मनुष्यजातीच्या उत्क्रांतींच्या प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी मनुष्याने संघर्ष केला. हा संघर्ष दैनंदिन पातळीवरचा होता. उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेत हा संघर्ष दैनंदिन पातळीवर राहिला नाही. साठवणूक करून ह्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकाळासाठी तरतूद करून ठेवण्याचे शहाणपण माणसाला सुचले. ही प्रगती सर्व मनुष्याजातीची न झाल्यामुळे काही समूहांचा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष अजूनही कायम आहे. आज आपण बोलूया उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेतील पुढील टप्प्यावरील समूहाविषयी!
मनुष्यजातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपणास जास्त काळ शांत बसता येत नाही. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर आपण नवीन गरजा निर्माण केल्या. क्रीडा, करमणुकीची साधने निर्माण केली. तंत्रज्ञानाने प्रगती करताच मात्र ह्या गरजांनी आपल्यावर ताबा मिळविण्यास सुरवात केली. गाडी हवी, वातांकुलीत घरे हवीत, बिले भरण्यासाठी इंटरनेट हवे, बोलण्यासाठी भ्रमणध्वनी हवा इथून सुरुवात झाली. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून बिले भरता येण्याची सोय झाली.
माणसाचे तंत्रज्ञानांच्या बाबतीत अंतिम ध्येय काय असू शकते? माझ्या घरी एक संगणक सदृश्य उपकरण असणार, माझ्या मनातील विचार ते ओळखू शकणार आणि दूरदर्शन संच, संगणक, दृश दूरध्वनी यापैकी कोणत्याही एका MODE मध्ये सुरु होवू शकणार. त्यापुढील प्रत्येक पर्याय मी केवळ माझ्या मनातील विचारावर नियंत्रित करणार. Teleportation ने मी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणार. अन्नासाठी मी सलाईन लावणार...आणि असेच पुढे काही.. आज ही थोडी अतिशोयक्ती वाटत आहे पण मनुष्याच्या स्वस्थ न बसता येण्याच्या गुणधर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवशी आपण ही अवस्था गाठणार याची मला खात्री आहे. आणि मग ह्या अवस्थेच्या शेवटी आपण एक तर यंत्र बनून जगणार किंवा तंत्रज्ञान आपल्यावर ताबा मिळवणार!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा