मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जुलै, २०१६

टोमणे

ह्या आठवड्यात एक मनाला खूप चुटपूट लावणारी बातमी वाचनात आली. एक विशीतला तरुण! विमानतळावरुन घरासाठी रिक्षा पकडली. घरी परतल्यावर सुट्ट्या पैशावरून रिक्षावाल्याशी थोडा वादविवाद झाला. शेवटी तो मिटला सुद्धा! पण मग जाता जाता रिक्षावाल्याने काही अपमानास्पद शब्द उच्चारले. घराकडे जायला निघालेल्या ह्या मुलाला हे शब्द ऐकताच भयंकर राग आला. धावत्या रिक्षाच्या मागे हा ही धावत सुटला आणि त्याने रिक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला. हाती आला तो फक्त रिक्षाचा लोखंडी रॉड! रिक्षाचे संतुलन गेलं आणि धावती रिक्षा नेमकी ह्या तरुणाच्या अंगावर पडुन ह्याचा हकनाक जीव गेला. 

दुसऱ्याला घालुन पाडून बोलणारी माणसं सदैव आपल्या अवतीभोवती वावरत असतात. जगातील प्रत्येक माणसाची किमान एक दुखरी नस असते. ही दुखरी नस घेऊन प्रत्येकाला वावरावं लागतं. भोवतीच्या बऱ्याच जणांना ही बाब माहित असते. मग कधी वादाचे प्रसंग ओढवतात आणि अशा वेळी समोरच्या माणसाच्या ह्या नाजुक गोष्टीवर काही कुत्सित उद्गार काढण्यात मग काही माणसं धन्यता मानतात. समोरच्या माणसाला राग आला पाहिजे, त्याची मनःस्थिती बिघडली पाहिजे इतकाच नीच हेतु अशा उद्गारांमागे असतो. काही वेळा उद्गारांऐवजी राग येऊ शकणाऱ्या कृतीचा वापर केला जातो.

अशा वेळी शांत राहणं कितीही कठीण असलं तरी ते खूप आवश्यक असतं. एका क्षणाच्या टोकाच्या प्रतिक्रियेपायी आयुष्यावर विपरीत परिणाम झाल्याची कित्येक उदाहरणं आपण वैयक्तिक / व्यावसायिक जीवनात पाहत असतो. ही बातमी आली त्यावेळी बातमीबरोबर अशा वेळी मन शांत राखण्याचे काही उपाय तज्ञांनी दिले होते. पण बहुतेक सारे प्रवासातील होते. रिक्षावाल्यांशी, सहप्रवाशांशी प्रवासाच्या सुरुवातीपासून संवाद वगैरे साधा वगैरे वगैरे! 

आता नेहमीच्या आयुष्यात वापरण्याची काही तंत्रे! हल्लीच्या भ्रमणध्वनीला ओळखण्यापायी दिवसरात्र खर्च करण्याच्या काळात मनाशी संवाद साधण्यावर मेहनत घेणारी माणसे कमी होत चालली आहेत. ह्यातील बहुतांशी तंत्रे अशा वेळी आपल्या मनाशी संवाद साधण्याशी संबंधित असतात.  ज्या क्षणी अशा प्रसंगी आपला तोल जात आहे असे वाटलं तर खालील संवाद आपल्या मनाशी साधा.


१) समोरच्या माणसाच्या कितीही टोकाच्या कुत्सित शेऱ्याने, कृतीने आपलं कोणतंही व्यावहारिक नुकसान होत नसतं. जर आपण शांत राहू शकलो तर तो समोरचा माणुसच आपला वेळ घालवत असतो. 

२) बऱ्याच वेळा जी माणसे प्रत्यक्षात आपलं काही बिघडवू शकत नाही अशीच माणसं ह्या कुटिल तंत्रांचा वापर करतात. कल्पना करा की तुमच्या ऑफिसातील बॉसला तुमचा राग आला तर तो तुम्हांला काही खोचक टोमणे मारेल का? अर्थातच नाही! तो थेट अशी काही कृती (जी तुम्हांला कदाचित जाणवेल किंवा जाणवणार सुद्धा नाही) करेल की त्याचे परिणाम तुम्ही काही काळ भोगत बसाल! त्यामुळे प्रत्यक्ष काही बिघडवू न शकणारी माणसेच अशा तंत्रांचा वापर करतात हे मनाला समजावा! 

