जानेवारी मध्ये अचानक वाचनात आलं. बहुदा तिसरा किंवा चौथा सोमवार होता तो! वर्षातील सर्वात कंटाळवाणा दिवस म्हणून जाणकार लोकांनी त्या दिवसाची निवड केली होती. त्यामागे अनेक कारणे दिली होती. बरीचशी मला पटली नाहीत. मग मी मला कंटाळा येणारे क्षण शोधावयास लागलो.
जानेवारी हा नक्कीच सर्वात कंटाळवाणा महिना! माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर अधिकच! डिसेंबर महिन्यात सर्व अमेरिकन सहकारी, बॉस वगैरे सुट्टीवर असतात म्हणून कार्यालयात खूप मोकळे (कमी तणावाचे) वातावरण असते. वर्षभर राखून ठेवलेल्या बऱ्याच सुट्ट्या वापरायची संधी मिळते. मुलांच्या शाळेत सुद्धा परीक्षेचा मारा कमी असल्याने त्या पातळीवर सुद्धा मोकळेपणा मिळतो. वसईत क्रिसमसमध्ये धमाल करून झालेली असते. आणि मग अशा वातावरणातून जानेवारी उजाडतो. गेले दोन तीन वर्षे १ जानेवारीची सुट्टी आमच्याकडे बंद झाली आहे पण अमेरिकेच्या ऑफिसात सुरूच आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात चांगली होते. म्हणजे नवीन वर्षातील एक सुट्टी सुरुवातीलाच न गेल्याचे समाधान मिळते आणि अमेरिकेची मंडळी सुट्टीवर असल्याने मिटिंगचा तणाव नसतो.
पण त्या नंतर मात्र कठीण काळ उगवतो. सुट्टीवरून कामावर परतणाऱ्या माणसांचे दोन प्रकार असतात.
पहिल्या प्रकारातील माणसे आता सुट्टी घेतली त्यात ताजेतवाने होऊन मग नवीन जोमाने कामाला लागतात. नवीन वर्षाचे निर्धार, कामाच्या याद्या वगैरे बनवून बाकीच्यांना भंडावून सोडतात. ह्यात एक महत्वाचा मुद्दा असतो - उत्साहाच्या भरात आपल्याला वाटणारा कामाच्या प्राधान्याचा क्रम आपल्या बॉसच्या, संघटनेच्या प्राधान्यक्रमाशी मिळताजुळता आहे की नाही हे तपासून पाहणे फार महत्वाचे असते. नाहीतर प्रत्येक क्षणी कामात गर्क राहण्याच्या अट्टाहासापायी चुकीच्या दिशेने खूप पुढे जायला होते.
दुसऱ्या प्रकारातील माणसे जानेवारीत तापायला (म्हणजेच पूर्ण जोमाने कामाला लागायला किंवा झोन मध्ये यायला) जरा वेळ घेतात. ह्यातही उपप्रकार असतात. ह्यातील काहीजण चलाख असतात. जोवर योग्य दिशा मिळत नाही तोवर ते थंड घेतात. एकदा का योग्य दिशा मिळाली की मग अगदी झपाट्याने कामाला लागतात. अजून एक खोलवर मुद्दा. नेहमीच स्मार्ट बनून काम करणे शक्य नसते. स्मार्ट काम आणि यांत्रिक काम ह्याचे परिस्थितीनुसार योग्य मिश्रण जमायला हवं.
दुसरा प्रकार जन्मजात आळशी असतो. जितका वेळ चालढकल करता येईल तितका वेळ चालढकल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
ह्यात काही गोष्टी आपण करू शकतो. जसे की रविवारी झोपण्याआधी सोमवारची जमेल तितकी तयारी करणे, सोमवारी नेहमीच्या वेळेपेक्षा आधी ऑफिसात पोहोचून तिथल्या वातावरणाला सरावायचा प्रयत्न करणे. सोमवारी एखादी हलकीफुलकी (विषयावरील) बैठक ठेवणे वगैरे वगैरे!
इतकं करून सुद्धा बेभान मन एखाद्या गंभीर बैठकीच्या वेळी सुद्धा कुठंतरी भरकटत रहातं. चेहऱ्यावरील भाव आणि मनातील विचार ह्यांचा संबंध जोडला जाऊ नये म्हणून मग खूप प्रयत्न करावे लागतात!
बाकी मग मंगळवार संध्याकाळ वगैरे उजाडली की हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागतं. ह्यात दोन प्रकारे हातभार लागतो. दोन दिवस कार्यालयात काम करून मन ताळ्यावर आलं असतं आणि दुसरं म्हणजे शुक्रवार संध्याकाळ जवळ येत चालली असते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एक आनंदक्षण म्हणजे शुक्रवार संध्याकाळ! तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात, प्रोजेक्ट कितीही बिकट परिस्थितीत असले तरी माणसाने शुक्रवार संध्याकाळ आपल्याला हवी तशी अनुभवावी! त्या वेळेला मनात कामाचे कोणतेही विचार येऊ देऊ नयेत! तळीराम मंडळींनी ऐच्छिक ठिकाणे गाठावीत!
वर्षे भराभर निघून जातात. सोमवार ते शुक्रवार हा प्रवास कसा पटकन संपला हे जसं समजत नाही तसे जानेवारी ते डिसेंबर हा प्रवासही झटकन संपत जातो. वयाच्या / व्यावसायिक कारकीर्दीच्या दृष्टीने विचार केला तर आपण बुधवारपर्यंत पोहोचलो असतो. पण इथला शुक्रवार मात्र जमेल तितका पुढे ढकलावासा वाटतो!
आपण वयाने मोठे होत जातो, वाढलेल्या वयानुसार आणि कदाचित वाढलेल्या अनुभवामुळे आपण वरच्या पदावर जाण्याची शक्यता वाढीस लागते. अगदी उच्चपदस्थ लोकांनी उदात्त विधान करण्याची पद्धत असते. त्याचप्रमाणे थोडेसं वरती पोहोचलो की मग आपणसुद्धा अशी काही विधानं करू लागतो. पण एक सत्य मात्र कायम राहते. बालवाडीत आईने वर्गात सोडल्यावर डोळ्यात येणारे अश्रू जरी लपवता येत असले तरी नजर मात्र दरवाजाकडे लागून रहायची. तसंच अजूनही सोमवारी ऑफिसात कार्ड स्वाईप करताना सुद्धा भावना मात्र तीच असते!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा