मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन



ब्लॉगचे शीर्षक वाचून हे एखाद्या अतिजलद जहाजाने केलेल्या प्रवासाचे वर्णन असावे असा तुमचा समज झाल्यास त्यात काही चुकीचे नाही. परंतु तसली काही परिस्थिती नसून २००२ साली मी सपत्निक केलेल्या एका प्रदीर्घ विमानप्रवासाची ही हकीकत आहे. आणि हो,  हा नियोजित ५३ तासांचा प्रवास होता. ह्यात कोठेही विमान रद्द झाले नाही किंवा खोळंबले नाही किंवा आम्ही ते चुकविले नाही. बाकी म्हणावं तर विमानांचा वेगही २००२ साली अगदी कमी होता असेही नाही!
प्रस्तावना खूप झाली. झाले असे की माझी नेमणूक सर्वप्रथम फिनिक्स, अरिझोना इथे करण्यात आली होती. माझ्या तत्कालीन कंपनीच्या धोरणानुसार त्या कंपनीच्या भारतीय शाखेने आमचे मुंबई ते फिनिक्स असे दोन्ही मार्गांचे तिकीट घेतले. फिनिक्स हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळ असल्याने आम्ही मुंबईहून निघताना सिंगापूर - टोकियो - लॉस अंजेलीस - फिनिक्स असा प्रवास केला होता. त्या तिकीटावरील तारीख आणि वेळ ह्यांचा मेळ बसविताना नाकी नऊ आल्याने आम्ही शेवटी फिनिक्सला किती वाजता पोहोचणार ह्याचा फक्त विचार केला होता. हा प्रवास तसा व्यवस्थित झाला.
फिनिक्स मधील वास्तव्य तसे सुखदायक चालले होते. तेथील टीम अनुभवी आणि स्थिर अशी होती. त्यामुळे नवीन आज्ञावली विकसनाचे काम आणि प्रोडक्शन सपोर्ट (आग विझवण्याचे काम!) ह्यात काही चिंतेचे प्रसंग येत नसत. लग्नानंतर आमचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यामुळे अमेरिकेत अगदी शून्यातून घर वसवायची संधी मिळाल्याने आम्ही खुशीत होतो. परंतु म्हणतात ना कधी कधी सुखाला दृष्ट लागते. आमच्या बाबतीतही असेच झाले. तीन महिन्यानंतरच त्या प्रोजेक्टच्या संघरचनेत काहीसा बदल करण्याचे ठरविण्यात आले आणि भारतातील संघ मुंबईऐवजी चेन्नईला स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. ह्या सर्व बदलात माझी फिनिक्सची जागा धोक्यात आली. त्यामुळे माझ्यासाठी नवीन जागेचा शोध सुरु झाला आणि सुदैवाने माझी नेमणूक फ्लोरिडात करण्यात आली. कंपनीच्या धोरणानुसार फिनिक्स ते फ्लोरिडा हे तिकीट त्यांच्या अमेरिकन शाखेने बुक केले.
फ्लोरिडातील नेमणूक काही फारशी दीर्घ स्वरूपाची नव्हती. परंतु रखरखीत फिनिक्सपेक्षा काहीसे पावसाची कृपा असलेले हिरवेगार फ्लोरिडा बरे असा आम्ही समज करून घेतला. फ्लोरिडात नवीन कामाचे स्वरूप समजावून घेवून ते काम मुंबईहून करायचे होते. साधारणतः दोन महिन्यात ते काम आटोपण्याची चिन्हे दिसू लागली. फिनिक्स आणि फ्लोरिडातील वास्तव्यातील काही मनोरंजक कहाण्या नंतर कधीतरी!

आता परतीचे तिकीट आरक्षित करण्याची वेळ आली. आम्ही अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर होतो आणि तेथून मुंबई युरोपमार्गे २० तासावर होती. त्यामुळे आम्हाला तसेच तिकीट मिळेल असा सोयीस्कर समज आम्ही करून घेतला होता.