सारांश काय तर - लक्ष नको देऊस टोमणे मारणाऱ्याकडे; कारण तुझं आहे तुजपाशी !

शनिवार, २३ जुलै, २०१६

देशमुखांचं पोर!

नुकताच अजुन एक प्रौढांसाठीचा तथाकथित विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या जाहिराती कुटुंबवत्सल मंडळी जी वर्तमानपत्रे वाचतात तिथं अगदी ठळकपणे झळकल्या. चित्रपटाची परीक्षणं सुद्धा छापुन आली आणि FM रेडिओवर अगदी जोरानं ओरडुन सांगण्यात आली. 

समाजातील प्रत्येक घटकांची विशिष्ट अशी गरज असते आणि त्यानुसार साहित्य, नाटकं, चित्रपट ह्यांची निर्मिती होत असते. हा असा जगाचा रितीरिवाज असताना मला ही वरील गोष्ट खटकायचे कारणच काय असा मुद्दा समोर येणार. मला ही गोष्ट खटकायची कारणं पुढीलप्रमाणे 

१) स्त्रियांची सामाजिक जीवनातील सुरक्षा हा सध्या ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. भले आपली घरं अगदी आलिशान असतील आणि आपण एखाद्या परकीय कंपनीच्या अत्याधुनिक कार्यालयात काम करत असु. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची मानसिकता आधुनिक असेल. पण सामाजिक जीवनात वावरताना मात्र अजुनही बराच हिस्सा मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीकडे आदराने पाहायला शिकला नाही. 

पाश्चात्य देशात ह्यापेक्षाही वरच्या थराच्या प्रौढ कलाकृती असतील पण सामाजिक जीवनात मात्र स्त्रीकडे अशा अनादराने पाहण्याची कोणाचीही टाप होत नाही. घर ते कार्यालय हा टप्पा सुरक्षितपणे दिवस आणि रात्री स्त्रिया पार पाडू शकतील  अशी परिस्थिती भारतात बऱ्याच ठिकाणी राहिली नाही. असले चित्रपट समाजातील जो घटक अजुनही स्त्रीकडे आदरानं पाहायला शिकला नाही त्यांच्या मनोवृत्तीत खतपाणी घालतात. 

सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचु शकणाऱ्या माध्यमात दृश्य आणि शाब्दिक द्वयर्थीपणाच्या सीमा आखुन देण्यात याव्यात.

२) चांगल्या घरातील मुलांनी अशा चित्रपटात काम केल्यानं अशा द्वयर्थी संवादाची रेलचेल असलेल्या चित्रपटांना काही प्रमाणात सामाजिक मान्यता मिळते. स्त्रियांकडे आदरानं न पाहणाऱ्या समाजातील घटकांमध्ये अशा चित्रपटांमुळं आणि त्यात भुमिका निभावणाऱ्या मुख्य प्रवाहातील कलाकारांमुळे हे सारं काही आता राजरोसपणे चालु शकेल अशी भावना निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. 

३) वयात येणाऱ्या, कॉलेजातील मुलांवर असे चित्रपट सामाजिक जीवनात हा असला प्रकार म्हणजेच नॉर्म आहे अशी समजुत निर्माण करतात. अशी मानसिकता घेऊन वाढलेल्या पिढीचं पुढं कसं होणार अशी चिंता मनात निर्माण होते. 

समाजात सर्व प्रकारचे घटक पुर्वीपासून होते आणि राहणारच! पण पुर्वी सरळमार्गाने वागणाऱ्या घटकाने सामाजिक जीवनात वावरण्याचे संकेत बनवून ठेवले होते आणि बाकीचे घटक ह्या संकेतांना, रुढींना वचकुन राहायचे. हल्ली हे बाकीचेच असंस्कृत घटक सामाजिक जीवनाचा वेगानं ताबा घेत आहेत. आणि देशमुखांसारख्या  नामवंत घराण्यातील पोरं त्यात सहभागी होत आहेत. आपण ज्या घराण्यात जन्मलो आहोत त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी वागणूक सामाजिक जीवनात दर्शविण्याच्या जबाबदारीची जाणीव असल्या वाह्यात पोरट्यांना करुन द्यायची गरज आहे! 

गुरुवार, २१ जुलै, २०१६

समय तू धीरे धीरे चल !






