मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ५ जून, २०१६

इंटरनेट ऑफ द .. - भाग १



नारद मुनी नेहमीप्रमाणे स्वर्गात प्रवेश करते झाले. "नारायण नारायण" म्हणतच त्यांनी विष्णुदेवांना प्रमाण केला. विष्णुंनी त्यांचा प्रणाम स्वीकारला खरा पण भगवान विष्णुंची चिंतातुर मुद्रा नारदमुनींच्या नजरेतुन सुटली नाही. 

"प्रभो आपण अगदी चिंतीत दिसत आहात! स्वर्गलोकी सर्व काही ठीक तर आहे ना?" नारदांनी विष्णुंना प्रश्न केला. 

"नारदा स्वर्गलोकी तर सर्व काही ठीक आहे! पण भुतलावर जो काही प्रकार चालला आहे तो माझ्याच्याने पाहिला जात नाही!" विष्णु आपली चिंतित मुद्रा कायम ठेवत म्हणाले. 

"प्रभो, सध्याच्या कलियुगात पृथ्वीवर अनेक अनिष्ट गोष्टींचे पेव फुटलं आहे. त्यातील कोणती आपणास ह्या क्षणी खटकत आहे ते जाणुन घेण्याची माझ्या मनी इच्छा निर्माण झाली आहे!" नारद म्हणाले. 

"महाराष्ट्रदेशी मराठी सिनेमा गेले काही वर्षे ऊर्जितावस्थेत आला असताना उपग्रहवाहिनीसारखं प्रभावी माध्यम सुद्धा मराठी निर्मात्यांच्या हाती गवसलं ह्याचा कोण आनंद मला झाला होता!" विष्णु म्हणाले. 

"होता म्हणजे काय प्रभो! ह्या क्षणी सुद्धा माझा हा आनंद कायम आहे! "सौभाग्यवती", "का हे दिया परदेस" ह्या सारख्या मनोरंजक मालिकांचा एकही भाग चुकवू नये .. " विष्णुंची क्रोधित मुद्रा ध्यानात घेत नारदांनी आपलं बोलणं  आवरतं घेतलं. 

"अरे शिवबांचा हा महाराष्ट्र ! शिवबा घडले ते जिजाऊमातेच्या संस्कारामुळे! आणि त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली, उर्जितावस्था प्राप्त करुन दिली! आणि आजच्या मराठी माता, आज्या आहेत कोठे? ज्या आपल्या उद्योगधंद्यात मग्न आहेत त्या असोत की गृहिणीपद सांभाळणाऱ्या असोत, ह्यातील बऱ्याच स्त्रिया ह्या निरर्थक मराठी मालिकांच्या नादी लागुन आपला वेळ व्यर्थ घालवीत आहेत! आणि बाह्ययुगात ज्या काही बदल घडवुन आणणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर आपली ज्ञानपातळी कायम ठेवण्याची अमोल संधी वाया दवडित आहेत! " विष्णुंनी आपल्या मनात इतके दिवस साठवुन ठेवलेल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली. 

नारद कधी नव्हे ते अगदी गोंधळुन गेले. विष्णूंचा संताप कमी करावयाचा म्हटलं तर त्यांना ह्यावर काहीतरी उपाय सुचवायला हवा. परंतु ही समस्या पडली ती समस्त महाराष्ट्रदेशीय महिलांची! ह्यावर उपाय शोधायचा झालं तर प्रत्येक स्त्रीला जाऊन भेटणं आणि तिचं मतपरिवर्तन करायचं हा मार्ग आहे कि काय!

"नारदा, नारदा !" नारदांच्या चेहऱ्यावरील संभ्रम पाहुन विष्णु अधिकच संतप्त झाले. नारदाच्या मनात कोणता संभ्रम चालला आहे ह्याची थोडीफार कल्पना त्यांना आलीच होती. 

"अखिल महाराष्ट्रातील समस्त महिलावर्गाला तु भेट द्यावीस असे माझे म्हणणे नाही. ह्या सर्व महिलावर्गाला हा वेळ घालविणारा नाद लावणाऱ्या मराठी मालिकांच्या निर्मात्यांची तु भेट घ्यावीस आणि त्यांना योग्य प्रकारे समज द्यावीस अशी माझी इच्छा आहे!" विष्णूंचा क्रोध आता काहीसा निवळला होता. आपला एक संभ्रम दूर झाला म्हणुन नारदमुनींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसु लागली. 

"नारदा, तु निर्मात्यांना योग्य समज देशील ह्याविषयी माझ्या मनात यकिंचितही शंका नाही. पण त्यांना तु सध्याच्या काळास योग्य असा विषय सुचवावा असं माझं म्हणणं आहे. आणि असा विषय शोधुन काढण्यात तु सक्षम आहेस ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्रसुद्धा शंका नाही!" विष्णू काहीशा मिश्किल स्वरात म्हणाले. 

नारदमुनींच्या चेहऱ्यावर दिसु लागलेली प्रसन्नता एका क्षणात नाहीशी झाली! 

"प्रभो, प्रभो मला क्षमा करा!" माझ्या हातुन कोणता प्रमाद झाला असेल त्याचे थेट प्रायश्चित मला द्या! पण अशी ही अप्रत्यक्षपणे शिक्षा नको!" नारदमुनी विष्णूंचे पाय धरत म्हणाले. 

"नारदा, तु सद्यकाळाशी अद्ययावत राहिला असशील अशी माझी अपेक्षा होती आणि अजुनही आहे! असो - सध्या मी मानवाने नव्याने मांडलेल्या "इंटरनेट ऑफ द थिंग्स" ह्या संकल्पनेने पुरता भारावून गेलो आहे. मराठी निर्मात्यांनी ह्या नवीन काळाशी सुसंगत अशा विषयावर मालिका निर्माण करुन सद्यकालीन महाराष्ट्रदेशीय जिजाउंना प्रेरणेचा नवीन स्त्रोत दाखवुन द्यावा अशी माझी इच्छा आहे!" विष्णु आपली इच्छा व्यक्त करुन पुन्हा एकदा धारणेत मग्न झाले. 

निसंशयपणे आतापर्यंतची एक सर्वात कठीण अशी जबाबदारी अंगावर घेऊन नारद भुतलाच्या दिशेने कूच करते झाले! 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...