प्रथम मी कंपनीच्या भारतीय शाखेला फोन केला. "आपले परतीचे तिकीट फिनिक्सहून आरक्षित आहे, त्या विमानकंपनीला फोन करून आपण तारीख निश्चित करा" असे मला सौजन्यपूर्ण भाषेत समजाविण्यात आले. "परंतु मी सध्या फ्लोरिडात आहे", मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही तिथे कसे पोहोचलात?" काहीशा  आश्चर्यपूर्ण स्वरात समोरील ललना उद्गारली. "विमानाने!" असे उत्तर देण्याचा मोह मी अतिप्रयत्नपूर्व टाळला. तिला मी सर्व परिस्थिती थोडक्यात सांगितली. बहुधा तिला (अथवा तिच्या मेंदूला) हा सर्व प्रकार  झेपला नसावा. तिने मला सविस्तर ई -मेल लिहिण्यास सांगितले.
पुढील दोन दिवसात एकंदरीत प्रकार आमच्या ध्यानात आला होता. भारतीय शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या फक्त अमेरिकेतील अंतर्गत प्रवासाची जबाबदारी अमेरिकन शाखा करीत असे. भारत ते अमेरिका हा प्रवासटप्पा भारतीय शाखेच्या अखत्यारीत येत असे. आणि भारतीय शाखेने तर आमचे फिनिक्सहून तिकीट आरक्षित केले होते. हे तिकीट रद्द करून पूर्व किनारपट्टीवरून नव्याने तिकीट आरक्षित करण्यासाठी लाल फीत आणि रद्द करण्याचा खर्च मध्ये येत होते. तसे म्हटले तर हे दोन्ही अडथळे दूर करता येतात, पण त्यासाठी एकतर तुम्ही मोठ्या पदावर असायला हवे किंवा तितका समजूतदार व्यवस्थापक असावा लागतो. माझ्या बाबतीत हे दोन्ही प्रकार नव्हते त्यामुळे आमचा प्रवास मार्ग निश्चित झाला होता. त्यातही एक धमाल होती. फ्लोरिडा (फोर्ट लॉदरडेल) ते फिनिक्स ह्या प्रवासात सुद्धा आम्हाला टेक्सास असा थांबा सुचविण्यात आला होता. त्या अमेरिकन शाखेच्या तिकीट आरक्षित करणाऱ्या बाईस मी माझा एकंदरीत प्रवासमार्ग ऐकवला.   फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स - लॉस अंजेलीस - चायनीज तैपई - सिंगापोर - मुंबई, आणि ह्यात अजून एक थांबा न वाढविण्याची कळकळीची विनंती केली. बहुदा देवाने माझी प्रार्थना ऐकली असावी आणि मग तिने मला फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स असे थेट तिकीट देण्याचे कबूल केले. आता ह्यातील प्रवासाचा आणि थांब्यांचा कालावधी ऐका
फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स (प्रवास पाच तास, फिनिक्स थांबा सहा तास)
फिनिक्स - लॉस अंजेलीस (प्रवास दोन तास, लॉस अंजेलीस थांबा चार तास)
लॉस अंजेलीस - चायनीज  तैपई (प्रवास तेरा तास, चायनीज  तैपई थांबा चार तास)
चायनीज  तैपई - सिंगापूर  (प्रवास पाच तास, सिंगापूर  थांबा नऊ तास)
सिंगापूर- मुंबई (प्रवास ४ - ५ तास)
तसे पाहिले तर बाकीचे सर्व फिनिक्सवरून निघताना ४२ तासांचा प्रवास करीतच त्यात फक्त (!) अकरा तासांची भर पडली होती अशी माझी कंपनीतर्फे समजूत काढण्यात आली. आणि सिंगापूरला हॉटेल बुक करण्याचा सल्लाही देण्यात आला. "कंपनी हा हॉटेल खर्च देईल ना?" मी उगाचच विचारले! मग विषय बदलून मला ह्या नऊ तासात सिंगापूर दर्शन करण्याचा सल्ला देण्यात आला.