महत्प्रयासाने मागे सारलेली रविवार संध्याकाळ आणि सोमवार सकाळ सरते न सरते तोवर म्हणता म्हणता गुरुवार उजाडला. ऑफिसात कितीही क्लिष्ट काम असलं तरी एकदा का गुरुवार सकाळ वगैरे उजाडली की आयुष्य कसं आशादायी वाटु लागतं. म्हटलं तर आपण भारतीय लोकांनी अमेरिकन आणि पाश्चात्य लोकांना काही कार्यालयीन सवयींच्या बाबतीत बिघडविलं. सायंकाळी इमानेइतबारे चार पाच वाजता ओस पडणारी त्यांची कार्यालयं (विशषेतः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील) सात वाजेपर्यंत गजबजत राहु लागली. पण एक मात्र खरं शुक्रवारी सायंकाळी ऑफिसातील सर्व तणाव विसरुन मनमोकळं करायची सवय मात्र आपल्या लोकांना खूप आवडली. विशेषतः परदेशी वास्तव्य असणाऱ्या आपल्या देशवासीयांनी ही सवय मनापासुन उचलली.

आठवड्यातल्या प्रत्येक दिवसाच्या माझ्या विशिष्ट मनःस्थित्या असतात. त्याविषयी नंतर कधी! पण बऱ्याच वेळा असं जाणवतं की अरे आताच रविवार सायंकाळ होती आणि अचानक शुक्रवार उजाडला सुद्धा! हा आठवडा गेला कसा हे काही कळलंच नाही बघा! मग हाच हिशोब महिन्याच्या बाबतीत लावला जातो. "अरे आता कोठे मे महिन्याची सुट्टी संपली आणि आता ऑगस्ट सुद्धा उंबरठ्यावर येऊन ठेपला बरं"! मग मन कसं मागं मागं जातं. वर्षाचा जानेवारी आठवतो, वर्षातील सहली आठवतात. आयुष्यात एकदाच येणारं २०१६ वर्ष बघता बघता सरत चाललं आहे ह्याची अस्वस्थ करणारी जाणीव मनाला चुटपुट लावुन जाते.

मन अजुनच भावुक असलं आणि ह्या विचारात गढून जाण्याची चैन परवडण्याइतका वेळ असेल तर मग मन कसं २०१०, २०००, १९९० असले टप्पे गाठत जातं. आपले शाळा, कॉलेजातील, आईवडिलांच्या मायेच्या छत्राखाली काढलेले पहिल्या नोकरीतील, परदेश वास्तव्यातील, मुलांच्या बालपणातील सारे सारे दिवस आठवत राहतात. दिवसाचं कसं असतं बघा ना! प्रत्यक्ष अनुभवताना कदाचित त्यातील सुख आपल्याला जाणवलं नसेल पण मागे वळुन पाहताना मात्र नक्कीच त्यातील सुखदता आता जाणवते. आणि ते सुख आपल्याला त्यावेळी का कळलं नाही अशी चुटपुट सुद्धा लागुन राहते. 
 
भौतिकशास्त्राच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर प्रत्येक सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष सारखाच वेळ घेतात. पण आपण ज्या मनःस्थितीतुन जात असतो त्यावर आपल्याला ही वेळेची एकक किती अल्पकाळ / दीर्घकाळ भासतात हे अवलंबुन असतं. सापेक्षतावादाचे स्पष्टीकरण देताना म्हटलं जातं की भट्टीजवळ बसलं असता एक मिनिटं सुद्धा युगासारखं वाटू शकतं तर सुंदर युवतीच्या सानिध्यातील तासभर सुद्धा एका क्षणासारखा वाटू लागतो. 
अभ्यासाचं किंवा पैसा कमवायचं टेन्शन जोपर्यंत नसतं तोपर्यंत आयुष्य रमतगमत चालतं. पूर्वी अभ्यासाचा तणाव नसल्याचं वय अगदी आठवी, नववी पर्यंत जायचं. हल्ली माहीत नाही! 

