्यावेळी पंड्या खेळत होता तेव्हा नक्कीच दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचे खांदे खाली पडले होते, देहबोली निराशेकडे झुकली होती, त्यांनी झेल, यष्टिचित संधी देखील दवडल्या. आपण सुद्धा त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला लावू शकतो हे पंड्याने दाखवुन दिलं !"
शास्त्री - "Excellent! विश्लेषण करण्याची तुझी क्षमता माझ्यासोबत राहुन सुधारली आहे !" आता सुधारण्याच्या संधी असलेल्या गोष्टी!"
विराट - "खरंतर मी अजुनही माझ्या मनात खुपच सकारात्मक भावना आहेत! पहिल्या कसोटीत ज्या गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत त्या न घडण्याची शक्यता सांख्यिकीशास्त्राचा अभ्यास करता बऱ्याच प्रमाणात होती !"
शास्त्री - "व्यवस्थापकीय बोल बोलण्याचा अधिकार मी माझ्याकडं राखु इच्छित आहे"
विराट - "ठीक आहे ! विजय, धवन आणि रोहित ह्या तिघांना दुसऱ्या डावात "Innings of a lifetime" खेळायची संधी मिळाली होती, ती त्यांनी दवडली. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं, तर स्टिव्ह स्मिथ ज्या प्रकारे इंग्लंडशी खेळला तसं मी खेळायला हवं होतं ! पुजाराचं सातत्य इथं पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी उपहारानंतर पहिल्याच चेंडूवर त्याची एकाग्रता भंगली ही खेदाची बाब आहे !"
शास्त्री - "ओके, माय टर्न नाऊ !"

सकारात्मक 
१) भारतीय खेळपट्ट्यांवर श्रीलंकेसारख्या संघाशी सतत खेळुन मग दक्षिण आफ्रिकेत जायचं आणि एकही सराव सामन्याशिवाय थेट त्यांच्या चौकडीला सामोरे जायचं ही नक्कीच कठीण गोष्ट होती. १९९६ साली भारतीय संघात रथी महारथी होते तरीही दरबान येथील पहिल्याच कसोटीत भारताने सपाटून मार खाल्ला होता. केवळ १०० आणि ६६ धावा बनविता आल्या होत्या. 
http://www.espncricinfo.com/series/16126/scorecard/63736/south-africa-vs-india-1st-test-india-tour-of-south-africa-1996-97/

म्हणजे इथं आपल्या गोलंदाजांनी त्यांच्या नजरेला नजर देत जबरदस्त कामगिरी केली. भुवनेश, बुमराह, पंड्या आणि शमी - खरोखर चांगली कामगिरी केलीत तुम्ही !

२) आपली लढवय्यी वृत्ती - तु म्हणालास त्या प्रमाणे पंड्याने एका क्षणी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवलं होतं. 

नकारात्मक 
१) आपल्याला दक्षिण आफ्रिकेचा कमकुवत क्षण पकडता आला नाही. 
२) दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात हरवायचे असेल तर गोलंदाज आणि फलंदाज ह्यांना एकाच वेळी क्लीक व्हावं लागेल. आमला, डी पलुसी आणि डी विलिअर्स हे तीन महान फलंदाज पुन्हा इतक्या स्वस्तात बाद होणे शक्य नाही. 

आता वेळ कमी आहे. तेव्हा 

सारांश 
भारतीय संघ क्रिकेट सतत खेळत राहतो. आणि IPL , भारतात खेळलं जाणारं क्रिकेट ह्यांनी असंख्य तथाकथित महान खेळाडु बनविले आहेत. पण लक्षात ठेव, १९७१ साली वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज आणि नंतर इंग्लंड मध्ये मिळविलेला कसोटी विजय, १९८३/८५ एक दिवसीय मालिका विजय, १९८६ इंग्लंड मधील कसोटी विजय आणि २००४ साली पाकिस्तानात मिळविलेला विजय हे विजय खऱ्या क्रिकेट रसिकांच्या कायमचे हृदयात घर करुन राहणार ! इथं आपल्याला काथ्याकुट करायला वेळ नाही. स्टेन जायबंदी झाला अजुन कोणी एक येईल, चारजण सातत्यानं १४० किमीहून अधिक वेगानं आग ओकत राहणार! चेंडू स्विंग होणार, अधून मधून  पाऊस पडणार. ह्या सर्व गोष्टीचा मुकाबला करत तु, पुजारा किंवा रोहित ह्यापैकी एकाला Innings of a lifetime खेळावी लागणार. तुमच्यापैकी कोणी एक सातत्यानं खेळला आणि दीडशे पेक्षा अधिक धावा काढत राहिला तरच आपल्याला जिंकण्याची संधी आहे. आणि अशी खेळीच will separate men from boys. 

तु ह्या दशकातील खेळाडू नक्कीच आहेस पण तू शतकातील खेळाडू बनु शकशील हा ह्याचा निर्णय घेणाऱ्या मोजक्या मालिका असतील आणि त्यातील ही एक आहे ! जमलं तर बघ नाहीतर लोकांची स्मरणशक्ती फार तोकडी असते आणि IPL चालु झालं की बहुतेक जण हे सारं काही विसरुन जातील. 

विराट स्तब्ध होऊन बसुन राहतो !!! 

No comments:

Post a Comment

Right To ... दुसरी बाजू

या विषयावरील मागील आठवड्यात व्हॉट्सऍपवर आलेली पोस्ट वाचली. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी आपली अनुपलब्धता घोषित ...