२२ ऑगस्ट २००२ रोजी अमेरिकन पूर्व किनारपट्टीच्या वेळेनुसार आम्ही सकाळी साडेसात वाजता आमचे हॉटेल सोडले. विमानतळावर सोडण्यासाठी एका भारतीय टक्सीवाल्याला आम्ही बोलावलं होत. तिकीट आरक्षित  करताना मी फ्लोरिडालाच आम्हाला मोठ्या सामानाच्या bags चेक  इन करता येईल ह्याची खात्री करून घेतली होती. परंतु प्रत्यक्ष विमानतळावरील चेकइन कक्षात मला दुसरीच माहिती मिळाली. तुम्हाला ह्या bags फिनिक्सला ताब्यात घेवून परत चेकइन कराव्या लागतील असे सांगण्यात आले. सहसा डोक्यात राख न घालून घेणारा अशी माझी स्वतःविषयी समजूत आहे. परंतु एकंदरीत ह्या प्रकाराने मी इतका संतापलो होतो की मी सभ्यपणा राखून जितका त्याच्याशी वाद घालता येईल तितका घातला. ह्यात माझ्या पत्नीने भरलेल्या वजनदार bagsचा विचार किती कारणीभूत होता हे माहित नाही! इतके होऊन सुद्धा त्या सभ्य गृहस्थाने मला असा मार्ग शोधून देणारा माझा ट्रेव्हल अजेंट बदलायचा सल्ला दिला. माझ्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या त्या सभ्य गृहस्थाला उत्तर देण्याचे मी कसोशीने टाळले.
अमेरिकेतील अंतर्गत प्रवासात खाण्यापिण्याची मारामार असते. त्यामुळे त्या विमानकंपनीने आम्हाला विमानात शिरण्याआधी काही अल्पोपहाराचे पदार्थ घेण्याचे सुचविले. परंतु आम्ही विमानात मिळणाऱ्या शेंगदाणे आणि कोकवर गुजराण करण्याचे ठरविले. बाकी विमानाने उड्डाण करण्याआधी मी प्राजक्ताला म्हणालो, "लग्नाच्या पहिल्या वर्षातच तुला पूर्ण अमेरिका पूर्व-पश्चिम अशी दाखवत आहे हो, नीट पाहून घे!" आणि तिच्या नजरेच्या तीक्ष्ण प्रतिसादाकडे पाहण्याची हिम्मत नसल्याने मी दुसरीकडे नजर वळविली. बाकी हा प्रवास ठीक चालला होता. वैमानिक अधून मधून खालून दिसणाऱ्या भूभागाविषयी बोलत होते. समोरील स्क्रीनवर हाणामारीचा एक चित्रपट चालला होता. फिनिक्सचा खरा पाच तासांचा प्रवास ह्या पट्ठ्याने लवकर संपवित आणला. फिनिक्सच्या आसपास अधूनमधून वणवे लागतात. असाच एक वणवा त्यावेळी लागला होता. वैमानिकाने त्याविषयी माहिती दिली. अशा वेळी साधारणतः अतिशोयक्ती अलंकार वापरले जातात त्यामुळे वैमानिकाच्या म्हणण्यानुसार हा गेल्या वीस वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा होता. जोपर्यंत हा विमानापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा का नसेना असा स्वार्थी विचार आम्ही केला. फिनिक्सचे स्काय हार्बर दिसू लागले होते. माणसाचे मन कसं असतं पहा ना, फिनिक्स मध्ये आम्ही तर काही महिनेच घालविले होते परंतु तिथे पुन्हा उतरताना आपल्याच गावी उतरण्याची भावना आमच्या मनी दाटली होती. हे सर्व प्रवासवर्णन एका भागात संपवायचा विचार होता परंतु आता दुसरा भाग करावा लागेल असे दिसतंय! फिनिक्स ते मुंबई पुढच्या भागात!