आज अचानक हे सारं आठविण्याचं कारण म्हणजे मी मागील काही वर्षात नक्की कायकाय झालं हे आठवायचा प्रयत्न करुन पाहत होतो. २०१२, १३, १४, १५ ही सारी वर्षे अगदी सारखीच वाटु लागली. ह्यातील एका वर्षाला दुसऱ्यापासून वेगळं करण्यासारखं काही खास वाटत नव्हतं. कारण स्पष्ट होतं. अगदी यांत्रिकपणे ही वर्षे गेली होती. पण हेच मागे वळून पाहता - १९८०, १९९० अगदी २००० च्या दशकातील बरीच वर्षे अगदी स्पष्ट आठवत होती.

निष्कर्ष बहुदा असाच की जोपर्यंत हा नोकरीधंद्याचा आणि कौटुंबिक जबाबदारीचा तणाव मागे लागणार तोपर्यंत हे कालचक्र असं घाईघाईत चालल्याचा भास होतंच राहणार. कारण आपण ह्यातील एकही क्षण खऱ्या अर्थानं अनुभवत नसणार.  आणि जेव्हा खऱ्या अर्थानं फुरसत मिळणार तेव्हा मात्र हा मोकळा वेळ खायला उठण्याची शक्यताच जास्त! सारं काही सापेक्ष हेच खरं! 

शनिवार, १६ जुलै, २०१६

सरोगसी - एकल पालकत्व

आधुनिक विचारसरणी निःसंशयपणे अखंड भारतवर्षात वाढीस लागली आहे. आधुनिक विचारसरणी जितक्या आत्मविश्वासानं लोकांसमोर मांडता येते तितक्याच आत्मविश्वासानं जुनी मतं मांडता येतील की नाही असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि जर आपल्या घरी टाइम्स ऑफ इंडिया सारखं वर्तमानपत्र येत असेल तर आपला हा संशय वाढीस लागतो!

प्रस्तावना अशासाठी की तुश्शार कपूरने सरोगसी तंत्राचा वापर करुन एका मुलाचं पितृत्व स्वीकारलं. एका पुरुषानं हा एकल पालकत्वाचा निर्णय घेतला त्यामुळं त्याचं काही प्रमाणात कौतुक सुद्धा झालं. माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासुन चुकचुकणाऱ्या संशयाच्या पालीने ह्यावेळी मात्र उघड रुप धारण केलं. हा संशय जुन्या विचारसरणीकडे झुकणारा असल्यानं काहीशा धाकधुकीतच ही पोस्ट लिहितोय! 

सरोगसी हा पालकांच्या दृष्टीनं पाहायला गेला तर एक आयुष्य पालटवून टाकणारा निर्णय असतो. काही तांत्रिक कारणास्तव ज्यांना नैसर्गिक पद्धतीनं पालकत्व मिळत नाही त्यांना तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली निःसंशयपणे ही मोठी सुवर्णसंधी आहे. सरोगसी पालकत्व स्वीकारलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या दृष्टीतुन एक बाब ठीक आहे आणि ती म्हणजे अशा मुलांना माता आणि पिता अशा दोघांचीही माया मिळते. तरीसुद्धा माहितीजालावर काही संशोधन केलं असता अशा मुलांना आपण आपल्या आईशिवाय दुसऱ्या कोण्या स्त्रीच्या गर्भात वाढलो हा विचार काही वेळा भावनात्मक दृष्ट्या त्रासदायक ठरतो. 

ह्या पुढील पातळी म्हणजे एकल पालकत्व! आपल्या लहानपणी आई - वडील दोघांचीही माया मिळणं हा प्रत्येक बालकाचा हक्क असु शकतो की नाही? आता तुम्ही म्हणाल की असंख्य कुटुंबातील बालकांना जरी जन्मदाते आई वडील असले तरी विविध परिस्थितीमुळे कमी प्रमाणात त्यांना त्यांची माया मिळते. मुद्दा काही प्रमाणात ग्राह्य असला तरी ह्यामध्ये बदलता येण्यासारखी परिस्थिती किती असते ? आणि कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी माता पिता हे काही मोजके का होईना पण एकत्र वात्सल्याचे क्षण आपल्या पाल्यास देतातच! 

ज्या बालकानं एकल पालकत्व अनुभवलं आहे त्या बालकास पुढे मोठं झाल्यावर आयुष्यातील आई वडिलांच्या मिळुन अनुभवू शकणाऱ्या पालकत्वास आपण मुकलो अशी भावना निर्माण झाल्यास जबाबदार कोण?
एकल पालकत्व स्वीकारणारा माणुस भावनिक दृष्ट्या ह्या जबाबदारीस सक्षम आहे का ह्याची तपासणी होणं खरतरं आवश्यक आहे. केवळ पैसा हा घटक कोण्या व्यक्तीस एकल पालकत्व मिळवून देण्यास सक्षम बनवू नये.  

