मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

ब्लॉगरचे मनोगत!


मोठे खेळाडू कधी एकदम फॉर्मात असतात आणि धडाधड शतके ठोकतात किंवा भरपूर बळी मिळवितात. एखादा चांगला कवी रंगात आला की सुंदर कविता लिहितो. ह्यात चांगला हा महत्वाचा भाग आहे. नाहीतरी बरेचसे कवी स्वयंघोषित असतात. लोकप्रिय कवी आणि स्वयंघोषित कवी ह्यांचे प्रमाण :१०००, :१०००० किंवा :१००००० ह्यातील काहीही असू शकते. लहानपणी एका स्पर्धेत एक वाक्य होते. तो कवी डालडा विकतो. हे वाक्य उलटे वाचले तरी तसेच राहते. परंतु ह्या वाक्याने कवीच्या आर्थिक स्थितीची खिल्ली उडविली गेली आहे असे समस्त कवी वर्गाला वाटू लागले, आणि मी ही कवी बनण्याचा थोडाफार विचार जो होता तो रद्द केला.
मध्यंतरी सिंटेल मध्ये असताना एक मित्र म्हणाला कि ह्या वर्षी माझा नवीन प्रोग्रॅम लिहिण्याचा फॉर्म खालावला आहे. हे ऐकून मी हैराण झालो. एखादा माणूस एक तर चांगला प्रोग्रॅमर असू शकतो किंवा खराब, ह्यात फॉर्मचा कुठे प्रश्न आला असा प्रतिप्रश्न मी त्याला केला. मग त्याने त्याची वैयक्तिक जीवनातील स्थिती, त्याचा व्यवस्थापक कसा आहे आणि प्रोजेक्ट कसे आहे हे सर्व घटक त्याच्या कोड करण्याचा क्षमतेवर कसा परिणाम करू शकतात ह्यावर माझे चांगले तासभर बौद्धिक घेतले.
खेळाडू आणि कवी ह्यांच्याबरोबर हल्ली ब्लॉगर्सची भर पडली आहे. मराठीत बरेच ख्यातनाम ब्लॉगर्स आहेत. ते सातत्याने सुरेख ब्लॉग लिहितात आणि आणि त्यांच्या संकेतस्थळाला दिल्या गेलेल्या भेटींची संख्या झपाट्याने वाढत जाते. माझ्यासारखे नवशिके ब्लॉगर्स मात्र क्वचितच फॉर्म मध्ये येतात. - ब्लॉग नंतर एखादा ब्लॉग चांगला उतरतो. आता हे ही माझे म्हणणे. बाकी माझ्या ब्लॉगला तसे - निष्ठावंत वाचक आहेत. ते नियमाने प्रतिक्रिया देतात. त्यांचे म्हणणे असे की ब्लॉगच्या वाचक संख्येकडे लक्ष देणे कसे चुकीचे आहे. त्यांनी कितीही समजूत घातली कि दिल है कि मानता नहीं!
असो ब्लॉगरचा फॉर्म म्हणजे काय? कोणत्याही ब्लॉग मध्ये सातत्याने एखादे सूत्र कायम ठेवणे कठीण असते. त्यामुळे ब्लॉगर विविध विषयांना हात घालतात. त्यातील काही लेखांची भट्टी जमते तर काहींची नाही. एखाद्या क्षणी एखादा किडा डोक्यात वळवळतो मग आपण ब्लॉग लिहायला घेतो कधी हा विषय लिहिता लिहिता फुलत जातो तर कधी विषय भरकटतो. अशा वेळी मला सिंटेलचा तो मित्र आठवतो आणि मग मी बाह्यघटकांना दोष देतो. बाकी एक महत्त्वाचा मुद्दा, पूर्वीच्या कागदावर लेखन करणार्या लेखकांना मी मानतो. ते बहुदा स्वतःच्या लेखांचे पूर्ण परीक्षण करून मगच तो लेख प्रसिद्ध करत असावेत. माझ्यासारखे नाही, एकदा लेख लिहून झाला की केला पब्लिश!
असो ब्लॉग लिहिणे हा एक छंद किंवा व्यसन आहे. आणि जनांच्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून ब्लॉगचा कीस पाडणे ही एक तपस्या आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...