मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

२०१७ मनन




आठवडाभरची ख्रिसमस सुट्टी बघताबघता संपली. सोहम न राहवून म्हणाला, "बाबा सुट्टी किती लगेच संपली ना?" 

फंडे द्यायच्या मुडमध्ये असल्याने मी त्याला म्हणालो, "सुट्टीचे काय घेऊन बसला आहेस, आयुष्यसुद्धा असं झरझर डोळ्यासमोरुन निघून चाललं आहे!"
माझा मुड पाहून सोहम स्थितप्रज्ञ मोडमध्ये गेला. म्हणजे पाहिजे तितके बोला, मी ऐकून घेतो.
मग मी त्याला म्हणालो, " अगदी आता आतापर्यंत शाळेत होतो असं वाटतं, काळ झपाट्याने पुढे सरकतो. " बाकीचं त्याला नाही बोललो. 
पण वाटुन गेलं, बरेचजण भुतकाळात जमेल तितके अडकून बसलेले असतात, वर्तमानकाळातील आवश्यक व्यवहार आटोपून तत्परतेने भुतकाळाकडे  मनानं धाव घेतात.

भुतकाळात वावरण्याची मानसिकता चुक की बरोबर ह्यावर भाष्य करणं योग्य नव्हे असं हल्ली मला वाटु लागलंय.    एकंदरीतच ज्या आत्मविश्वासानं जुनी मंडळी एखादी गोष्ट बरोबर हे सांगायची तो आत्मविश्वासच नाहीसा होऊ लागला आहे. म्हणजे योग्य आत्मविश्वास असणारी मंडळी नाहीत असं नाही पण ते आपलं ज्ञान उगाचच नको त्या माणसांसमोर ( इथं नको त्या म्हणजे ज्यांना आपल्या ज्ञानाची कदर नाही हा अभिप्रेत आहे) व्यक्त करण्याचे टाळतात.

सार्वजनिक क्षेत्रातील योग्य व्यक्तीचं अधिकारीपदावरील झपाट्याने कमी होणारे प्रमाण ही आपल्या समाजाची खंत आहे.  आणि ज्या व्यक्ती राजकीय अथवा प्रशासकीय क्षेत्रात अधिकारपदावर आहेत त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता इतर सर्वांना आपल्या पदाची जबरदस्त घमेंड आहे, व्यासपीठाचा मोह आहे.

जी गोष्ट दिवाळीत जाणवली ती आता ख्रिसमसमध्ये सुद्धा जाणवली. पुर्वी समाजात असणारी स्नेहभावना झपाट्याने लोप पावत चालली आहे किंवा माझा असा समज होऊ लागला आहे. आपलं काही बरं वाईट झालं तर समाज आपल्यामागे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देईल असा विश्वास काही प्रमाणात असायचा हल्ली तो कमी प्रमाणात दिसतो, कारण एक कुटुंब योग्य प्रमाणात चालविण्यासाठी हल्ली प्रचंड प्रमाणात मेहनत, आर्थिक शक्ती आवश्यक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला वेळ आली तर ज्या प्रमाणे दुसऱ्याचा भार वाहता येणार नाही त्याप्रमाणे दुसऱ्यांकडून सुद्धा ही अपेक्षा बाळगणे रास्त ठरणार नाही हे प्रत्येकजण जाणून असतो. ह्यामुळं झालंय काय तर असुरक्षिततेच्या भावनेने सर्वांना ग्रासले आहे. ह्या असुरक्षिततेच्या भावनेवर उपाय म्हणून सर्वजण प्रचंड प्रमाणात पैसा, मालमत्ता गोळा करण्याच्या मागं लागले आहेत.
आपल्या समाजाला जितका काळ भूतकाळात रममाण व्हायला आवडतं तितकाच काळ किंवा तुलनेने समप्रमाणात जर आपण समाजाच्या भविष्यातील जडणघडणीविषयी विचार करण्यात घालवला तर योग्य ठरेल. आर्थिक संपन्नतेकडील समाजाची वाटचाल बर्याच वेळा समाजाचं कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ बिघडवून टाकते हे आपण पाहिले आहे. आपल्या समाजाची वाटचालसुद्धा बहुदा त्या दिशेने चालली असावी असं वाटते. ती जर का आपल्या वैयक्तिक प्रभावक्षेत्रापुरती थांबवायची झाली तर प्रत्येक जण प्रयत्न करु शकतो का हे प्रत्येकाने ठरवायला हवं. हल्ली बर्याच वेळा ऐकायला मिळतं त्याप्रमाणे समाधान हरवलंय आणि आपण सारे long weekend मध्ये, परदेशी सहलींमध्ये ह्या समाधानाचा शोध घेतोय. पण ते तिथं मनापासून सापडत नाही आणि भविष्यात हे समाधान म्हणून जे काही आहे ते सापडण्याची शाश्वती कोणालाही नाही आणि हीच सर्वांची न बोलुन दाखवली जाणारी खंत आहे.

२०१७ मधील ही शेवटची पोस्ट. गंभीर विषयावरील पोस्ट लोकांना जास्त वाचायला आवडत नाहीत हे निरीक्षण ह्या वर्षात सुद्धा कायम राहिले. २०१८ साल काही बदल घेऊन येईल अशी आशा करून तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत ही पोस्ट संपवतोय.

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...