विवाहानंतर माणुस आपल्या साथीदाराशी जुळवून घेतो, बऱ्याच तडजोडी करतो. ह्या सर्व गोष्टी त्याला एक संयमी पालक म्हणुन बनवून देण्यास हातभार लावत असतात. पण एकल पालकत्वात अचानकपणे ही व्यक्ती पालकत्वाचं मोठं इंद्रधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करु पाहते. आणि समजा काही दिवसा, महिन्या किंवा वर्षात समजा ह्या व्यक्तीस जाणवलं की ह्या इतक्या मोठ्या जबाबदारीस आवश्यक असणारा संयम माझ्याकडं नाही, तर मग निर्माण होणाऱ्या परिस्थितीस जबाबदार कोण? भारतीय समाजात आपण आईवडील ह्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना समान प्राधान्य देतो. ह्या एकल पालकत्वात मात्र बालक एका बाजुच्या नातेवाईकांना पुर्णपणे मुकतो.  


काही गैरसमज नकोत मी स्पष्ट करु इच्छितो की इथं वैयक्तिकरित्या तुश्शार कपूरविरुद्ध मला काहीही म्हणायचं नाही!  त्यानं सद्य कायद्याच्या चौकटीत राहून हे सर्व काही केलं आहे. ज्या माणसाला आपलं चांगलं नाव सुद्धा काही विशिष्ट कारणांमुळं बदलावंस वाटलं त्याच्या मनःस्थिरतेविषयी मात्र माझ्या मनात थोडी शंका निर्माण झाली आहे हे मात्र मी मान्य करतो. एक समाज म्हणून सरोगसीमार्फत एकल पालकत्वाला सामोरे जाव्या लागणाऱ्या बालकांच्या मानसिकतेचा आपण विचार करणे आवश्यक आहे हाच मुद्दा आजच्या ह्या पोस्टचा!

गुरुवार, १४ जुलै, २०१६

संख्यारेषा आणि मनः स्पंदने!




सातवी CBSE नवीन सत्र आणि गणिताचा नवीन धडा! काही जुन्या संकल्पनांची नव्याने ओळख!

१) Natural Numbers   - नैसर्गिक संख्या 

२) Whole Numbers - बहुदा पूर्णांक (शुन्य आणि नैसर्गिक संख्या)

३) Integers - शुन्य, नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांचे संख्यारेषेच्या डाव्या बाजूवरील ऋण साथीदार counterpart 

४) Fractions - धन अपूर्णांक 

५) Rational Numbers - परिमेय संख्या - ह्यात खरंतर मुख्य म्हणजे ऋण अपूर्णांक येतात. 

ह्या सर्व व्याख्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे जरी ह्या व्याख्या अधिक प्रगल्भ होत जातात तरी आधीच्या व्याख्यांना समाविष्ट करण्यास त्या विसरत नाहीत. म्हणजे whole numbers मध्ये सर्व नैसर्गिक संख्या समाविष्ट असतात. (अपवाद धन अपूर्णांकांचा! - ते ऋण संख्यांना समाविष्ट करीत नाहीत) वरील गटातील सर्वात प्रगल्भ व्याख्या पाहिली तर परिमेय संख्यांची; ती वरील सर्व व्याख्यांना समाविष्ट करते. 

आपल्या मानवी भावनांचं सुद्धा असंच काही असतं नाही का? दुःखी, निराकार / निर्विकार आणि आनंदी ह्या तीन भावना ऋण, शुन्य आणि धन संख्यांच्या equivalent आहेत. आणि ह्या भावनांच्या विविध छटा दर्शविण्यासाठी मग अपूर्णांक आणि परिमेय संख्या आहेत. कोणी जुनी जाणती माणसं ही पोस्ट वाचत असल्यास निराकार आणि निर्विकार ह्या दोन कशा पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत हे मला समजावुन सांगतील. 