अमेरिकेत गेलेल्या IT क्षेत्रातील तंत्रज्ञाच्या सुविद्य पत्नी बर्यापैकी चांगला कंपू बनवून असतात .  प्राजक्ताचा सुद्धा फिनिक्स मध्ये असा कंपू होता. फ्लोरिडात गेल्यावर सुद्धा ह्या कंपूतील बऱ्याचजणी तिच्या संपर्कात होत्या. परतीच्या मार्गावर प्राजक्ता फिनिक्सला उतरणार हे कळल्यावर त्यांना कोण आनंद झाला.  आपल्या पत्नींनी बनविलेल्या कंपूविषयी नवरेवर्गांच्या संमिश्र भावना असतात. ह्या कंपूमुळे सोमवार - शुक्रवार ह्या दिवसांत आपली पत्नी शांत असते त्यामुळे नवरे खुश असतात परंतु साप्ताहिक सुट्टीच्या वेळी ह्या कंपूमुळे नसते उद्योग त्यांच्या मागे लागतात, त्यामुळे नवरे बऱ्याच वेळा वैतागतात. परंतु हा वैताग बऱ्याच वेळा बोलून दाखवता  येत नाही. तसाच काहीसा प्रकार इथे झाला. प्राजक्ता आणि वर्गाने फिनिक्स विमानतळावर भेटण्याचा कार्यक्रम परस्पर ठरवला. ह्यात नवरे वर्गाला शुक्रवारी दुपारच्या वेळात कार्यालयातून सुट्टी घेवून विमानतळावर यायला जमेल असे गृहीतक होते. आणि ते गृहीतक दोन नवऱ्यांनी अचूक ठरविले.
फिनिक्स विमानतळावर आम्हाला आमच्या चेक इन सामानाचे दर्शन झाले. ते ताब्यात घेऊन उद्वाहकात टाकून एक मजला वर चढविले आणि पुन्हा चेक इन केले. आमचे विमान फिनिक्सला वेळेआधी पोहोचल्यामुळे लॉस अंजेलीसचे विमान सुटायला अजून ६ तास बाकी होते. त्यामुळे वेळेआधी सहा तास चेक इन करणाऱ्या माझ्याकडे त्या चेक इन कक्षातील इसमाने अजून एक नजर दिली. मला एकंदरीत ह्या प्रवासात अशा अनेक नजरांना सामोरे जावे लागेल ह्याचा एव्हाना मला अंदाज आलाच होता. त्यामुळे मी त्या नजरेकडे दुर्लक्ष गेले. एकंदरीत हे सामान माझ्याकडे दहा मिनिटे होते. हीच उठाठेव त्या दोन्ही स्वतःला सहभागी म्हणविणाऱ्या विमान कंपन्यांनी केली असती तर काय झाले असते असा विचार माझ्या मनात येऊन गेला. विमानतळावर भातजन्य काही आशियन भोजन पदार्थ उपलब्ध होते. त्यातील एकाची आम्ही निवड करून वेळ भागविली. एव्हाना आमच्या मित्रमंडळीचे आगमन झाले होते. आमच्यासाठी भेटवस्तू, काही चॉकोलेटस अशा वस्तू घेऊन ते आले होते. माझ्या दोन मित्रांनी सुद्धा अनपेक्षितरित्या विमानतळावर येऊन आम्हाला सुखद धक्का दिला. प्राजक्ताची एक मैत्रीण, रजिता तिच्यासाठी निवडुंगाचे  एक छोटे रोप घेऊन आली होती. फिनिक्समधील निवडुंगाची विविधता बघता ही एक योग्य भेट होती. पुढे हे रोप प्राजक्ताने वसईत बरेच दिवस टिकविले परंतु एका पावसात त्याला सुरक्षित वातावरणात घेऊन न जाता आल्याने ते बिचारे दगावले. आमच्याकडे भरपूर वेळ असला तरी मंडळी घाईत