काही माणसं मोजक्या भावना सांभाळू शकतात. म्हणजे फक्त नैसर्गिक संख्या म्हणा ना! त्या पलीकडील भावनांची क्लिष्टता त्यांना झेपत नाही आणि ते मग कोलमडून पडतात : म्हणजे चक्क रडू लागतात, रागावतात किंवा अबोल होतात. हल्लीच्या धावपळीच्या जगात आपल्याला सभोवतालच्या लोकांचे हे भाव बऱ्याच वेळा ओळखता येत नाहीत. 

काही माणसं थोडी अधिक प्रगल्भ असतात. ती निराकारता अथवा निर्विकारता कशी सांभाळायची हे चांगलं जाणुन असतात. 

पुढील पातळी म्हणजे दुःखी भावना समर्थपणे सांभाळू शकणाऱ्या लोकांची! 

आणि सर्वात पोहोचलेली माणसं म्हणजे आपल्या सुखदुःखाच्या भावनांच्या  विविध छटा (अपुर्णांक म्हणा ना !)  ते जाणून असतात आणि ह्या छटा ते मस्तपणे सांभाळतात!

ह्या भावना ओळखण्याची आणि त्यांना योग्य प्रकारे तोंड देण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. ह्यातील काही भाग आनुवंशिक असतो आणि काही भाग तुमच्या आयुष्यात तुम्हांला क्लिष्ट प्रसंगांचा किती वारंवारतेने सामना करावा लागतो ह्यावर अवलंबुन असतो. 

हल्ली बऱ्याच वेळा आपण सकारात्मक दृष्टिकोनाचे गुणगान गात असतो. ह्यात मोक्याच्या क्षणी धन बाजुवरील भावनांवर लक्ष केंद्रित करुन राहायचं असतं. आणि ऋण बाजूवरील भावनांना निवांत क्षणी मोकळं करुन द्यायचं असतं आणि त्यांचं गाऱ्हाणं ऐकायचं असतं!


आज गुरुवारी सकाळी मी बहुदा २२/७ (पाय) प्रमाणात आनंदी असेन  म्हणुनच असला काहीसा आगळावेगळा विषय सुचला! 

आजचा संदेश - परिमेय (Rational) बना!  

तळटीप - ह्या संज्ञांच्या व्याख्यांबाबतीत काही चूकभूल झाली असेल तर सांभाळून घ्या!

शनिवार, ९ जुलै, २०१६

CBSE, ICSE वगैरे वगैरे!

प्रस्तावना - हा लेख मी २०१६ साली लिहिला. त्यावेळी सोहम सातव्या इयत्तेत होता. त्यामुळं बरेचसे संदर्भ त्याच्या सातवी इयत्तेतील अभ्यासक्रमाशी आणि परीक्षा पद्धतीशी निगडित आहेत. 

सद्यकाळात ज्यांची चलती आहे अशा CBSE, ICSE वगैरे बोर्डात बरेचजण आपल्या मुलांना प्रवेश घेतात. ह्या पोस्टचा हेतु पुर्णपणे ह्या बोर्डांच्या विरोधात नाही. ह्या बोर्डात जाणाऱ्या मुलांना अगदी लहान वयापासून ताणतणावाला तोंड द्यावं लागतं, हा ह्या बोर्डांविषयी घेतला जाणारा मुख्य आक्षेप! जर सकारात्मक बाजु पहायला गेलं तर केवळ अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रात आवश्यक असणारे गुण (वक्तृत्व, नृत्य इत्यादी) विकसित करण्यात ही बोर्ड हातभार लावतात. 

जर आपण आपल्या पाल्यास ह्या बोर्डांच्या शाळेत घातलं असेल तर त्यांना शालेय जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या ताणतणावास तोंड देण्यास मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. उगाचच नकारात्मक शेरे मारुन त्यांचा आत्मविश्वास कमी करु नये. बरीच शक्यता अशी आहे की आपण आपल्या लहानपणी इतक्या प्रमाणात अभ्यास केला नसणार त्यामुळे उगाचच आपल्या मुलांसमोर गमजा मारु नये!