होती. त्यामुळे ४५ मिनिटांच्या आसपास त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. विमानतळावर खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरी आता अजून सामान कोंबायला वाव नसल्याने प्राजक्ताचा नाईलाज झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठीत किंबहुना प्रत्येक भाषेतील म्हणी अगदी समर्पक असतात. मनुष्यजातीच्या इतिहासात माणसे विविध प्रसंगात सापडली असतील तेव्हा त्यांना या म्हणी सुचल्या असतील. आपण ज्यावेळी तशाच प्रसंगात सापडतो तेव्हा आपल्याला ह्या म्हणी आठवतात. 'दुष्काळात तेरावा महिना' ही एक अशीच म्हण! सहा तासाचा थांबा काही कमी नव्हता म्हणून फ्लोरिडाहून विमान लवकर आले आणि आता लॉस अंजेलीसचे विमान काही वेळ उशिरा सुटणार असल्याची बातमी येऊन पोहोचली. अगदी काही निर्वाणा वगैरे परिस्थिती अजून आमची झाली नव्हती. त्यामुळे काही वेळ अजून घालविण्यात आम्ही यश मिळविले. शेवटी एकदाचे ते लॉस अंजेलीसला जाणारे विमान येऊन गेटवर लागले, आता आम्ही थोडे चिंतेत होतो. लॉस अंजेलीसवरून सुटणारे विमान चुकणार तर नाही ना ह्याची चिंता आम्हाला भेडसावू लागली होती. हा दोन तासाचा प्रवास तसा पटकन गेला. ह्यात लक्षात राहण्यासारखी एकच गोष्ट, आम्हाला दोघांना आजूबाजूच्या सीट्स मिळाल्या नव्हत्या. प्राजक्ताला एका अमेरिकन माणसाच्या बाजूची सीट मिळाली होती. आणि त्या दोघांचे हास्यविनोद चालू होते. आणि त्यामुळे माझी जिया जले … वगैरे परिस्थिती झाली होती. बाकी लग्नाला एकच वर्ष झाल्याने हे ठीक होते असे  मागे वळून पाहता मी म्हणू इच्छितो.
TOM BRADLEY विमानतळावर ही गर्दी उसळली होती. किंवा ती नेहमीच असावी आणि आम्ही दुसऱ्यांदाच तिथे आल्याने आम्हाला असे वाटले असावे. सर्व पावले आम्ही ज्या टर्मिनलकडे जाऊ पाहतो आहोत तिथेच चालली असावीत असा आम्हांला भास होत होता. त्या गर्दीचा मुकाबला करीत आम्ही अजून एका आगमन कक्षात जाऊन पोहोचलो. तिथे बोर्डिंग पास घेताना I९४ कागदपत्र तेथील अधिकाऱ्याला सोपविताना अमेरिकेची ही वारी संपुष्टात आल्याचे काही प्रमाणात आम्हाला दुःख झाले. सिंगापूर एयरलाईन्सचा एयर इंडियाबरोबर कोड शेयर होता असे मला पुसटसे आठवते. म्हणजे ह्या मार्गावर उड्डाण करण्याचे खरे हक्क कडे होते परंतु एयर इंडियाने काही पैशाच्या मोबदल्यात हे हक्क सिंगापूर एयरलाईन्सला विकले होते. एकंदरीत भारतात पोहोचल्याची चाहूल इथूनच मला लागली. त्या टर्मिनलच्या पुढे एखाद्या गावच्या एस टी डेपोप्रमाणे गर्दी उसळली  होती. एकदाचा आम्ही विमानात प्रवेश मिळविला.