ह्या बोर्डांच्या दोन घटक चाचण्या आणि मग सहामाही परीक्षा; पुन्हा दोन घटक चाचण्या आणि मग वार्षिक परीक्षा अशी आखणी असते. अभ्यास चालू असताना मुलांना आणि पालकांना तीन पातळ्यांवर प्रयत्नशील राहावं लागतं. 
१> शालेय अभ्यास 
२> वह्या पूर्ण करणे 
३>  प्रोजेक्ट्स 

हे सर्व काही आलेखाच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी मी काही गृहीतक करत आहे. एक शैक्षणिक वर्ष वर्षभरातील सुट्ट्या आणि शाळेचे उद्योग वगळता साधारणतः ९ महिने (३४ आठवडे) चालतं. त्यात एकंदरीत ६ परीक्षा येतात. दीड ते दोन आठवडे चालणारी एक परीक्षा असं लक्षात घेता १०-१२ आठवडे परीक्षेत जातात. मग प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २० -२२ आठवडे उरतात. पुर्ण वर्ष ५२ आठवड्याचं आणि प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २२ आठवडे हे काहीसं पटायला कठीण असलं  तरी पण फार तर फार २-३ आठवड्याचा फरक असण्याची शक्यता आहे! 

आता आपण प्रथम घटक चाचणी कडे वळूयात. ह्याला ही बोर्डे उगाचच काहीतरी मोठे नाव देतात. पण मराठी माध्यमात शिकलेल्या माझ्यासारख्या माणसासाठी ही प्रथम घटक चाचणीच! 
 

प्रथम घटक चाचणी 

१> शालेय अभ्यास - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात पन्नास एककांपर्यंत पोहोचतो. शाळेत फक्त नमनापुरतं  धड्याची तोंडओळख करुन दिली जाते. बाकी सर्व मग आपल्याला घरी किंवा शिकवणीमध्ये पाहावं लागतं. पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५० एकक लक्षात असणं आवश्यक असतं. 

२> वह्या पूर्ण करणे  - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो. 


३>  प्रोजेक्ट्स -  हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.

खालील आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.



द्वितीय घटक चाचणी 

१> शालेय अभ्यास - आता आपण पन्नासपासुन आरंभ करतो आणि हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात शंभरपर्यंत पोहोचतो.  पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५१- १०० ही पन्नास एकक लक्षात असणं आवश्यक असतं. 

२> वह्या पूर्ण करणे  - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो. 

३>  प्रोजेक्ट्स -  हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.

खालील आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.
 





शालेय अभ्यास सहामाही 

द्वितीय घटक चाचणी संपली की साधारणतः एक दोन आठवड्यात सहामाही परीक्षा येते आणि ज्यात मुलांना १ -१०० एककांची उजळणी करता येणं आवश्यक असतं. आणि हा सर्वात तणावाचा काळ बनतो.

 
 मी आधी ह्या बोर्डांचा मोठा टीकाकार होतो. आणि आदर्शवादी एस. एस. सी. बोर्डच कसं चांगलं ह्या बाजुने मोठ्या हिरीरीने वादविवादात भाग घ्यायचो. पण जसजशी व्यावसायिक जगातील अनिश्चिततेला अधिकाधिक तोंड द्यावं लागलं तसतसं मी माझं मत हळुहळू बदललं. पुढील आयुष्यात येणाऱ्या कठीण काळास अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकण्यास हरकत नाही अशा मताचा मी बनलो आहे. पण ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकल्यास आपल्या एस. एस. सी. बोर्डाच्या आदर्शवादी मुल्यांची सतत आपल्या मुलांस आठवण करुन देऊ नये हे लक्षात असु द्यावं. 

ह्या बोर्डांच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणण्यासाठी काही सुचना आहेत. इतकी लठ्ठ पुस्तके तीन तीन मजले मुलांना चढवुन न्यावी लागतात. त्याऐवजी इतक्या फी घेणाऱ्या ह्या शाळांनी मुलांना पुस्तकांच्या दोन प्रति द्याव्यात आणि एक प्रत शाळेत ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करुन द्यायलाच हवी. 
सर्वागीण विकासासाठी प्रोजेक्ट वगैरे झूट आहे. ह्यात पालकांचाच आणि त्यातही आयांचाच जीव मेटाकुटीला येतो. कहर म्हणजे परीक्षेच्या दिवशी प्रोजेक्टचे सबमिशन ठेवण्याचा अविचारसुद्धा हे लोक करू शकतात. 

बाकी हा सारा प्रकार पाहता ऑफिसामध्ये आपल्याकडुन असणाऱ्या अपेक्षा कधीकधी रास्त वाटू लागतात! 

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...