TOM BRADLEY हे भव्य विमानतळ असावे ह्याची जाणीव मला उड्डाण होण्याच्या वेळी झाली. गेटवरून विमान निघाल्यापासून मुख्य धावपट्टीवर येईस्तोवर बहुदा पाच दहा मिनिटे गेली असावीत. विमान एकदा मुख्य धावपट्टीवर पोहोचले की अंतिम धाव सुरु करण्याआधी एक क्षणभर विसावते. त्यावेळी प्रत्येकवेळा माझ्या मनात ह्या क्षणी या महाकाय वाहनास उड्डाण करण्यापासून जर प्रवृत्त करायचे असेल तर काय करावे लागेल असा विचार माझ्या मनात येतो! असो विमानाने एकदाचे उड्डाण केले. पौर्णिमेची रात्र होती बहुदा. आकाशातील ढगांवरून हे विमान उडत होते आणि चंद्राची शीतल किरणे त्या ढगांवर पसरली होती. पुढील अनेक तास हेच दृश्य मला दिसणार होते.  विमानप्रवासातील काही गोष्टींचा मला सदैव अचंबा वाटत आला आहे. जसे की दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणात हवाई सुंदऱ्या काळ वेळ  पाहता आपल्याला एकदम ताटभर नव्हे प्लेटभर जेवण का आणून देतात? आणि प्रवाशातील काहीजण / अनेकजण पुढे बराच काळ आपल्याला काही खायला मिळणार नाही असे समजून त्यावर तुटून का पडतात? असो स्थळ काळाचे भान एव्हाना संपले होते आणि त्या रात्रीच्या पहिल्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला होता. जबरदस्तीने सर्वांना खिडक्या आणि सीटवरील  दिवे बंद करायला लावून झोपेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात येत होता. इतका वेळ कसा व्यतीत करावयाचा ह्याची चिंता मला पडली होती. समोरील सीटवर असलेल्या स्क्रीनवर गेम खेळण्यात आणि उपलब्ध असलेले थोडेफार चित्रपट पाहण्यात मी सुरुवातीचा काही वेळ घालविला. प्राजक्ता एकंदरीत प्रवासी म्हणून असलेल्या आणि गृहीत धरलेल्या हक्कांविषयी अगदी जागरूक होती. त्यामुळे तिने जवळजवळ दर तासाला हवाईसुंदरीकडे कोमट पाण्याची विनंती करण्याचा सपाटा चालविला. त्या हवाईसुंदरींच्या संयमाचे कौतुक करावे तितके थोडे! त्यांनी तिच्या प्रत्येक विनंतीचा मान राखित प्रत्येक वेळी कोमट पाणी आणून दिले. मधल्या कालावधीत मी खेळत असलेल्या गेममध्ये नैपुण्य संपादित करीत माझे वैयक्तिक उच्चांक नोंदवले. विमानात दाखविले जाणारे टुकार हिंदी चित्रपट मला झेपण्याच्या पलीकडे होते. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला. बहुदा तासभर असेल परंतु तितक्यात पुन्हा खाण्याची किंवा शीतपेयाची वेळ झाली होती. मदिराप्राशन करणारे सुखी जीव निद्राधीन झाले होते. असाच कधीतरी आकाशात सूर्य उगवला. दात घासण्याची तीव् इच्छा खळखळून चूळ मारण्यावर भागवून न्यावी लागली. आता मात्र जमिनीवर पाय टेकण्याची फार ओढ लागली होती. खूप वेळ नुसते खाऊन बसून राहिल्यावर दुसरे होणार तरी काय? शेवटी कसेबसे ते तेरा तास भरले आणि विमान चायनीज तैपईला उतरले. तिथे सराईत प्रवाशी ब्रश वगैरे घेवून न्हाणीघराच्या दिशेने कूच करते झाले. आम्ही फक्त ब्रश केले. ह्या विमानतळावर फारसे काही विशेष घडले नाही. म्हणायला तिथे चवीसाठी चहाचे नमुने ठेवण्यात आले होते. आम्ही त्यात फारसा रस दाखविला नाही.
सिंगापूरला उड्डाण करण्याचे गेट शोधून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. चायनीज तैपई ते सिंगापूर हा प्रवास काही खास घटनेशिवाय झाला. बाहेर सूर्याची प्रखर किरणे विमानाला तापून काढत होती. तारीख कोणती असावी असा प्रश्न विचारून मेंदूला त्रास करून घेण्याची तसदी मी घेतली नाही.
सिंगापूरला आम्ही हॉटेल बुक केले होते. तिथे जाण्यासाठी एका टर्मिनलवरून मिनी ट्रेनने आम्ही दुसऱ्या टर्मिनलवर गेलो. तिथे हॉटेलमध्ये शिरून सचैल स्नान केले. अंघोळीनंतर अगदी गाढ झोप लागली. नशीब म्हणून अलार्म लावला होता. त्याच्या आवाजाने जाग आल्यावर एक क्षणभर आपण कोठे आहोत आणि किती वाजले असावेत ह्याचे भान राहिले नाही. बाहेर येवून आम्ही सिंगापूर दर्शनच्या रांगेत उभे राहिलो. तिथे आमचे पासपोर्ट ताब्यात घेवून ही विनामुल्य सफर घडविण्यात आली. त्यांना पासपोर्ट देताना आम्हाला काहीसे जीवावर आले होते. बाकी सफर उत्तम झाली. सन्तोसा बीचशिवाय विशेष उल्लेखनीय काही नव्हते. जर माझी स्मरणशक्ती माझी उत्तम सेवा करीत असेल तर त्या बीचवरील पांढरी वाळू विशेष लक्षात राहिली. (हे इंग्लिश वाक्याचे मराठीत जसेच्या तसे भाषांतर!) एकंदरीत थकलेल्या मनःस्थितीमुळे आम्ही ही सफर फारशी काही मजेत अनुभवली नाही. परत आल्यावर आम्हाला आमचे पासपोर्ट परत करण्यात आले. कोणी सिंगापूरमध्ये परस्पर गायब होऊ नये म्हणून ही काळजी. मग आम्ही विमानतळावर चिकन करी आणि भात असे जेवण घेतले. ह्या नऊ तासाच्या थांब्याची एक गंमत. एक मित्र एकटाच परत येताना ह्या गेटसमोर नऊ तासाचा थांबा म्हणून झोपून गेला. इतका गाढ कि विमान उड्डाणाची वेळ झाली तरी त्याची झोप काही उडाली नाही. एअरलाईन्सने केलेला त्याचा नावाचा घोष सुद्धा त्याला उठवू शकला नाही. शेवटी त्याचे सामान बाहेर काढून विमान उड्डाण करते झाले. त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला आलेले नातेवाईक बराच काळ चिंताग्रस्त होते.
असो आम्ही सिंगापूर विमानतळावर एल्विसचा एक शो चालला होता तोही पाहिला. आणि शेवटी एकदाचे आम्ही  मुंबईला जाणाऱ्या विमानात बसलो. आता माझे स्थळकाळाचे भान काहीसे परत आले होते. रविवारची संध्याकाळ झाली होती. पुन्हा एकदा हवाईसुंदरी, जेवण, गेम्स अशा सर्व चक्राचा मुकाबला करीत आम्ही सोमवारी सकाळी साडेबारा वाजता मुंबईला आगमन करते झालो. आम्ही अशा मनःस्थितीत पोहोचलो होतो कि अजून आम्हाला कोणी परत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसण्यास सांगितले असते तर ते ही आम्ही केले असते! असा एक धमाल प्रवास! एखादा धीम्या गतीचा चित्रपट ज्यात नायक नायिकेचे भावबंध ५३ तासात उलगडत जातात, असा सुद्धा बनू शकतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...